---Advertisement---

IND vs NZ: चक्रवर्तीने घेतली न्यूझीलंडची फिरकी! भारताचा 44 धावांनी दमदार विजय

On: रविवार, मार्च 2, 2025 9:58 PM
---Advertisement---

यंदाच्या आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफीतील शेवटचा साखळी सामना भारत-न्यूझीलंड संघात (2 मार्च) रोजी खेळला गेला. या सामन्यात रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखालील भारतीय संघाने न्यूझीलंडवर 44 धावांनी शानदार विजय मिळवला. या सामन्यात भारताचा फिरकी गोलंदाज वरूण चक्रवर्तीने फिरकीची जादू दाखवत 5 विकेट्स आपल्या नावावर केल्या. दरम्यान त्याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

न्यूझीलंडने टाॅस जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले होते. दरम्यान भारताने 249 धावा केल्या होत्या. भारताची सलामी जोडी रोहित शर्मा आणि शुबमन गिल स्वस्तात बाद झाले. विराट कोहलीच्या कारकिर्दीतील हा 300वा वनडे सामना होता, ज्यामध्ये तो चांगल्या लयीत दिसत होता. पण ग्लेन फिलिप्सने असा जादुई झेल घेतला की मैदानात असलेले सगळेच आश्चर्यचकित झाले.

दरम्यान विराटने 11 धावा केल्या. त्यानंतर श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आणि अक्षर पटेल (Axar Patel) यांनी 98 धावांची भागीदारी करून भारताला मोठ्या संकटातून बाहेर काढण्यास मदत केली. अय्यरने शानदार अर्धशतक झळकावात 79 धावा केल्या, तर अक्षर पटेलने 42 धावांचे योगदान दिले. हार्दिक पंड्यानेही 45 धावा केल्या आणि भारताला 249 धावांपर्यंत पोहोचवण्यास मदत केली.

भारताच्या विजयात श्रेयस अय्यर आणि वरुण चक्रवर्ती यांनी सर्वात मोठे योगदान दिले. गोलंदाजीत, वरुण चक्रवर्तीने 5 विकेट्स घेत न्यूझीलंड फलंदाजांच्या बत्त्या गुल केल्या. हा चक्रवर्तीचा चॅम्पियन्स ट्रॉफीतील पहिला सामना होता, ज्यामध्ये त्याने इतिहास रचला. वरुण हा चॅम्पियन्ससाठी पदार्पणाच्या सामन्यात 5 विकेट्स घेणारा पहिलाच भारतीय गोलंदाज आहे.

भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या गट अ मध्ये तिन्ही सामने जिंकून अव्वल स्थान पटकावले आहे. भारताने यापूर्वी बांगलादेश, पाकिस्तान या दोन्ही संघांना धूळ चारली होती. आता भारताने न्यूझीलंडचाही 44 धावांनी धुव्वा उडवला.

यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दुबई क्रिकेट स्टेडियमवर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने विजय मिळवण्याची ही पहिलीच वेळ आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सेमीफायनलचे समीकरण असे होते की, ग्रुप अ मधील अव्वल संघाचा सामना ग्रुप ब मधील दुसऱ्या क्रमांकाच्या संघाशी होईल. आता दोन्ही गटांकडे पाहता, (4 मार्च) रोजी पहिल्या सेमीफायनल सामन्यात भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी होईल, तर (5 मार्च) रोजी दक्षिण आफ्रिकेचा सामना न्यूझीलंडशी होईल.

महत्त्वाच्या बातम्या-

टीम इंडियाच्या सदस्यावर मोठा आघात; आईच्या निधनाने चॅम्पियन्स ट्रॉफीतून माघार
“…विराट कोहली अद्भुत आहे” 72 वर्षाच्या महान क्रिकेटपटूने केले कोहलीचे कौतुक!
भारत-न्यूझीलंड सामन्यादरम्यान तुटला शोएब अख्तरचा रेकाॅर्ड! हेन्रीने रचला इतिहास

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---