इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात एक डाव आणि ७६ धावांनी दारुण पराभव स्वीकारल्यानंतर भारतीय संघाला जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत मोठे नुकसान झाले. लीड्स कसोटीत पराभव झाल्यानंतर भारतीय संघ गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावरून थेट तिसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. भारताच्या पराभवाचा सर्वाधिक फायदा पाकिस्तानला झाला असून ते पहिल्या क्रमांकावर पोहोचले आहेत.
अशी बदलली गुणतालिका
तिसऱ्या कसोटी सामन्यातील पराभवानंतर आता भारतीय संघाच्या विजयाची टक्केवारी ३८.८८ वर घसरली. त्याचवेळी, पाकिस्तानने ५० टक्केवारीसह पहिल्या क्रमांकाच्या खुर्चीवर कब्जा केला आहे. इंग्लंडने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या टप्प्यात भारताला पराभूत करून विजयाचे खाते उघडले. आता ते चौथ्या क्रमांकावर पोहोचले आहेत. लॉर्ड्स कसोटी जिंकल्यानंतर भारतीय संघ पहिल्या क्रमांकावर पोहोचला होता. पाकिस्तानसह वेस्ट इंडिजच्या विजयाची टक्केवारीही ५० आहे.
इतर संघ खेळले नाहीत कसोटी
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या हंगामात भारत, इंग्लंड, पाकिस्तान व वेस्ट इंडीज या संघांव्यतिरिक्त इतर संघ कसोटी सामने खेळले नाहीत. वेस्ट इंडीज आणि पाकिस्तान यांच्या दरम्यानची दोन कसोटी सामन्यांची मालिका एक-एक अशा बरोबरीत सुटली होती. इंग्लंड आणि भारत यांच्यादरम्यानच्या मालिकेतील उर्वरित सामने ओव्हल व ओल्ड ट्रॅफर्ड येथे खेळवले जाणार आहेत.
तिसऱ्या सामन्यात इंग्लंडचा शानदार विजय
लॉर्ड्स कसोटीत पराभूत झाल्यानंतर यजमान संघ लीड्स कसोटी जिंकून मालिकेत बरोबरी साधण्याच्या उद्देशाने उतरला होता. इंग्लिश गोलंदाजांनी भारताचा पहिला डाव अवघ्या ७८ धावांवर गुंडाळला. इंग्लंडचा कर्णधार जो रूटने पुन्हा एकदा जबाबदारीने खेळ करत शतक झळकावून इंग्लंडला ३५४ धावांची आघाडी मिळवून दिली. त्यानंतर भारताच्या दुसऱ्या डावात ओली रॉबिन्सन व क्रेग ओव्हरटन यांनी अप्रतिम गोलंदाजी करत इंग्लंडला एक डाव व ७६ धावांनी विजय मिळवून दिला. सामन्यात ७ बळी मिळवणाऱ्या रॉबिन्सनला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
महत्त्वाच्या बातम्या-
तिसऱ्या कसोटीनंतर उभय कर्णधारांनी दिल्या ‘अशा’ प्रतिक्रिया, विराट म्हणाला…
जो रुटच इंग्लंडचा ‘नंबर वन’ कर्णधार! वॉन, स्ट्रॉससारखे दिग्गजही पडले मागे