श्रीलंकेविरुद्धचा पहिला कसोटी सामना भारतासाठी अत्यंत खास आहे. भारतीय संघ कोणत्याही परिस्थितीत हा कसोटी सामना जिंकू इच्छितो. कारण, भारताचा हा 600 वा कसोटी सामना असणार आहे. कसोटी क्रिकेटमध्ये या टप्प्यापर्यंत पोहोचणारा भारत जगातील तिसरा देश ठरेल. आतापर्यंत सर्वाधिक कसोटी सामने खेळण्याचा विक्रम इंग्लंडच्या नावावर आहे. 1877 पासून आतापर्यंत इंग्लंडने 1077 कसोटी सामने खेळले आहेत. तर भारताने 1932 पासून आतापर्यंत 599 कसोटी सामने खेळले आहेत. या काळात भारताची कामगिरी कशी राहिली ते जाणून घ्या.
भारताच्या श्रीलंका दौऱ्याची सुरुवात 15 ऑगस्टला पहिल्या कसोटी सामन्याने होईल. भारतीय संघ श्रीलंकेत दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी गेला आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ श्रीलंकेत पोहोचला असून, पहिल्या कसोटी सामन्याच्या तयारीला लागला आहे.
भारतीय संघाने आपला पहिला कसोटी सामना 1932 मध्ये खेळला होता. आतापर्यंत भारतीय संघाने एकूण 599 कसोटी सामने खेळले आहेत. या दरम्यान भारताने 186 कसोटी सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे, तर 188 कसोटी सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला आहे. भारताचे 224 कसोटी सामने ड्रॉ राहले आहेत, तर एक कसोटी सामना टाय झाला आहे.






