भारत हा देश विविधतेने नटलेला आहे, असे म्हटले जाते. त्यामुळे भारतीय क्रिकेट संघातही देशातील विविध राज्यातील, शहरातील खेळाडू खेळताना दिसतात. त्यातही क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या मुंबईतील एखादा तरी खेळाडू भारतीय संघात दिसतो. आजपर्यंत मुंबईतील अनेक खेळाडू भारतीय संघाकडून खेळले असून त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठे विक्रमही केले आहेत. यात सुनील गावसकर, अजित वाडेकर, सचिन तेंडुलकर, रवी शास्त्री, असे विविध पिढ्यांमधील खेळाडूंची अनेक नावे येतील. आत्ताही भारतीय संघ पाहिला तर त्यात अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, शिवम दुबे, श्रेयस अय्यर, पृथ्वी शॉ असे मुंबईचे खेळाडू खेळताना दिसतात.
विशेष म्हणजे भारतीय संघ आत्तापर्यंत क्रिकेट इतिहासात ५४२ कसोटी सामने खेळला आहे. यातील केवळ ५ सामन्यात भारताच्या अंतिम ११ जणांच्या संघात मुंबईच्या खेळाडूंचा समावेश नव्हता. म्हणजेच भारताने आत्तापर्यंत खेळलेल्या कसोटींमध्ये ०.९२ टक्के कसोटी भारतीय संघ मुंबईच्या खेळाडूंशिवाय खेळला आहे. या लेखात त्या ५ कसोटी सामन्यांचा आढावा घेतला आहे, ज्यात मुंबईचे खेळाडू भारताच्या अंतिम ११ जणांच्या संघाचा भाग नव्हते.
१. भारत विरुद्ध वेस्ट इंडिज, कोलकाता, १९६६
भारतीय संघ मुंबईच्या खेळाडूंशिवाय पहिला कसोटी सामना १९६६ साली वेस्ट इंडिज विरुद्ध खेळला होता. हा सामना कोलकातामध्ये झाला होता. या सामन्यात भारताचे नेतृत्व मंसूर अली खान पतौडी (नवाब पतौडी) करत होते. त्या सामन्याक वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना ३९० धावा केल्या होत्या. तर भारताने पहिल्या डावात केवळ १६७ धावा केल्याने वेस्ट इंडिजने भारताला फॉलोऑन दिला होता. भारताने दुसऱ्या डावातही फार काही चांगली कामगिरी केली नाही. भारतीय संघ १७८ धावांवर सर्वबाद झाला. त्यामुळे हा सामना वेस्ट इंडिजने १ डाव आणि ४५ धावांनी सहज जिंकला.
या सामन्यातील भारताचा अंतिम ११ जणांचा संघ –
बुधी कुंदेरन, मोट्गनहल्ली जैसिंहा, रुसी सुरती, चंदू बोर्डे, मंसूर अली खान पतौडी, हनुमंत सिंग, व्यंकटरमण सुब्रमण्य, श्रीनिवास व्यंकटराघवन, अब्बास अली बेग, बिशन सिंग बेदी, भागवत चंद्रशेखर
२. भारत विरुद्ध वेस्ट इंडिज, किंग्सटन, २०११
भारतीय संघाने १९६६ नंतर म्हणजेच तब्बल ४५ वर्षांनंतर दुसऱ्यांगा मुंबईतील खेळाडूंशिवाय कसोटी सामना खेळला. हा सामना किंग्सटन येथे २०११ मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध खेळला. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना सर्वबाद २४६ धावा केल्या होत्या. त्यानंतर फलंदाजीला उतरलेल्या वेस्ट इंडिजला पहिल्या डावात सर्वबाद १७३ धावाच करता आल्या. त्यामुळे भारताला ७३ धावांची आघाडी मिळाली. दुसऱ्या डावात भारताला २५२ धावा करता आल्या. त्यामुळे भारताने वेस्ट इंडिजला ३२६ धावांचे आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजला सर्वबाद २६२ धावाच करता आल्याने हा सामना भारताने ६३ धावांनी जिंकला.
