भारत आणि श्रीलंका (Ind vs SL Test Series) यांच्यातील कसोटी मालिका शुक्रवारी (४ मार्च) सुरू झाली. मालिकेतील पहिला सामना मोहालीमध्ये खेळला जात आहे. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि मध्यक्रमातील मुख्य फलंदाज विराट कोहली याच्यासाठी हा सामना खास आहे, कारण हा त्याच्या कसोटी कारकिर्दीतील १०० वा सामना आहे. ही कामगिरी साध्य करणे सोपी गोष्ट नसते, पण तरीही भारतीय संघात आतापर्यंत ११ दिग्गज होऊन गेले आहेत, ज्यांनी ही कामगिरी केली आहे. विराट कोहली ही कामगिरी करणारा १२ वा भारतीय खेळाडू ठरला आहे.
भारतीय संघातील खेळाडूंपैकी सर्वात आधी १०० कसोटी सामने खेळण्याची कमाल कामगिरी करणारे दिग्गज म्हणजे सुनील गावसकर. सुनील गावसकरांनी कसोटी कारकिर्दीत एकूण १२५ कसोटी सामने खेळले आणि १०० कसोटी सामन्यांचा टप्पा ओलांडणारे ते पहिले भारतीय खेळाडू होते. सचिन तेंडूलकर भारतीय संघासाठी सर्वात जास्त कसोटी सामने खेळणारा खेळाडू आहे, त्याने कसोटी कारकिर्दीत एकूण २०० सामने खेळले आहेत.
जागतिक क्रिकेटमध्ये सर्वात जास्त कसोटी सामने खेळण्याचा विक्रमही सचिन तेंडुलकरच्याच नावावर आहे. राहुल द्रविड या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत, ज्यांनी भारतासाठी सर्वाधिक कसोटी सामने खेळले आहेत. द्रविडने पूर्ण कारकिर्दीत १६३ कसोटी सामने खेळले आहेत. तिसऱ्या क्रमांकावर व्हीव्हीएस लक्ष्मण आहेत, ज्यांनी कारकिर्दीत १३४ कसोटी सामने खेळले. विराट कोहली आता या यादीत नव्याने सहभागी झाला आहे आणि ही कामगिरी करणारा १२ वा भारतीय खेळाडू बनला आहे
A special 💯 for @imVkohli #VK100 @Paytm #INDvSL pic.twitter.com/HVmPEY7erw
— BCCI (@BCCI) March 4, 2022
भारतीय संघासाठी १०० पेक्षा जास्त कसोटी सामने खेळणारे खेळाडू
सचिन तेंडुलकर- २०० कसोटी सामने
राहुल द्रविड- १६३ कसोटी सामने
वीवीएस लक्ष्मण- १३४ कसोटी सामने
अनिल कुंबले- १३२ कसोटी सामने
कपिल देव- १३१ कसोटी सामने
सुनील गावस्कर- १२५ कसोटी सामने
दिलीप वेंगसरकर- ११६ कसोटी सामने
सौरव गांगुली- ११३ कसोटी सामने
इशांत शर्मा- १०५ कसोटी सामने
हरभजन सिंह- १०३ कसोटी सामने
विरेंद्र सहवाग- १०३ कसोटी सामने
विराट कोहली – १०० कसोटी सामने
विराट कोहलीची कसोटी कारकीर्द
विराट कोहलीच्या कसोटी कारकिर्दीचा विचार केला, तर त्याने १०० कसोटी सामना खेळण्यापूर्वी ९९ कसोटी सामन्यांमध्ये ५०.३९ च्या सरासरीने ७९६२ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या २७ शतकांचा, तर २८ अर्धशतकांचा समावेश आहे. कसोटी क्रिकेटमधील त्याच्या सर्वोत्तम प्रदर्शनाचा विचार केला, तर त्याने नाबाद २५४ धावा केल्या होत्या.