ऍडलेड। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात उद्या(15 जानेवारी) दुसरा वनडे सामना ऍडलेड ओव्हल मैदानावर पार पडणार आहे. पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 34 धावांनी विजय मिळवून तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे दुसरा सामना भारतासाठी करो या मरोचा सामना असणार आहे.
या सामन्यात भारतीय संघात एक किंवा दोन खेळाडूंचे बदल होऊ शकतात. या संघात हार्दिक पंड्याच्या ऐवजी विजय शंकरची निवड झाली आहे. मात्र तो संघात उशीरा पोहचणार असल्याने अंतिम 11 च्या निवडीसाठी उपलब्ध असण्याची शक्यता कमी आहे.
या खेळाडूंना मिळू शकते अंतिम 11 जणांच्या संघात संधी –
सलामीवीर – रोहित शर्मा आणि शिखर धवन
भारतासाठी मागील काही वर्षात रोहित आणि शिखर यांनी सलामीला फलंदाजी करताना चांगली कामगिरी केली आहे. तसेच या दोघांना ऑस्ट्रेलियामध्ये खेळण्याचा अनुभवही आहे. मात्र शिखर सिडनी वनडेमध्ये लवकर बाद झाला होता. पण तरीही त्याला सलामीला संधी देण्यात येण्याची दाट शक्यता आहे.
तसेच रोहितने या वनडे मालिकेची सुरुवात दमदार केली आहे. त्याने सिडनी वनडेत शतकी खेळी केली होती. त्यामुळे हे दोघेच सलामीला फलंदाजी करणार असल्याचे जवळजवळ पक्के आहे.
मधली फळी – विराट कोहली, अंबाती रायडू, एमएस धोनी, दिनेश कार्तिक
भारताचा कर्णधार विराट कोहली ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी झालेल्या विंडिज विरुद्धच्या वनडे मालिकेत चांगलाच फॉर्ममध्ये होता. तसेच त्याने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी20 मालिकेत शेवटच्या सामन्यात 61 धावांची खेळी केली होती. पण त्याला सिडनी वनडेत खास काही करता आले नव्हते. पण तो भारतीय संघाचा महत्त्वाचा फलंदाज आहे. त्यामुळे त्याची कामगिरी महत्त्वाची ठरणार आहे.
अंबाती रायडूने मागील काही महिन्यात चांगली कामगिरी केली आहे. त्याने विंडिजविरुद्धही शतक करत चौथ्या स्थानावर फलंदाजी करण्यासाठी प्रबळ दावेदार असल्याचे सिद्ध केले होते. मात्र पहिल्या वनडेत त्याला एकही धाव करण्यात अपयश आले. तसेच त्याची गोलंदाजी अवैध असल्याचाही रिपोर्ट देण्यात आला आहे. पण तरीही त्याला अजून एक संधी दिली जाऊ शकते.
भारताचा यष्टीरक्षक एमएस धोनीने या वर्षाची सुरुवात चांगली केली आहे. त्याने सिडनी वनडेमध्ये 51 धावांची खेळी करताना रोहित बरोबर 137 धावांची भागीदारीही केली होती. त्यामुळे ऍडलेड वनडेतही त्याच्या कामगिरीकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे.
याबरोबरच त्याची मधल्या फळीतील कामगिरी भारतासाठी महत्त्वाची ठरणार आहे. तसेच तो यष्टीरक्षणाचीही जबाबदारी सांभाळणार आहे. यष्टीरक्षण करताना त्याची कामगिरी चांगली झाली आहे.
तसेच कार्तिकने सिडनी वनडेत धोनी बाद झाल्यानंतर रोहितला चांगली साथ दिली होती. पण त्याला जास्त धावा करण्यात अपयश आले होते. मात्र त्याची फलंदाजी भारतासाठी महत्त्वाची ठरु शकते. तो तळातल्या फलंदाजांच्या मदतीनेही भारतासाठी धावा उभारण्यात मोलाचा वाटा उचलू शकतो.
अष्टपैलू – रविंद्र जडेजा
भारताकडे अष्टपैलू म्हणून रविंद्र जडेजा हा चांगला पर्याय आहेत. तसेच तो तळातली फलंदाजीही सांभाळू शकतो. त्याचबरोबर त्याने सिडनी कसोटीत गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी केली होती. भारताकडे अष्टपैलू म्हणून हार्दिक पंड्याचा पर्याय उपलब्ध नसल्याने जडेजाची अष्टपैलू कामगिरी महत्त्वाची ठरणार आहे.
गोलंदाज – भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, मोहम्मद शमी आणि युजवेंद्र चहल
ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी मालिकेत भारतीय गोलंदाजांनी सर्वांनाच प्रभावित केले आहे. त्यामुळे वनडे मालिकेतही त्यांच्याकडून ही अपेक्षा असेल.
कुलदीपने सिडनी वनडेत चांगली गोलंदाजी केली होती. त्यामुळे त्याच्याकडून या सामन्यातही तशीच अपेक्षा असेल. त्याला जडेजाची चांगली साथ मिळेल.
वेगवान गोलंदाजीची जबाबदारी भुवनेश्वर, शमी यांच्यावर असणार आहे. भुवनेश्वरने सिडनी वनडेत चांगली सुरुवात केली होती. पण त्याला शेवटच्या षटकात धावांची गती ठेवता आली नाही. तर शमीला एकही विकेट घेता आली नव्हती पण त्याने त्याच्या गोलंदाजीतील इकोनॉमी रेट चांगला होता.
त्याचबरोबर खलील अहमदच्या ऐवजी युजवेंद्र चहलला या सामन्यात संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. त्याची कुलदीप बरोबरील गोलंदाजीतील भागीदारी महत्त्वाची ठरु शकते. या दोघांनी याआधीही एकत्र चांगली गोलंदाजी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–होय, विश्वचषकासाठी धोनीबरोबर हा खेळाडू जाणार इंग्लंडला
–कांगारूंच्या भूमीत कांगारुंच्या महान खेळाडूचा विक्रम मोडणार रोहित
–ऑस्ट्रेलियाच्या या वेगवान गोलंदाजाने गमतीने म्हटलेली ही गोष्ट उतरली सत्यात!