भारत आणि वेस्ट इंडीज दरम्यान तीन सामन्यांची वनडे क्रिकेट मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील दुसरा सामना रविवारी (२४ जुलै) पोर्ट ऑफ स्पेनमधील क्वीन्स पार्क ओव्हल मैदानावर झाला. या अटीतटीच्या सामन्यात भारताने वेस्ट इंडीजचा दोन गडी राखून पराभव केला. अष्टपैलू अक्षर पटेल हा भारताच्या विजयाचा नायक ठरला.
होपचे दमदार शतक
पोर्ट ऑफ स्पेन येथे रंगलेल्या या सामन्यात यजमान संघाचा कर्णधार निकोलस पूरनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय दोन्ही सलामीवीर शाई होप व कायले मायर्स यांनी योग्य ठरविला. दोघांनी पहिल्या गड्यासाठी ६५ धावांची भागीदारी केली. त्यानंतर, ब्रूक्स व होपने आणखी ६३ धावा जोडल्या. यादरम्यान होपने आपले अर्धशतक पूर्ण केले. चौथ्या गड्यासाठी होप व कर्णधार पूरन यांनी शतकी भागीदारी रचली. पूरनने आक्रमक ७४ धावा केल्या. तो बाद झाल्यानंतर जबाबदारी होपने पूर्णपणे आपल्या खांद्यावर घेत वनडे कारकिर्दीतील १३ वे शतक साजरे केले. यासह त्याने आपला शंभरावा वनडे सामना संस्मरणीय बनवला. त्याच्या ११५ धावांच्या खेळीमुळे वेस्ट इंडिजने भारतासमोर विजयासाठी ३१२ धावांचे मोठे लक्ष ठेवले.
भारताने केला धावांचा यशस्वी पाठलाग
भारतीय संघाला मालिका खिशात घालण्यासाठी हा सामना जिंकणे गरजेचे होते. पहिल्या सामन्याप्रमाणेच दुसऱ्या सामन्यातही शिखर धवन व शुबमन गिल यांनी आक्रमक सुरुवात दिली. मात्र, दहाव्या षटकात पाऊस आल्याने खेळ काही काळ थांबवावा लागला. त्याने शिखरची लय तुटली आणि तो बाद झाला. गिलही ४३ धावांच्या पुढे जाऊ शकला नाही. सूर्यकुमार यादव पुन्हा एकदा अपयशी ठरला. मात्र, त्यानंतर भारतीय संघाला विजयाच्या दिशेने नेण्याची जबाबदारी उपकर्णधर श्रेयस अय्यर व संजू सॅमसन यांनी आपल्या खांद्यावर घेतली. श्रेयसने मालिकेतील सलग दुसरे अर्धशतक पूर्ण केले. श्रेयसने ६३ तर संजूने ५४ धावा केल्या. संजू बाद झाला तेव्हा भारतीय संघाला विजयासाठी ६८ चेंडूवर १०७ धावांची गरज होती. तेव्हा कोणाच्याही ध्यानीमनी नसतानाच अष्टपैलू अक्षर पटेलने तुफानी खेळ गेला. दीपक हूडाने ३३ धावांचे योगदान दिले. अक्षरने ३५ चेंडूवर ३ चौकार व पाच षटकारांच्या मदतीने नाबाद ६४ धावा करत दोन गडी व दोन चेंडू राखून संघाला विजय मिळवून दिला. त्यालाच सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मालिकेतील अखेरचा सामना २७ जुलै रोजी खेळवण्यात येईल.
महत्त्वाच्या बातम्या-
रेल्वेने मारला राष्ट्रीय कबड्डी चॅम्पियनशिपचा चौकार; महाराष्ट्र उपविजेता
शंभराव्या सामन्यात होपचा शतकी धमाका! रिचर्ड्सपासून रोहितला सोडले मागे
इंग्लंड-दक्षिण आफ्रिका मालिकेच्या ‘डिसायडर’मध्ये पावसाचा खेळ; मालिका बरोबरीत






