भारतात कोविड-१९ या महामारीचा विळखा पडला आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी भारतभर लसीकरणही सुरु आहे. सध्या देशात वयवर्ष १८ च्या पुढील लसीकरण सुरु झाले आहे. त्यामुळे सोमवारी (१० मे) भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. याबद्दल त्याने स्वत: सोशल मीडियाद्वारे माहिती दिली आहे.
आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरील स्टोरीमध्ये फोटो शेअर त्याने सर्वांना यासंदर्भात माहिती दिली आहे. आपला कोरोनाची लस टोचून घेतनाचा फोटो टाकत त्याने लिहिले आहे, ‘जेवढ्या लवकर शक्य होईल, तेवढ्या लवकर कोरोनाची लस घ्या. सर्वांनी सुरक्षित राहा.’
कोहलीपुर्वी भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे, शिखर धवन, उमेश यादव अशा बऱ्याच सक्रिय भारतीय क्रिकेटपटूंनी कोरोनाची लस टोचून घेतली आहे.
Indian captain Virat Kohli has vaccinated. pic.twitter.com/BZdMyItmMW
— Johns. (@CricCrazyJohns) May 10, 2021
काही दिवसांपुर्वीच भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्माने कोरोनाविरुद्ध लढा देण्यासाठी केट्टो संस्थेसोबत एक अभियान राबवत २ कोटींची मदत केली होती. यासोबतच त्यांनी या अभियानाद्वारे एका आठवड्यात ७ कोटी जमा करण्याचे लक्ष्य ठेवले होते. त्यांच्या या अभियानाला लोक चांगला प्रतिसाद देत आहेत.
कोहलीने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यामधे तो आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा दिसून आले होते. या व्हिडिओमध्ये लोकांना आवाहन करत तो म्हणाला होता की, “मी आणि अनुष्काने, केट्टोसोबत मिळून एक मोहीम सुरू केली आहे. ज्यामुळे कोरोनाविरुद्ध लढा देण्यासाठी अधिक देणगी जमा करता येईल. त्यामध्ये आपण केलेल्या सहकार्याने आम्हाला आनंद होईल. आपण एकत्र येऊया आणि आपल्या आजूबाजूच्या कोरोनापिडीतांची सेवा करू आणि त्यांना मदत करूया.”