ऑस्ट्रेलियाविरूद्ध पहिल्या दोन वनडे सामन्यात पराभूत झाल्यानंतर भारतीय संघाने वनडे मालिका गमावली आहे. या दौर्यावरील भारतीय संघाची सर्वात मोठी परीक्षा आगामी बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या रूपाने घेतली जाईल. चार कसोटी सामन्यांच्या या मालिकेला १७ डिसेंबरपासून ऍडलेड येथील दिवस-रात्र कसोटीने सुरुवात होईल. यावेळी भारतावर दबाव अधिक असेल. कारण नियमित कर्णधार विराट कोहली पहिल्या कसोटी सामन्यानंतर मायदेशी परतेल. अशा परिस्थितीत विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल क्लार्कने मोठे वक्तव्य केले आहे.
तो म्हणाला की, कर्णधार विराट कोहलीविना भारतीय संघाने कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाला पराभूत केले, तर या विजयाचा आनंद वर्षभर साजरा करावा.
… तर भारतीय संघाने वर्षभर आनंद साजरा करावा
क्लार्कने बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमधील विजेत्याचा अंदाज लावताना सांगितले, “मी या प्रश्नावर म्हणेल, जर भारतीय संघ विराटच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलियाला कसोटी मालिकेत पराभूत करू शकला, तर त्यांनी वर्षभर याचा आनंद साजरा करावा. भारतीय संघाने सकारात्मक रहावे. त्यांना आत्मविश्वास हवा की, आपण ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात पराभूत करू शकतो.”
विराटच्या जागी कोण?
ऑस्ट्रेलियाचा विश्वविजेता कर्णधार राहिलेल्या क्लार्कने इंडिया टुडेशी भारत-ऑस्ट्रेलिया मालिकांविषयी विस्तृत चर्चा केली. क्लार्क म्हणाला, “सध्याच्या भारतीय संघात विराट दोन जबाबदाऱ्या सांभाळतो. तो भारताचा सर्वोत्तम फलंदाज आहे. तसेच कर्णधारपदाची अतिरिक्त जबाबदारी त्याच्या खांद्यावर असते. त्याच्या जागी तशीच कामगिरी कोण करणार? हा मोठा प्रश्न आहे.”
राहुल खेळू शकतो चौथ्या क्रमांकावर
क्लार्कने भारताच्या मर्यादित षटकांच्या संघाचा नवा उपकर्णधार केएल राहुल यांची प्रशंसा केली. क्लार्क म्हणाला, “मला वाटते विराट भारतात आल्यानंतर, राहुलने त्याच्या जागी चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करावी. तो त्याच्याच शैलीचा फलंदाज आहे. तो यापूर्वी ऑस्ट्रेलियन परिस्थितीमध्ये खेळला आहे. त्याचा अनुभवही वाढलाय. तो नक्कीच उत्तम कामगिरी करेल. मात्र, विराटसारख्या खेळाडूची जागा घेणे सोपे नसते.”
अजिंक्य रहाणे उत्तम कर्णधार
क्लार्कने भारताच्या कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेचे देखील कौतुक केले. तो म्हणाला, “मला अजिंक्यची नेतृत्त्वशैली खूप आवडते. तो एक उत्तम कर्णधार आहे. त्याला क्रिकेटची चांगली समज असल्याने, तो चांगली रणनिती बनवू शकतो. विराट नसल्याने अजिंक्य व भारतीय संघाकडे इतिहास रचण्याची संधी चालून आलेली आहे.”
मायकेल क्लार्क ऑस्ट्रेलियाच्या यशस्वी कर्णधारांपैकी एक मानला जातो. ऑस्ट्रेलियाने जिंकलेल्या २०१५ विश्वचषकावेळी तो ऑस्ट्रेलियाचा कर्णधार होता. २०११-२०१२ बॉर्डर- गावसकर ट्रॉफीमध्ये त्याने ३२९ धावांची ऐतिहासिक खेळी केली होती. त्या मालिकेत त्याने सर्वाधिक धावा काढत मालिकावीराचा पुरस्कार पटकावला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
‘याचे निर्णय माझ्या समजण्या पलिकडचे’, विराटवर कडाडला माजी भारतीय कर्णधार
“वॉर्नर दीर्घकाळ दुखापतग्रस्त राहिल्यास भारतीय संघाला फायदाच होईल”
ट्रेंडिंग लेख-
भारतीय गोलंदाजांना रडकुंडीला आणत सर्वाधिक शतके ठोकणारे ३ धडाकेबाज फलंदाज
या ५ कारणांमुळे भारताचा ऑस्ट्रेलिया विरुद्ध सलग दुसऱ्या सामन्यात पराभव
क्रिकेट जगतातील ५ सर्वोत्तम गोलंदाजी ‘रन-अप’, घातक गोलंदाजीसाठी व्हायची मदत