भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच कसोटी सामन्यांची बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी मालिका 22 नोव्हेंबरपासून पर्थ येथे सुरू होणार आहे. भारताला गेल्या दोन मालिकांमध्ये ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्यात यश आलं असून यावेळी टीम इंडिया विजयाची हॅट्ट्रिक करेल, अशी आशा चाहत्यांना आहे. मात्र भारतीय संघासाठी हे इतकं सोपं नसेल, कारण एकीकडे सध्याचा ऑस्ट्रेलियन संघ विजयी रथावर स्वार आहे तर दुसरीकडे भारताला घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत 0-3 असा पराभवाचा सामना करावा लागला आहे.
शेवटचे दोन दौरे सोडले तर भारताचा ऑस्ट्रेलियातील रेकॉर्ड फारसा चांगला नाही. भारतीय संघ 1947 पासून ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जात आहे, जेथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात एकूण 52 कसोटी सामने खेळल्या गेले. यापैकी भारतानं केवळ 9 सामने जिंकले असून 30 सामने गमावले आहेत. 13 सामने अनिर्णित राहिले.
(1) 1947-48: ऑस्ट्रेलियानं पाच सामन्यांची मालिका 4-0 ने जिंकली – भारतीय संघानं स्वातंत्र्यानंतर चार महिन्यांनी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला होता. त्या ऑस्ट्रेलियन संघात सर डोनाल्ड ब्रॅडमन (178.75 च्या सरासरीने 715 धावा) आणि वेगवान गोलंदाज रे लिंडवॉल (18 विकेट) यांचा समावेश होता. भारताकडून विजय हजारे यांनी सर्वाधिक 429 धावा केल्या होत्या.
(2) 1967-68: ऑस्ट्रेलियानं पाच सामन्यांची मालिका 4-0 ने जिंकली – एमएल जयसिम्हाच्या 101 धावांच्या जोरावर भारतीय संघ ब्रिस्बेनमध्ये 394 धावांच्या लक्ष्याजवळ पोहोचला होता, मात्र संघ 35 धावांनी पराभूत झाला. मन्सूर अली खान पतौडीच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाची कामगिरी सरासरीची होती. ऑफस्पिनर इरापल्ली प्रसन्नानं 25 विकेट घेतल्या.
(3) 1977-78: ऑस्ट्रेलियानं पाच सामन्यांची मालिका 3-2 अशी जिंकली – मेलबर्न आणि सिडनी येथील तिसरी आणि चौथी कसोटी भारतानं जिंकली. ॲडलेडमध्ये 493 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मोहिंदर अमरनाथ, गुंडप्पा विश्वनाथ, दिलीप वेंगसरकर आणि सय्यद किरमाणी यांनी शतकी खेळी केली पण संघ 47 धावांनी पराभूत झाला. फिरकीपटू बिशनसिंग बेदीनं 31 बळी घेतले.
(4) 1980-81: तीन सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत सुटली – कपिल देवच्या पाच विकेट आणि विश्वनाथच्या शतकाच्या जोरावर भारतानं मेलबर्नमधील तिसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा पराभव करून मालिका अनिर्णित ठेवली. ऑस्ट्रेलियन संघ 83 धावांवर ऑलआऊट झाला होता.
(5) 1985-86: तीन सामन्यांची मालिका 0-0 अशी बरोबरीत – या मालिकेत सुनील गावस्कर (352 धावा) यांनी सर्वाधिक धावा केल्या. भारताची सर्वात कमी धावसंख्या 445 धावा होती. ग्रेग चॅपेल, रॉड मार्श, डेनिस लिली आणि जेफ थॉमसन यांच्या निवृत्तीनंतर ऑस्ट्रेलियन संघ भारताला कोणतंही आव्हान देऊ शकला नाही.
(6) 1991-92: ऑस्ट्रेलियानं पाच सामन्यांची मालिका 4-0 ने जिंकली – युवा सचिन तेंडुलकरनं पर्थमध्ये शतक झळकावलं पण ॲलन बॉर्डरच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियन संघानं मालिका सहज जिंकली. या मालिकेत महान लेगस्पिनर शेन वॉर्नच्या गोलंदाजीची झलक जगानं प्रथमच पाहिली.
(7) 1999-2000: ऑस्ट्रेलियानं तीन सामन्यांची मालिका 3-0 ने जिंकली – भारतीय संघ सहा डावांत 300 धावाही पार करू शकला नाही. ग्लेन मॅकग्रानं 18 विकेट घेतल्या.
(8) 2003-04: चार सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत – ॲडलेडमधील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाचा चार विकेट राखून पराभव करत 1-0 अशी आघाडी घेतली. या सामन्यात अजित आगरकर आणि राहुल द्रविड यांनी उत्कृष्ट कामगिरी केली होती. मात्र एमसीजी येथील दुसरी कसोटी नऊ गडी राखून जिंकत ऑस्ट्रेलियानं बरोबरी साधली.
(9) 2007-08: ऑस्ट्रेलियानं चार सामन्यांची मालिका 2-1 ने जिंकली – सिडनी कसोटीत स्टीव्ह बकनरच्या अंपायरिंगच्या चुका आणि हरभजन सिंग आणि अँड्र्यू सायमंड्स यांच्यातील ‘मंकीगेट’ वादानंतर, भारतानं वादग्रस्त पर्थ कसोटीत विजयाची नोंद केली होती.
(10) 2011-12: ऑस्ट्रेलियानं चार सामन्यांची मालिका 4-0 ने जिंकली – महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघात अनेक जुने खेळाडू होते. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना सळो की पळो कराऱ्या द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मणची ही शेवटची मालिका होती.
(11) 2014-15: ऑस्ट्रेलियानं चार सामन्यांची मालिका 2-0 ने जिंकली – मेलबर्नमधील तिसरी कसोटी अनिर्णित राहिल्यानंतर धोनीनं कसोटी कर्णधारपद सोडले. विराट कोहली सिडनीमध्ये कर्णधार झाला आणि कर्णधार म्हणून पहिल्याच डावात त्यानं 147 धावा केल्या.
(12) 2018-19: भारतानं चार सामन्यांची मालिका 2-1 ने जिंकली – कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासोबत भारतीय संघ ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकणारा पहिला आशियाई संघ ठरला. भारतानं ॲडलेड आणि मेलबर्न येथील कसोटी सामने जिंकले. या मालिकेत चेतेश्वर पुजारानं 521 धावा केल्या तर जसप्रीत बुमराहनं 21 बळी घेतले होते.
(13) 2020-21: भारतानं चार सामन्यांची मालिका 2-1 ने जिंकली – खेळाडूंच्या दुखापतींमुळे त्रस्त झालेला भारतीय संघ ॲडलेडमध्ये सर्वात कमी 36 धावांवर बाद झाला होता. यानंतर मेलबर्न आणि ब्रिस्बेनमध्ये रिषभ पंतच्या रूपानं संघाला नवा हिरो मिळाला तर पुजारा आणि रविचंद्रन अश्विन यांनीही चमकदार कामगिरी केली. कोहली आपल्या पहिल्या मुलाच्या जन्मासाठी भारतात परतल्यानंतर अजिंक्य रहाणेनं भारतीय संघाचं शानदार नेतृत्व केलं.
हेही वाचा –
चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! रोहित शर्मा या दिवशी ऑस्ट्रेलियात दाखल होणार
लिस्ट जाहीर! बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये हे दिग्गज कॉमेंट्री करताना दिसतील
भारतीय संघाला मोहम्मद शमीची आवश्यकता नाही? दिग्गज खेळाडूने सांगितली रिप्लेसमेंट