राजकोट । आज भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसऱ्या टी20 सामन्यात न्यूजीलँड संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 196 धावा केल्या. भारतीय संघासमोर 20 षटकांत 197 धावांचे लक्ष आहे.
नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या न्यूझीलंडच्या सलामीवीरांनी जबदस्त खेळी करताना 11.1 षटकांत 105 धावांची सलामी दिली. मार्टिन गप्टिलच्या रूपाने न्यूझीलंडच्या पहिली विकेट गेली. त्याने 41 चेंडूत 45 धावा केल्या.
अन्य सलामीवीर कॉलिन मुनरोने मात्र चांगली फलंदाजी करताना 58 चेंडूत 109 नाबाद धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 7 चौकार आणि 7 षटकार खेचले. तर टॉम ब्रूसनेही 12 चेंडूत 18 नाबाद धावा करत त्याला चांगली साथ दिली.
या शतकी खेळीबरोबर आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये दोन शतके करणारा मुनरो केवळ चौथा खेळाडू बनला. तर भारतात टी२० मध्ये शतक करणाराही तो चौथा खेळाडू बनला.
त्यानंतर मैदानात आलेल्या कर्णधार केन विलियम्सनला विशेष चमक दाखवता आली नाही. त्याला पदार्पण करत असलेल्या मोहम्मद सिराजने 12 धावांवर रोहित शर्माकरवी झेलबाद केले.
भारताकडून युझवेन्द्र चहल आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.