दुबई। 25 सप्टेंबरला भारताचा एशिया कप 2018 मधील सुपर फोरचा तिसरा सामना पार पडला. हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रोमांचकारी झाला. अखेर नाट्यपूर्ण झालेला हा सामना बरोबरीत सुटला.
या सामन्यात भारताला विजयासाठी शेवटच्या षटकात 7 धावांची गरज होती. तर अफगाणिस्तानला एका विकेटची गरज होती. हे षटक अफगाणिस्तानचा प्रतिभाशाली गोलंदाज राशीद खानने टाकले.
या षटकात भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा स्ट्राइकवर होता. त्याने पहिल्या चेंडूवर कोणतीही धाव घेतली नाही पण दुसऱ्या चेंडूवर चौकार ठोकत भारताला विजयाच्या समीप पोहचवले होते. पण त्यानंतर त्याने एक धाव घेतली त्यामुळे नवोदित खलील अहमद फलंदाजीसाठी स्ट्राइकवर आला.
त्यानेही जडेजाला फलंदाजी देण्यासाठी एक धाव घेतली. त्यामुळे भारताला विजयासाठी फक्त दोन चेंडूत एका धावेची गरज असताना जडेजा बाद झाला आणि भारत सर्वबाद झाला असतानाही सामना बरोबरीत सुटला.
अफगाणिस्तानने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर विजयासाठी 253 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताच्या सलामीवीर केएल राहुल आणि अंबाती रायडूने 110 धावांची शतकी भागीदारी रचत भारताला भक्कम सुरुवात करुन दिली होती.
मात्र ही जोडी 18 व्या षटकात तोडण्यात मोहम्मद नबीला यश आले. त्याने रायडूला 49 चेंडूत 57 धावांवर खेळत असताला बाद केले. रायडूने या अर्धशतकी खेळीत 4 चौकार आणि 4 षटकार मारले.
त्यानंतर काही वेळात राहुलनेही विकेट गमावली. राहुलने 66 चेंडुत 6 चौकार आणि 1 षटकाराच्या सहाय्याने 60 धावा केल्या. त्याला राशीद खानने पायचीत बाद केले. पण यावर राहुलने रिव्ह्यू घेतला होता. परंतू हा रिव्ह्यू वाया गेला. रिव्ह्यूमध्ये राहुल बाद असल्याचे स्पष्ट दिसले.
मात्र हा रिव्ह्यू वाया गेल्याने त्याचा फटका भारताला नंतर बसला, कारण चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला एमएस धोनीच्या(8) पॅडला जावेद अहमदीने टाकलेला चेंडू लागला असताना तो चेंडू स्टंपच्या बाहेर जात होता. परंतू पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळे धोनीला पायचीत बाद देण्यात आले.
धोनीच्या पाठोपाठ काही वेळात मनिष पांडेही(8) स्वस्तात बाद झाला. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर बढती मिळालेला दिनेश कार्तिक आणि केदार जाधवने(19) चांगली फलंदाजी करत भारताला सावरले होते. त्यांनी पाचव्या विकेटसाठी 38 धावांची भागीदारी केली होती. मात्र नॉन-स्ट्राइकर एन्डला असलेला केदार धावबाद झाला.
यावेळी कार्तिकने 39 व्या षटकात मारलेला चेंडू सरळ आल्याने अफगाणिस्तानचा गोलंदाज मुजीब उर रेहमानने त्या चेंडूला स्पर्श केला, त्याचवेळी तो चेंडू स्टंपवर आदळला त्यामुळे क्रिजच्या बाहेर असलेला केदार बाद झाला.
त्याच्या पुढच्याच षटकात कार्तिकलाही धोनीप्रमाणेच पंचांच्या चुकीच्या निर्णयाचा फटका बसला. त्यालाही नबीने टाकलेल्या चेंडू पॅडला लागल्याने पायचीद बाद देण्यात आले. परंतू हा चेंडू स्टंपच्या बाहेरुन जात होता. कार्तिकने 66 चेंडूत 44 धावांची खेळी केली.
कार्तिक बाद झाल्यानंतर दिपक चहर(12) आणि रविंद्र जडेजाने सकारात्मक फलंदाजी केली होती. पण भारताला विजयासाठी 27 धावांची गरज असताना दिपक चहरलाही बाद करण्यात अफताब आलमला यश आले. त्याने दिपकला त्रिफळाचीत केले.
यानंतर मात्र जडेजा आणि कुलदीप यादवने(9) एक दोन धावा काढण्याचा प्रयत्न केला. पण या प्रयत्नात कुलदीप धावबाद झाला. त्याच्यानंतर खेळायला आलेला सिद्धार्थ कौलही एकही धाव न करता धावबाद झाला.
अखेर शेवटच्या षटकात जडेजाला राशीदने बाद केले. पण तो पर्यंत उशीर झाला असल्याने सामना बरोबरीत संपला.
अफगाणिस्तानकडून राशीद खान(2/41), आफताब आलम(2/53), मोहम्मद नबी(2/40) आणि जावेद अहमदी(1/19) यांनी विकेट्स घेतल्या.
तत्पुर्वी अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्याकडून सुरुवात चांगली झाली होती. त्यांचे सलामीवीर फलंदाज मोहम्मद शेहजाद आणि जावेद अहमदीने 65 धावांची सलामी भागीदारी रचली होती. मात्र यात अहमदीचे फक्त 5 धावांचे योगदान होते.
अहमदीला जडेजाच्या गोलंदाजीवर धोनीने यष्टीचीत केले. त्याच्या पाठोपाठ अफगाणिस्तानने नियमित अंतराने विकेट्स गमावल्या. पण एका बाजूने विकेट जात असताना मात्र मोहम्मद शहजादने शतक करत अफगाणिस्तानला 180 धावांचा टप्पा पार करुन दिला होता.
त्याने सुरुवातीपासूनच आक्रमक फलंदाजी करताना 116 चेंडूत 124 धावा केल्या. या खेळीत त्याने 11 चौकार आणि 7 षटकार मारले. अखेर त्याला केदार जाधवने बाद केले. पण त्यानंतर मोहम्मद नबीने 56 चेंडूत 64 धावा केल्या आणि अफगाणिस्तानला 240 धावांचा टप्पा गाठून दिला.
अफगाणिस्तानकडून शेहजाद आणि नबी व्यतिरिक्त गुलबदिन नाइब(15), नाजीबुल्लाह झारदां(20) आणि राशीद खान(12*) यांनीच दोन आकडी धावसंख्या गाठली. मात्र अन्य फलंदाजांना खास काही करता आले नाही.
भारताकडून रविंद्र जडेजा (46/3), कुलदीप यादव(2/38) खलील अहमद(1/45) आणि दिपक चहर(1/37) यांनी विकेट घेत अफगाणिस्तानला 50 षटकात 8 बाद 252 धावांवर रोखले.
महत्वाच्या बातम्या –
–विराट कोहलीने धोनीकडून अनेक गोष्टी शिकण्यामागील हे आहे सिक्रेट
–अखेर रविंद्र जडेजाने तो सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडलाच!
–Video: विराट कोहली, मिराबाई चानूने राष्ट्रपतींच्या हस्ते स्विकारला खेलरत्न पुरस्कार