भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात शेवटचा आणि मालिका निर्णायक सामना रविवारी (१९ जून) बंगळुरू येथे एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. पाच सामन्यांची ही टी२० मालिका २-२ अशी बरोबरीत आहे. दक्षिण आफ्रिका हा शेवटचा सामना जिंकत मालिका खिशात घालण्याच्या हेतूने मैदानात उतरणार आहे. या मालिकेतील सुरूवातीचे दोन्ही सामने जिंकत पाहुण्या संघाने यजमान संघाला चांगलेच चिंतेत आणले होते. त्यानंतर भारताने सलग दोन सामने जिंकत मालिकेत जोरदार पुनरागमन केले आहे. आता भारत विजयाची हॅट्ट्रीक करण्याचा प्रयत्न करणार आहे.
भारताने कर्णधार रिषभ पंत (Rishabh Pant) याच्या नेतृत्वाखाली विशाखापट्टनम आणि राजकोट येथील सामने जिंकले आहेत. यामध्ये भारताच्या काही खेळाडूंनी विशेष कामगिरी करत संघाच्या विजयात महत्वाची भुमिका पार पाडली आहे. मात्र काही गोष्टी भारतासाठी शेवटच्या सामन्यात जिंकण्यात अडसर आणणार आहे.
रिषभ पंत आणि श्रेयस अय्यर यांचा फॉर्म चिंतेचा
या मालिकेत भारतीय संघाची सलामीवीर जोडी, गोलंदाजांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. यामध्ये भारताची मधल्या फळीतील पंत आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) हे सलग चार सामन्यात फलंदाजीमध्ये अयशस्वी ठरले आहे. अय्यरने चार सामन्यात २३.५०च्या सरासरीने ९४ धावा , तर पंतने १४.२५च्या सरासरीने ५७ धावा केल्या आहेत. पुन्हा एकदा याची पुनरावृत्ती झाली तर भारतीय संघ पाचव्या टी२०मध्ये अडचणीत येण्याची शक्यता आहे.
हार्दिक पांड्याची गोलंदाजी संघाला महाग पडत आहे
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२२च्या हंगामात संघाला विजेतेपद जिंकून देत हार्दिक पांड्या (Hardik Pandya) याने भारतीय संघात पुनरागमन केले आहे. त्याने फलंदाजीमध्ये आपला दम दाखवला होता, तर गोलंदाजीत त्याला लय सापडली नाही. आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये विकेट घेऊन त्याला एक वर्षापेक्षा अधिक काळ लोटला आहे. श्रीलंकेविरुद्ध त्याने एक विकेट घेतली होती. त्याने २०२१पासून ११ सामन्यात गोलंदाजी केली आहे, त्यातील आठ सामन्यांमध्ये त्याला एकही विकेट मिळाली नाही. दक्षिण आफ्रिकेविरूद्ध त्याला गोलंदाजीची संधी मिळू शकते, मात्र त्याची आकडेवारी पाहता तो संघाला महाग पडण्याची शक्यता आहे.
दक्षिण आफ्रिकेची भारतातील टी२०मधील कामगिरी
भारतात दक्षिण आफ्रिकेचा संघ टी२० मध्ये यशस्वी ठरला आहे. या मालिकेच्या आधी पाहुणा संघ भारताविरुद्ध टी२०मध्ये एकाच सामान्यात पराभूत झाला आहे. सुरू असलेल्या मालिकेतील दोन सामने गमावूनसुद्धा त्यांची कामगिरी उत्तम ठरत आहे. दक्षिण आफ्रिका संघाने भारतासोबत आतापर्यंत तीन टी२० मालिका खेळल्या आहेत. त्यातील आठ पैकी पाच सामन्यात दक्षिण आफ्रिकाच विजयी ठरला आहे.
बंगळुरूमध्ये क्विंटन डी कॉकची चमकदार फलंदाजी
डी कॉकची बॅट बंगळुरूमध्ये चांगलीच तळपली आहे. त्याने येथे टी२०मध्ये ११ डाव खेळले असून ४६.३०च्या सरासरीने ४६३ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या एक शतक आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे. या मालिकेतील दोन सामन्यात खेळताना त्याने ३६ धावा केल्या आहेत. बंगळुरूमध्ये त्याच्याकडून अधिक धावा होण्याची शक्यता आहे. असे झाले तर भारताचे मालिका विजयाचे स्वप्न भंगणार आहे.
दक्षिण आफ्रिकेचे भारतात भारताविरुद्ध पारडे जड
भारतामध्ये दक्षिण आफ्रिकेचा संघ टी२० मध्ये यशस्वी ठरला आहे. त्यातच भारताने मायदेशात शेवटचा टी२० सामना दक्षिण आफ्रिकेविरूद्ध एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला आहे. २०१९ला झालेल्या या सामन्यात भारतीय संघ विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळताना १३४ धावांत ९ विकेट्स गमावल्या होत्या. हा सामना दक्षिण आफ्रिकेने १ विकेट गमावत जिंकला होता. या सामन्यात डी कॉकने ५२ चेंडूत नाबाद ७९ धावा केल्या होत्या.
भारताची दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कामगिरी पाहता शेवटच्या सामन्यातील विजय अवघड वाटत आहे. या सामन्यात भारत कसा खेळ करतो, दिनेश कार्तिक पुन्हा संघाच्या मदतीला धावून येतो हे पाहण्यास उत्सुकतेचे ठरणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
दौऱ्यापूर्वी लक्ष्मण यांनी दिला भारतीय संघाला मोलाचा संदेश, बीसीसीआयने फोटो केले शेअर
दिनेश कार्तिकचं पहिलं प्रेम हिरावणारा क्रिकेटर पुनरागमनासाठी सज्ज, २ वर्षांनंतर उतरतोय मैदानात