गुरुवारपासून (१७ डिसेंबर) भारत व ऑस्ट्रेलिया संघात ४ कसोटी सामन्यांची बहुप्रतिक्षित मालिका सुरू होणार आहे. सर्व क्रिकेट रसिक या मालिकेची आतुरतेने वाट बघत होते. २०१८-१९ साली झालेल्या मालिकेत भारताने ७१ वर्षांनंतर प्रथमच ऑस्ट्रेलियामध्ये २-१ ने मालिका विजय मिळवला होता. या वेळी देखील सर्वांना भारतीय संघाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. अशा परिस्थितीत ऍडलेड येथे होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात विराटकडून उत्तम कामगिरीची अपेक्षा आहे. एकीकडे विराटला चांगली कामगिरी करण्याचे दडपण असले, तरीही दुसरीकडे त्याला सचिन तेंडुलकर व ब्रायन लारा या दिग्गजांचे २ मोठे विक्रम आपल्या नावे करण्याची संधी देखील आहे.
असे आहेत ते दोन विक्रम-
१. ब्रायन लाराचा ऍडलेड मैदानावरील सर्वाधिक धावा जमवण्याचा विक्रम
वेस्ट इंडिजचा महान फलंदाज ब्रायन लाराच्या नावे ऍडलेड मैदानावर पाहुण्या संघाच्या फलंदाजाने सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आहे. लाराने ४ सामन्यात ६१० धावा केलेल्या होत्या. विराटला लाराचा हा विक्रम मोडण्यासाठी १७९ धावांची गरज आहे. विराटने ऍडलेड येथे ३ शतकांच्या मदतीने ४३१ धावा केलेल्या आहेत.
२. सचिनचा ऑस्ट्रेलियामध्ये सर्वाधिक शतकांचा विक्रम
भारताचा माजी कर्णधार सचिन तेंडुलकरने ऑस्ट्रेलियामध्ये पाहुण्या संघाकडून खेळताना सर्वाधिक शतके केली आहेत. सचिनने ऑस्ट्रेलियामध्ये ६ शतकांसह ५३ च्या सरासरीने १८०९ धावा केल्या आहेत. विराटने ऑस्ट्रेलियामध्ये १२ सामन्यात ६ शतकांसह १२७४ धावा केल्या आहेत. विराटने जर पहिल्या सामन्यात शतकी खेळी केली, तर तो सर्वाधिक शतके करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पहिल्या क्रमांकावर असेल.
भारताचा कर्णधार विराट कोहली हा पहिला कसोटी सामना खेळल्यानंतर पालकत्व रजा घेवून भारतात परतणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“विराटच्या अनुपस्थितीत रहाणे…”, सचिन तेंडुलकरचे महत्वपूर्ण विधान
आम्ही ‘त्यांचा’ सामना करण्यास उत्सुक, कर्णधार कोहलीकडून मुख्य प्रतिस्पर्ध्यांचा नावानिशी उल्लेख
कोहली-स्मिथ दरम्यान रंगला प्रश्नोत्तरांचा खेळ; विराटने दिली दिलखुलास उत्तरे