ICC Women’s T20 Ranking :- भारतीय महिला क्रिकेट संघाला श्रीलंकेविरुद्ध झालेल्या आशिया चषक 2024 (Women’s Asia Cup 2024) अंतिम सामन्यात 8 विकेट्सने पराभवाला सामोरे जावे लागले. परिणामी आठव्यांदा आशिया चषक जिंकण्याची संधी भारतीय संघाच्या हातून हुकली. मात्र या संपूर्ण स्पर्धेत भारताची सलामीवीर स्मृती मंधाना (Smriti Mandhana) हिची फलंदाजी कामगिरी दमदार राहिली. आता आशिया चषकातील चांगल्या खेळींचा स्मृतीला आयसीसी टी20 क्रमवारीत फायदा झाला आहे.
सलामीवीर आणि उपकर्णधार स्मृतीने श्रीलंकेविरुद्धच्या महिला आशिया चषक अंतिम सामन्यात अर्धशतकी खेळी केली होती. 47 चेंडूंचा सामना करताना 10 चौकारांच्या मदतीने तिने 60 धावा केल्या होत्या. तिच्या स्पर्धेतील संपूर्ण कामगिरीबद्दल बोलायचे झाल्यास, तिने 5 सामन्यांत एकूण 173 धावा जमवल्या. यात तिच्या 2 अर्धशतकांचाही समावेश आहे. आता याच खेळीचे बक्षिस स्मृतीला मिळाले आहे.
आयसीसी टी20 महिला फलंदाजांच्या ताज्या क्रमवारीत स्मृती एक स्थान वर चढून चौथ्या स्थानावर पोहोचली आहे. तिच्या खात्यात सध्या 743 गुण आहेत. तर अंतिम सामन्यात भारतीय संघाची कर्दनकाळ ठरलेली श्रीलंकेची कर्णधार चमिरा अट्टापट्टू हिलादेखील 3 स्थानांचा फायदा झाला आहे. 705 गुणांसह ती सहाव्या क्रमांकावर आली आहे. तिने या स्पर्धेत सर्वाधिक 304 धावा केल्या असून, यात तिच्या एक शतक आणि 2 अर्धशतकांचा समावेश आहे. याशिवाय ऑस्ट्रेलियाच्या बेथ मुनी (769 गुण) आणि ताहिला मॅकग्रा (762 गुण) या अव्वल दोन स्थानांवर कायम आहेत. वेस्ट इंडिजची हेली मॅथ्यूज (746 गुण) तिसऱ्या क्रमांकावर आहे.
गोलंदाज रेणुकाचीही भरारी
वेगवान गोलंदाज रेणुका सिंह ठाकूर गोलंदाजांमध्ये पाचव्या स्थानावर आहे. तिला 4 स्थानांचा फायदा झाला असून तिचे 722 गुण आहेत. रेणुकाने आशिया चषक स्पर्धेत एकूण 7 विकेट्स घेतल्या आहेत. इंग्लंडची सोफी एक्लेस्टोन 772 गुणांसह अव्वल, तर भारताची दीप्ती शर्मा 755 गुणांसह तिसऱ्या स्थानावर कायम आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
सूर्या शॉर्ट टर्म ऑप्शन…! टी20 मालिका जिंकूनही दिग्गजाने सूर्यकुमारच्या नेतृत्त्वावर उपस्थित केले प्रश्न
“पाकिस्तानात येऊन खेळून दाखवा” पाकिस्तानचा माजी खेळाडू हरभजनवर भडकला
ऑलिम्पिक गाजवणाऱ्या मनू भाकरचे प्रशिक्षक 3 वर्षांपासून बेरोजगार; म्हणाले, “मला माझा मासिक पगारही…”