भारत आणि श्रीलंका संघ बेंगलोरमधील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये कसोटी मालिकेतील दुसरा सामना खेळत आहेत. मालिकेतील या दुसऱ्या सामन्यात भारतीय संघ भक्कम स्थितीत दिसत आहे आणि त्यांच्या विजयाची शक्यता अधिक आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी तब्बल १६ खेळाडूंनी विकेट्स गमावल्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशी श्रीलंका संघाचे खेळाडू जेव्हा फलंदाजीसाठी मैदानात उतरले, तेव्हा थोड्या वेळासाठी सामना थांबवावा लागला होता.
श्रीलंकेचे (Sri Lanka Cricket Team) खेळाडू दुसऱ्या दिवसाचा म्हणजेच रविवारचा (१३ मार्च) खेळ सुरू होताना खेळपट्टीवर उतरत होते. परंतु खेळ सुरू होण्यापूर्वीच एक अडथळा आला. दुसऱ्या दिवशी जेव्हा दोन्ही संघांचे खेळाडू मैदानात आले, तेव्हाच मधमाशांनीही मैदानात आगमन केले. याच कारणास्तव सामना काही मिनिटांसाठी थांबवला गेला होता. सर्वप्रथम श्रीलंकन खेळाडूंच्या लक्षात आले की, साइट स्क्रीनच्या जवळ मधमाशांचा घोळका होता, जो सतत फलंदाजांच्या डोळ्यासमोर येत होता. याच कारणास्तव सामना सुरू करण्यासाठी तीन-चार मिनिट उशीर झाला.
दरम्यान, श्रीलंका संघासाठी भारताचा हा दौरा खूपच महागात पडला आहे. भारताविरुद्धच्या टी-२० मालिकेत श्रीलंका संघाला क्लीन स्वीप (०-३) मिळाला होता. त्यानंतर कसोटी मालिकेतही श्रीलंका संघाची स्थिती खराब दिसत आहे. कसोटी मालिकेतील पहिला सामना भारताने एक डाव आणि २२२ धावांनी जिंकला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यातही भारतीय संघच बाजी मारेल, असे चित्र सध्या दिसत आहे.
दुसऱ्या सामन्याच्या पहिल्या डावात भारताने २५२, तर श्रीलंकने १०९ धावा केल्या आहेत. त्यानंतर दुसऱ्या डावात भारतीय संघाने ३०३ धावा करून डाव घोषित केला आणि श्रीलंकेसमोर विजयासाठी ४४७ धावांचे लक्ष्य ठेवले. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत श्रीलंकन संघाने एक विकेट गमावली आहे आणि २८ धावाही केल्या आहेत. विजयासाठी त्यांना अजून ४१९ धावांची गरज आहे आणि ९ विकेट्स हातात आहेत. असे असले तरी, भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे श्रीलंकन संघाचा निभाव लागण्याची खूपच कमी शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या –
VIDEO: हा बुमराह की विराट? सोशल मीडियावर व्हायरल होतोय व्हिडिओ; तुम्हीही पाहा
किंगसाठी कायपण! विराटसोबत सेल्फी घेण्यासाठी एकाच वेळी मैदानात घुसले तीन चाहते; एकाने तर…