भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (INDW Vs AUSW) यांच्यात शनिवारी (१९ मार्च) आयसीसी महिला वनडे विश्वचषक २०२२ चा (ICC Women ODI World Cup) अठरावा सामना झाला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ६ विकेट्स राखून विजय मिळवला. भारताचा हा विश्वचषकातील तिसरा पराभव होता. मात्र हा सामना बऱ्याच अंगांनी खास राहिला. या सामन्यादरम्यान एक ऐतिहासिक विक्रमही झाला. तो असा की, या सामन्यादरम्यान ३ शतकी भागीदारी पाहायला मिळाल्या. महिला वनडे विश्वचषकात पहिल्यांदाच कोणत्या सामन्यात ३ शतकी भागीदारी (3 Century Partnership) झाल्या आहेत.
या सामन्यादरम्यान पहिली शतकी भागीदारी झाली भारतीय संघाकडून. भारताकडून कर्णधार मिताली राज (Mithali Raj) आणि यस्तिका भाटीया यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी झाली. त्यांनी दोघींनी १५४ चेंडूंमध्ये १३० धावांची शानदार भागीदारी केली होती.
त्यांच्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी हा पराक्रम केला. ऑस्ट्रेलियाकडून रिचेल हायनेस आणि एलिसा हिली यांनी पहिल्या विकेटसाठी ११७ चेंडूंमध्ये १२१ धावांची भागीदारी केली होती. हिलीची विकेट गेल्याने त्यांची भागीदारी तुटली. त्यानंतर पुन्हा तिसऱ्या विकेटसाठी ऑस्ट्रेलियाची कर्णधार मेग लॅनिंग आणि एलिसा पेरी यांच्यातही शतकी भागीदारी झाली. त्यांनी तिसऱ्या विकेटसाठी १२३ चेंडूंमध्ये १०३ धावा जोडल्या होत्या.
यापूर्वी महिला वनडे विश्वषकादरम्यान कधीही कोणत्याही सामन्यात ३ शतकी भागीदारी झाल्या नाहीत. त्यामुळे हा एक विश्वविक्रम आहे.
असा झाला सामना
दरम्यान सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, भारतीय महिलांनी फलंदाजीत शानदार प्रदर्शन केले, मात्र गोलंदाजांना आव्हानाचा बचाव करण्यात अपयश आल्याने भारतीय संघाला हा सामना गमवावा लागला. भारताकडून फलंदाजी करताना कर्णधार मितालीसह यस्तिका भाटिया आणि हरमनप्रीत कौर यांनीही अर्धशतके केली होती. यस्तिकाने ६ चौकारांच्या मदतीने ५९ धावा केल्या होत्या. तर हरमनप्रीतनेही नाबाद ५७ धावा केल्या होत्या.
प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाकडून मेग लॅनिंग हिचे शतक केवळ ३ धावांनी हुकले. ती १३ चौकारांच्या मदतीने ९७ धावा करून बाद झाली. तर यष्टीरक्षक एलिसा हिली हिने ७२ धावा जोडल्या. तसेच सलामीवीर रिचेल हायनेस हिनेही ४३ धावांचे योगदान दिले. याव्यतिरिक्त शेवटच्या षटकात बेथ मूनी हिनेही २० चेंडूंमध्ये ताबडतोब ३० धावांची खेळी केल्यामुळे ऑस्ट्रेलियाने ४९.३ षटकातच हा सामना जिंकला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवासाठी मिताली राजने या गोष्टीला धरले जबाबदार; म्हणाली…
‘रावळपिंडी एक्सप्रेस’चे धक्कादायक वक्तव्य; म्हणाला, ‘सेहवाग मला भेटला, तर त्याला मी खूप मारेल’
भारताच्या ‘या’ ३ फलंदाजांचा नादच खुळा! वनडे कारकिर्दीत एकही गोलंदाज घेऊ शकला नाही त्यांची विकेट