या सामन्यातील भारताचा अंतिम ११ जणांचा संघ –
अभिनव मुकुंद, मुरली विजय, राहुल द्रविड, विराट कोहली, सुरेश रैना, व्हीव्हीएस लक्ष्मण, एमएस धोनी, हरभजन सिंग, प्रवीण कुमार, अमित मिश्रा, इशांत शर्मा
३. भारत विरुद्ध वेस्ट इंडिज, ब्रिजटाऊन, २०११
२०११ च्या वेस्ट इंडिज दौऱ्यातील सलग दुसरा कसोटी सामना देखील भारतीय संघाने मुंबईतील खेळाडूंशिवाय खेळला होता. या सामन्यातही भारताने प्रथम फलंदाजी करताना २०१ धावा केल्या होत्या. तर भारताने वेस्ट इंडिजला पहिल्या डावात १९० धावांवर रोखले होते आणि दुसरा डाव ६ बाद २६९ धावांवर घोषित करत वेस्ट इंडिजला २८१ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजला ७ बाद २०२ धावा करता आल्याने हा सामना अनिर्णित राहिला होता. या सामन्यात इशांत शर्माने १० विकेट्स घेतल्या होत्या.
या सामन्यातील भारताचा अंतिम ११ जणांचा संघ –
मुरली विजय, अभिनव मुकुंद, राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मण, विराट कोहली, सुरेश रैना, एमएस धोनी, हरभजन सिंग, प्रवीण कुमार, इशांत शर्मा, अभिमन्यू मिथुन
४. भारत विरुद्ध इंग्लंड, मुंबई, २०१६
मुंबईतील खेळाडूंशिवाय मुंबईत सामना खेळणे हे ऐकण्यासाठी जरासे विचित्र वाटते. पण असे झाले आहे, २०१६ मध्ये वानखेडे स्टेडियम, मुंबई येथे झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघात एकही मुंबईच्या खेळाडूचा समावेश नव्हता. या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना ४०० धावा केल्या होत्या. तर विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने पहिल्याच डावात सर्वबाद ६३१ धावा केल्या. विराटने २३५ धावांची द्विशतकी खेळी केली होती. तर इंग्लंडला दुसऱ्या डावात केवळ १९५ धावाच करता आल्याने हा सामना भारताने एक डाव ३६ धावांनी जिंकला.
या सामन्यातील भारताचा अंतिम ११ जणांचा संघ –
मुरली विजय, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), करुण नायर, आर अश्विन, पार्थिव पटेल, रवींद्र जडेजा, जयंत यादव, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव.
५. भारत विरुद्ध इंग्लंड, चेन्नई, २०१६
२०१६ ला झालेल्या इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना देखील भारताने मुंबईतील खेळाडूंशिवाय खेळला होता. हा सामना चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियममध्ये झाला होता. या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना सर्वबाद ४७७ धावा केल्या होत्या. त्यानंतर भारताने पहिला डाव करुण नायरच्या ३०३ धावांच्या त्रिशतकी खेळीच्या आणि केएल राहुलच्या १९९ धावांच्या खेळीच्या जोरावर ७ बाद ७५९ धावांवर घोषित केला. त्यामुळे भारताने २८२ धावांची मोठी आघाडी घेतली होती. तसेच नंतर इंग्लंडला दुसऱ्या डावात २०७ धावांवर सर्वबाद करत हा सामना एक डाव ७५ धावांनी भारताने जिंकला.
या सामन्यातील भारताचा अंतिम ११ जणांचा संघ –
मुरली विजय, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), करुण नायर, पार्थिव पटेल, आर अश्विन, रवींद्र जडेजा, अमित मिश्रा, उमेश यादव, इशांत शर्मा
ट्रेंडिंग लेख –
पंतप्रधानाच्या हत्येमुळे भारतीय संघाला सोडावा लागला पाकिस्तान दौरा अर्ध्यावर
जेव्हा एका कैद्याच्या समर्थनार्थ चक्क खेळपट्टीवर खड्डे करून भरण्यात आले होते तेल…
हे ५ क्रिकेटर आता खेळताय फक्त एक क्रिकेटर म्हणून, भविष्यात होणार आपल्याच संघाचे कर्णधार
महत्त्वाच्या बातम्या –
क्रिकेटमध्ये चुकीच्या समजल्या जाणाऱ्या गोष्टीला केकेआरचा कर्णधार म्हणतो योग्य, पण…
‘हा’ दिग्गज ऑस्ट्रेलियन झाला दिल्ली कॅपिटल्सचा गोलंदाजी प्रशिक्षक; करणार पाँटिंग, कैफसह कोचिंग
चाहत्यांना पराभव लागला जिव्हारी; पेटवून दिली कार, १४८ जणांना झाली अटक