भारत आणि श्रीलंका संघातील ३ सामन्यांच्या टी२० मालिकेतील पहिला सामना गुरुवारी (२४ फेब्रुवारी) पार पडणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघाचा माजी सलामीवीर फलंदाज आकाश चोप्राने भारतीय संघासाठी काही महत्त्वाचे सल्ले दिले आहेत. यावेळी त्याने रोहित शर्माला श्रीलंकेविरुद्धच्या टी२० मालिकेत २ खेळाडूंना सलामीला पाठवण्याचा सल्ला दिला आहे. या मालिकेसाठी भारतीय संघातील काही महत्त्वाच्या खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे, तर दुसरीकडे केएल राहुल आणि सूर्यकुमार यादव यांसारखे खेळाडू दुखापतीमुळे संघातून बाहेर झाले आहेत.
श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये नवीन चेहऱ्यांना संधी मिळू शकते. नुकतेच स्टार फलंदाज संजू सॅमसनचेही संघात पुनरागमन झाले आहे. सॅमसनबद्दल आकाश चोप्रा म्हणाला आहे की, त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील करण्याचा निर्णय योग्य नसेल. त्याला वाटते की, सॅमसनने अद्याप आपल्या संधीची वाट पाहिली पाहिजे. दुसरीकडे आकाश चोप्राचं असं मत आहे की, डावाची सुरुवात भारतीय संघाचे स्टार फलंदाज ऋतुराज गायकवाड आणि ईशान किशन यांनी केली पाहिजे. तसेच रोहितने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यास आला पाहिजे.
आकाश चोप्रा प्लेइंग इलेव्हनमध्ये सॅमसनच्या जागी दीपक हुडाला प्राधान्य देत म्हणाला की, रोहितने तिसऱ्या क्रमांकावर, तर श्रेयस अय्यरने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी केली पाहिजे. तसेच पाचव्या क्रमांकावर दीपक हुडाने आले पाहिजे. आता पाचव्या क्रमांकापर्यंत तुमचे फलंदाज आहेत, तर संजू सॅमसनची जागाच कुठे उरते. तो एक सलामी फलंदाज आहे. तुम्ही त्याला सलामीच्या कोट्यात जागा देऊ शकला नाहीत, तर त्याला संधी देऊन वाया घालवण्याची गरज नाहीये. तसेच आपल्याकडे सहाव्या क्रमांकावर वेंकटेश अय्यर आहे.
यापूर्वी सॅमसनबद्दल बोलताना कर्णधार रोहित शर्मा म्हणाला होता की, तो खूप प्रतिभावान आहे. तसेच त्याच्या प्रतिभेचा वापर आपल्याला कशाप्रकारे करायचा आहे, हे आपल्यावर अवलंबून आहे. जेव्हाही त्याला संधी मिळेल, आम्ही त्याच्यात अशाप्रकारचा आत्मविश्वास द्यायचा आहे की, तो आपल्या पूर्ण क्षमतेने मैदानावर खेळेल. तो निश्चितच आमच्या योजनेचा भाग आहे आणि त्यामुळेच तो संघाचा भाग आहे. त्याचा बॅकफुटवरील खेळ शानदार आहे. जेव्हा तुम्ही ऑस्ट्रेलियामध्ये जाता, तेव्हा तुम्हाला ज्या क्षमतेची आवश्यकता असते, ती क्षमता सॅमसनमध्ये आहे. मला आशा आहे की, तो आपल्या क्षमतेचा पूर्ण उपयोग करेल.
सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर भारत आणि श्रीलंका संघातील पहिला टी२० सामना गुरुवारी (२४ फेब्रुवारी) लखनऊच्या इकाना स्टेडिअमवर ७ वाजता सुरू होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘सरदार’ बनलेल्या कोहलीला पाहून चाहते क्रेझी, अनुष्काही नव्या लूकमध्ये कॅमेरात कैद; काय आहे प्रकरण?
…तर महिला विश्वचषकात ९ खेळाडूंसह देखील खेळवला जाणार सामना, आयसीसीने केला मोठा बदल
चहल की बुमराह, कोण होणार भारताचा यशस्वी टी२० गोलंदाज? श्रीलंकेविरुद्ध रंगणार ‘कांटे की टक्कर’