पॅरिस ऑलिम्पिक 2024 सुरू झाल्यापासून गैरव्यवस्थापनाच्या अनेक बातम्या समोर येत आहेत. आता पुन्हा एकदा अशीच बातमी समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये भारतीय खेळाडूंच्या रुममध्ये एसी नव्हते, ज्यामुळे खेळाडूंना अनेक समस्यांना सामोरं जावं लागत होतं. त्यानंतर आता भारत सरकारनं स्वखर्चानं खेळाडूंसाठी एसीची व्यवस्था केली आहे.
यावेळी पॅरिसमधील वातावरण खूप गरम आहे. त्यातच ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये ज्या खोल्यांमध्ये भारतीय खेळाडू मुक्कामी आहेत, तेथे एसी नाहीत. यानंतर भारतीय क्रीडा मंत्रालयानं सर्व खेळाडूंसाठी एसीची व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला. भारतीय क्रीडा प्राधिकरण, भारतीय ऑलिम्पिक संघटना आणि फ्रान्सच्या भारतीय दूतावासानं आपापसात चर्चा करून हा निर्णय घेतला आहे.
शुक्रवारी सकाळी 11 वाजता एक बैठक झाली. या बैठकीत खेळाडूंना भेडसावणाऱ्या समस्यांचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. बैठकीत फ्रान्समधील भारतीय दूतावास खेळाडूंसाठी एसी उपलब्ध करून देणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर सर्व खेळाडूंच्या खोल्यांमध्ये पोर्टेबल एसी बसवण्यात आले. याचा संपूर्ण खर्च भारत सरकारचं क्रीडा मंत्रालय उचलणार आहे.
पॅरिसमध्ये सध्या काही ठिकाणी तापमान 40 अंशांवर पोहोचलं आहे. ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन्सचा अंतिम सामना होत असताना सर्व नेमबाजांना उष्णतेमुळे अनेक समस्यांना तोंड द्यावं लागलं होतं. भारताचा कांस्यपदक विजेता स्वप्नील कुसाळे देखील उष्णतेशी झुंजताना दिसला होता.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंत अनेक ठिकाणी गैरव्यवस्थापन पाहायला मिळालं आहे. काही दिवसांपूर्वीच सीन नदीचं पाणी दूषित झाल्यामुळे खेळाडूंना त्यांच्या इव्हेंटसाठी सराव करता येत नसल्याची बातमी आली होती. यामुळे त्यांचा तयारीवर मोठा परिणाम झाला होता. याशिवाय भारतीय खेळाडूंकडून खाण्याच्या तक्रारीही आल्या आहेत. बॉक्सर अमित पंघाल आपल्या आहारात फक्त डाळ आणि रोटी घेतो. मात्र हे अन्न ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये उपलब्ध नाही. त्यामुळे पंघाल याला बाहेरून अन्न मागवावं लागतंय.
हेही वाचा –
दीपिका कुमारीचं स्वप्न पुन्हा भंगलं, तिरंदाजीतील भारताचं आव्हान संपुष्टात
लक्ष्य सेनची ‘लक्षवेधी’ कामगिरी, ऑलिम्पिकच्या 128 वर्षांच्या इतिहासात असं करणारा पहिलाच भारतीय!
मोठी बातमी! ऑलिम्पिक दरम्यान भारतीय खेळाडूचा पॅरिसमध्ये कार अपघात, कुटुंबीयही होते सोबत