भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेपाठोपाठ टी२० मालिका देखील जिंकली आहे. रविवारी (२० फेब्रुवारी) टी२० मालिकेतील शेवटचा सामना भारताने १७ धावांनी जिंकला आणि मालिका नावावर केली. तीन सामन्यांच्या या टी२० मालिकेत भारताने ३-० असा मोठा विजय मिळवला. वेस्ट इंडिजला भारत दौऱ्यात एकदिवसीय आणि टी-२० मालिकेतील एकही सामना जिंकता आला नाही. याबरोबरच वेस्ट इंडिज संघाने एक नकोसा विक्रम नावावर केला आहे.
वेस्ट इंडिज संघ आता टी२० आंतरराष्ट्रीयमध्ये सर्वात जास्त सामने पराभूत झालेला संघ बनला आहे. भारताविरुद्ध सलग तीन टी-२० सामने गमावल्यानंतर वेस्ट इंडिजचे एकूण ८३ टी२० पराभव झाले आहेत. दोन वेळा टी२० विश्वचषक जिंकणाऱ्या वेस्ट इंडिज संघासाठी हा खूपच निराशाजनक विक्रम आहे.
यापूर्वी हा विक्रम श्रीलंका संघाच्या नावावर होता. श्रीलंका संघाने आतापर्यंत ८२ टी२० सामन्यांमध्ये पराभव पत्करला आहे आणि वेस्ट इंडिजने आता त्यांना मागे सोडले आहे. श्रीलंकानंतर या यादीत बांगलादेश संघ आहे, ज्यांनी ८१ टी२० सामन्यांमध्ये पराभव पत्करला आहे. या यादीत न्यूझीलंडचे नाव चौथ्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंडला एकूण ७६ टी२० सामन्यात पराभव मिळाला आहे.
रविवारच्या सामन्यात विजय मिळवून भारताने वेस्ट इंडीजविरुद्ध टी-२० क्रिकेटमधील सलग चौथी मालिका जिंकली आहे. यापूर्वी २०१९ मध्ये खेळल्या गेलल्या टी-२० मालिकेत भारताने २-१ आणि ३-० असा विजय मिळवला होता, तर २०१८ मध्ये ३-० ने मालिका जिंकली होती.
तसेच रोहित शर्माने टी-२० संघाचे नियमित कर्णधारपद स्वीकारून अजून जास्त काळ झाला नाही, पण याच काळात रोहितने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. कर्णधाराच्या रूपात रोहित शर्माचा हा टी२० क्रिकेटमधील सलग ९ वा विजय आहे. रोहितने ही कामगिरी २०१९-२२ दरम्यान केली आहे.
महत्वाच्या बातम्या –
वेंकटेश अय्यरचा ३६० डिग्री षटकार पाहून सोशल मीडियावर होतेय वाहवा, पाहा व्हिडिओ
साहाच्या आरोपांनंतर समोर आली द्रविडची प्रतिक्रिया; म्हणाला, ‘मी जराही दुःखी नाही कारण…’
अर्धशतकानंतर सूर्याचा ‘नमस्कार’; भारतीय फलंदाजाने खास सेलिब्रेशनने जिंकली अनेकांची मने, पाहा व्हिडिओ