भारतीय क्रिकेट संघाने सेंच्युरियन येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या टी20 सामन्यात यजमान दक्षिण आफ्रिकेचा 11 धावांनी पराभव केला. पहिल्या डावात खेळताना भारताने निर्धारित 20 षटकांत 6 गडी गमावून 219 धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा संघ 208 धावाच करू शकला. झंझावाती शतकासाठी तिलक वर्माला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. टीम इंडिया आता मालिकेत 2-1 ने पुढे आहे.
तत्पूर्वी, दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करामने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यासाठी टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठा बदल करण्यात आला. वेगवान गोलंदाज आवेश खानला वगळण्यात आले आणि त्याच्या जागी अष्टपैलू रमणदीपला पदार्पणाची संधी मिळाली. टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली नाही आणि सलामीवीर संजू सॅमसन खाते न उघडताच बाद झाला. त्याचे हे सलग दुसरे डक ठरले. मात्र, यानंतर तिलक वर्मा आणि अभिषेक शर्मा यांनी जबरदस्त भागीदारी केली. अभिषेक शर्माने 25 चेंडूत 3 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 50 धावा केल्या. तिलक वर्माने आपल्या टी20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. त्याने 56 चेंडूत 8 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीने नाबाद 107 धावांची खेळी केली.
लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या संघाने ठराविक अंतराने आपल्या विकेट्स गमावल्या. रायन रिकेल्टनने 15 चेंडूत 20 धावा, रीझा हेंड्रिक्सने 13 चेंडूत 21 धावा आणि ट्रिस्टन स्टब्सने 12 चेंडूत 12 धावा केल्या. कर्णधार एडन मार्करामने 18 चेंडूत 29 धावांची खेळी खेळली. मात्र, वरुण चक्रवर्तीविरुद्ध खराब शॉट खेळल्याने तो बाद झाला. संघाने 84 धावांत 4 विकेट गमावल्या होत्या आणि आवश्यक धावगतीही जास्त होती.
यानंतर हेनरिक क्लासेनने आक्रमक शैलीचा अवलंब करत वरुण चक्रवर्तीच्या एकाच षटकात 3 षटकार ठोकले. येथून वेग दक्षिण आफ्रिकेकडे सरकला. मात्र, 16 व्या षटकात महत्त्वाच्या वळणावर डेव्हिड मिलर 18 चेंडूत 18 धावा काढून बाद झाला. अक्षर पटेलने त्याचा जबरदस्त झेल घेतला. हेनरिक क्लासेनने 22 चेंडूत 1 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 41 धावा केल्या पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. मार्को जॅनसेनने अवघ्या 17 चेंडूत 4 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 54 धावा करत सामना अतिशय रोमांचक बनवला असला तरी अखेरीस प्रोटीज संघाला पराभवाला सामोरे जावे लागले. भारताकडून अर्शदीप सिंगने सर्वाधिक 3 बळी घेतले.
हेही वाचा-
IND vs SA; तिलक वर्माचे झंझावाती शतक! भारताचे दक्षिण आफ्रिकेपुढे 220 धावांचे आव्हान
IND vs SA; ‘आधी हीरो नंतर झीरो’ बाद झाल्यानंतर संजूच्या नावावर झाला ‘हा’ लाजिरवाणा रेकाॅर्ड
“या 4 खेळाडूंमुळे माझ्या मुलाचे 10 वर्ष क्रिकेट करिअर उध्वस्त…” संजूच्या वडिलांचे खळबळजनक वक्तव्य