इंग्लंडविरुद्ध नॉटिंघममध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या टी-२० सामन्यात सूर्यकुमार यादव याने शतक ठोकले. त्याने या सामन्यात ५५ चेंडूत ११७ धावा ठोकल्या. परंतु भारतीय संघाला विजय मात्र मिळवून देऊ शकला नाही. असे असले तरी, सूर्यकुमारच्या या शतकी खेळीमुळे भारतीय संघाच्या नावावर टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे.
उभय संघातील या सामन्याचा विचार केला, तर इंग्लडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मर्यादित २० षटकांमध्ये इंग्लंडने ७ विकेट्सच्या नुकसानावर २१५ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघ मात्र हे लक्ष्य गाठू शकला नाही. भारताने २० षटकांमध्ये ९ विकेट्स गमावल्या आणि १९८ धावांपर्यंत संघ मजल मारू शकला. मालिकेतील शेवटचा सामना इंग्लंडने १७ धावांनी जिंकला. मात्र, मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांतील विजयाच्या जोरावर भारताने १-२ अशी विजयी आघाडी घेतली.
सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) या सामन्यात शतक ठोकणारा एकमात्र खेळाडू होता. त्याच्या शतकी खेळीनंतर भारत टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये सर्वाधिक शतक साकारणारा संघ ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम न्यूझीलंडच्या नावावर होता. आता टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये भारतीय खेळाडूंची एकूण ९ शतके झाली आहे. तर न्यूझीलंडच्या खेळाडूंनी मात्र आतापर्यंत ८ आंतरराष्ट्रीय टी-२० शतके ठोकली आहेत.
भारतीय संघासाठी आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये सर्वाधिक शतक रोहित शर्माच्या बॅटमधून निघाली आहेत. त्याने ही कामगिरी ४ वेळा केली आहे. केएल राहुलने २, सुरेश रैनाने, दीपक हुड्डाने आणि सूर्यकुमार यादव यांनी प्रत्येकी एक-एक शतक केले आहे.
न्यूझीलंड संघाने केलेल्या ८ शतकांमध्ये कोलिन मुनरो ३, ब्रँडन मॅक्युलम २, मार्टिन गप्टिल २ आणि ग्लेन फिलिप्स एक शतक ठोकले आहे. ऑस्ट्रेलियन संघ या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियासाठी ग्लेन मॅक्सवेलने तीन, ऍरॉन फिंचने दोन, तसेच शेन वॉटसन आणि डेविड वॉर्नरने प्रत्येकी एक-एक शतक केले आहे.
टी-२० क्रिकेटमधील सर्वात वेगवान शतकाचा विचार केला, तर तीन फलंदाज संयुक्तरित्या पहिल्या क्रमांकावर आहेत. यामध्ये भारतीय कर्धणार रोहित शर्मा, दक्षिण आफ्रिकेचा डेविड मिलर आणि चेक रिपब्लिकसाठी एस विक्रमशेखरा या तिघांनी प्रत्येकी ३५ चेंडूत हे शतक ठोकले होते.