भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा वनडे सामना इंदोरच्या होळकर स्टेडियमवर खेळला गेला. मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून यापूर्वीच मालिका खिशात घातलेल्या भारतीय संघाने हा सामना 90 धावांनी आपल्या नावे करत पाहुण्या न्यूझीलंड संघाला क्लीन स्वीप केले. भारताने यासह घरच्या मैदानावर सलग सातव्यांदा वनडे मालिका आपल्या नावे केली.
3RD ODI. India Won by 90 Run(s) https://t.co/ojTz5RqWZf #INDvNZ @mastercardindia
— BCCI (@BCCI) January 24, 2023
हैदराबाद व रायपुर येथील पहिले दोन सामने जिंकत भारताने ही मालिका आधीच आपल्या नावे केली होती. इंदोर येथील या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा नाणेफेक जिंकण्यात यशस्वी ठरला नाही. त्यामुळे यजमान संघाला प्रथम फलंदाजी करण्याची संधी मिळाली. रोहित व शुबमन गिल या फॉर्ममध्ये असलेल्या जोडीने भारताला पुन्हा एकदा तुफानी सुरुवात दिली. रोहितने तब्बल 1100 दिवसांनी वनडे शतक साजरे केले. तर, गिलने मागील चार सामन्यातील तिसरे शतक झळकावले. त्यांनी अनुक्रमे 101 व 112 धावा केल्या. या दोघांच्या 212 धावांच्या भागीदारीनंतर इतर फलंदाज फारसा प्रभाव टाकू शकले नाहीत. विराट कोहली जम बसल्यानंतर 36 धावा करून परतला. शार्दुल ठाकूर याने महत्त्वपूर्ण 25 धावांचे योगदान दिले. हार्दिक पंड्याने महत्वपूर्ण अर्धशतक झळकावत भारताला 385 पर्यंत मजल मारून दिली.
या भल्यामोठ्या धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या न्यूझीलंडला हार्दिकने दुसऱ्याच चेंडूवर धक्का दिला. त्याने आक्रमक ऍलनचा त्रिफळा उडवला. दुसऱ्या गड्यासाठी सलामीवीर डेवॉन कॉनवे व हेन्री निकोल्सने 106 धावांची भागीदारी केली. निकोल्स (42) बाद झाल्यानंतर कॉनवेने डेरिल मिशेलसह 78 धावांची आणखी एक भागीदारी रचली. यादरम्यान कॉनवेने 71 चेंडूंमध्ये आपले तिसरे वनडे शतक झळकावले. त्याचवेळी शार्दुल ठाकूर याने केवळ दहा चेंडूच्या अंतराने मिशेल, कर्णधार टॉम लॅथम व ग्लेन फिलिप्स यांना बाद करत भारताला सामन्यात पुढे नेले. उमरानने कॉनवेला 138 धावांवर बाद करत न्यूझीलंडला बॅकफुटवर ढकलले. मायकेल ब्रेसवेल (26) व मिचेल सॅंटनर (34) यांनी थोडीफार झुंज देण्याचा प्रयत्न केला. मात्र, अखेरीस त्यांना 90 धावांनी मोठा पराभव स्वीकारावा लागला. भारतासाठी कुलदीप यादव व शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी तीन तर, युझवेंद्र चहलने दोन बळी मिळवले. शार्दुलला सामनावीर तर, शुबमन गिल याला मालिकावीर पुरस्कार देण्यात आला.
(India Clean Sweep Newzealand In ODI Series In Indore)
बातमी अपडेट होत आहे…