भारतीय क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात त्यांनी सर्वप्रथम कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता. या सामन्यात भारताला ८ गड्यांनी पराभव पत्करावा लागला. न्यूझीलंडने तिन्ही आघाड्यांवर सरस खेळ करत भारताला मात दिली. या सामन्यात भारताच्या फलंदाजांसह गोलंदाजी देखील निष्प्रभ ठरली. विशेषतः भारताचे ब्रम्हास्त्र मानले जाणारा जसप्रीत बुमराह सपशेल अपयशी ठरला.
बुमराहला या सामन्यात दोन्ही डावात एकही विकेट घेता आली नाही. त्याची गोलंदाजी देखील अतिशय प्रभावहीन वाटली. त्यामुळे भारताला आता त्याच्या संघातील स्थानाचा पुनर्विचार करावा लागेल. भारतीय संघाला येत्या ऑगस्ट महिन्यात इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. या मालिकेसाठी भारतीय संघ बुमराहच्या जागी पर्यायाचा विचार करू शकतो. या लेखात आपण ते पर्याय नेमके काय आहेत, हे पाहुया.
१) मोहम्मद सिराज- वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज हा बुमराहचा सर्वोत्तम पर्याय असेल. सिराजने पदार्पण केलेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात अप्रतिम कामगिरी केली होती. या दौऱ्यात त्याने ३ कसोटी सामन्यात १६ विकेट्स घेतल्या होत्या. तो चेंडूचा टप्पा खोलवर ठेवून स्विंग करण्यासाठी ओळखला जातो. त्याचे कौशल्य इंग्लंडच्या वातावरणात उपयुक्त ठरू शकते. त्यामुळे भारतीय संघ बुमराहचा पहिला पर्याय म्हणून सिराजला आजमावू शकतो.
२) शार्दुल ठाकूर- शार्दुल ठाकूर वनडे आणि टी२० क्रिकेटमध्ये तसा महागडा गोलंदाज ठरला आहे. मात्र ऑस्ट्रेलिया दौऱ्यात संधी मिळालेल्या गाबा कसोटीत त्याने अष्टपैलू कामगिरी केली होती. गोलंदाजीत ७ विकेट्स घेताना त्याने फलंदाजीत देखील अर्धशतक झळकावले होते. त्यामुळे बुमराहच्या जागी जर शार्दुल ठाकूरला संधी दिली तर भारताला फलंदाजीत देखील फायदा होऊ शकतो.
३) उमेश यादव- वेगवान गोलंदाज उमेश यादव बऱ्याच काळापासून संघातून बाहेर आहे. मात्र बुमराहच्या जागी जर भारताला अनुभवी गोलंदाजाची गरज असेल तर उमेश यादवला संघात स्थान मिळू शकते. त्याला इंग्लंडमध्ये खेळण्याचा पूर्वानुभव देखील आहे. याचा फायदा तो संघाला मिळवून देऊ शकतो.
महत्त्वाच्या बातम्या:
WTC फायनलचा हिरो जेमिसन टी२० सामन्यात संघाला नाही मिळवून देऊ शकला विजय, तुफानी खेळी गेली व्यर्थ
‘मी जे दाखवतोय, ते तुम्ही पाहू शकता का? दीपक चाहरच्या प्रश्नावर चाहत्यांनी पाडला प्रतिक्रियांचा पाऊस
बायो बबल तोडणाऱ्या श्रीलंकन खेळाडूंना झटका, बोर्डाने सुनावली कठोर शिक्षा