कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनने (केएससीए) घोषणा केली आहे की, ते भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाचव्या टी-२० सामन्याच्या तिकिटांची अर्धी रक्कम परत करणार आहेत. एम चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळुरूमध्ये खेळल्या गेलेल्या या निर्णायक सामन्यात पावसाने व्यत्यय आणल्यामुळे चाहत्यांचीही निराशा झाली. अशात केएससीएने तिकिटाची अर्धी रक्कम परत करण्याचा निर्णय घेतल्यामुळे तिकिटधारकांना दिलासा मिळाला आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-२० मालिकेचा पाचवा सामना निर्णायक होता. रविवारी (१९ जून) असणारा हा सामना पाऊस सुरू असल्यामुळे ५० मिनिटे उशीरा सुरू झाला. भारताने प्रथम फलंदाजी करताना ३.३ षटकात २ विकेट्सच्या नुकसानावर २८ धावा केल्या आणि पुन्हा पाऊस सुरू झाला. सामना सुरू करताना वातावरण स्वच्छ झाल्याचे दिसत होते, पण काही वेळातच पाऊस पुन्हा सुरू झाला जो शेवटपर्यंत थांबला नाही.
माध्यमांशी बोलताना केएससीएचे प्रवक्ते विनय मृत्युंजय म्हणाले की, “नियम आणि अटीनुसार जर सामन्यात एकही चेंडू फेकला गेला असेल, तर पैसे परत मिळत नाहीत. परंतु केएससीएने चांगले संकेत दिले आहेत आणि तिकिटांच्या ५० टक्के रक्कम परत करणार आहे. सामना ५० मिनिट उशिरा सुरू झाला. खेळाडू मैदानात जाण्यापूर्वी वातावरण साफ वाटत होते. खेळ थांबवल्यानंतर सतत पाऊस सुरूच राहिला.”
मृत्युंजय पुढे बोलताना म्हणाले, “कर्नाटक स्टेट क्रिकेट असोसिएशनला ही घोषणा करताना खेद वाटत आहे की, पावसामुळे चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जाणारा भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाचवा टी-२० सामना फक्त ३.३ षटकांनंतर रद्द केला गेला. नियमांनुसार जर सामन्यात एक जरी चेंडू टाकला गेला असेल, तर पैसे परत मिळत नाहीत. परंतु केएससीने सर्व विकल्या गेलेल्या तिकिटांच्या ५० टक्के रक्कम परत करण्याचा निर्णय घेतला. रिफंडची तारीख, वेळ आणि स्थान लवकरच घोषित केले जाईल. सर्व तिकिट धारकांना विनंती आहे की, रिफंडच्या वेळी मूळ तिटिक जवळ ठेवावे.”
दरम्यान, भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-२० मालिकेचा एकंदरीत विचार केला, तर दोन्ही संघ २-२ असा बरोबरीवर होते. पहिल्या दोन सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकी संघाने विजय मिळवला होता, तर शेवटच्या दोन सामन्यांमध्ये भारताने जोरदार पुनरागमन केले होते. शेवटचा सामना पावसामुळे अनिर्णीत राहिला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
बंगाल रणजी संघ सोडल्यानंतर वृद्धिमान साहा धरणार ‘या’ नवीन संघाचा हात, वाचा सविस्तर
बड्या दिलाचा माणूस! विश्वचषक विजेता क्रिकेटर पेट्रोल पंपावर वाटतोय चहा, कारण कौतुकास्पद
नाणेफेकीच्या बाबतीत कर्णधार पंतला नाही मिळाली नशिबाची साथ, नावावर झाला लाजिरवाणा रेकॉर्ड