अहमदाबाद। इंग्लंड संघ सध्या भारत दौऱ्यावर असून आता कसोटी मालिकेनंतर भारताशी टी२० मालिकेत दोन हात करण्यास सज्ज झाला आहे. या दोन संघात शुक्रवारपासून(१२ मार्च) ५ सामन्यांची टी२० मालिका रंगणार आहे.
अव्वल दोन संघात सामना
सध्या टी२० क्रमवारीत इंग्लंड अव्वल क्रमांकावर तर भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे ही मालिका अव्वल दोन संघात रंगणार असल्याने रंगतदार होईल, अशी सर्वांना अपेक्ष असेल. तसेच गेल्या काही वर्षात इंग्लंडने मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे यजमान भारतासमोर ओएन मॉर्गन कर्णधार असलेला इंग्लंड संघ तगडे आव्हान ठेवू शकतो.
असे असले तरी भारतानेही मागील काही वर्षापासून टी२०मध्ये चांगली कामगिरी केली आहे. तसेच ही टी२० मालिका खेळण्याआधी भारताने इंग्लंडला कसोटी मालिकेत ३-१ अशा फरकाने पराभूत केले असल्याने भारताकडे आत्मविश्वास आहे.
भारत आणि इंग्लंड संघाचा टी२० सामन्यांचा इतिहास
भारत आणि इंग्लंड संघ आत्तापर्यंत टी२० क्रिकेटमध्ये १४ वेळा आमने सामने आले आहेत. यातील ७ सामने भारताने जिंकले आहेत, तर ७ सामने इंग्लंडने जिंकले आहेत. त्यामुळे ही आकडेवारी पाहाता दोन्ही संघ तुल्यबळ असल्याचे लक्षात येते. यातील ६ सामने भारतात झाले आहेत. या ६ सामन्यांपैकी ३ सामने भारताने जिंकले आहेत, तर ३ सामने इंग्लंडने जिंकले आहेत.
तसेच आत्तापर्यंत भारत आणि इंग्लंड संघात भारतात ३ द्विपक्षीय मालिका झाल्या आहेत. त्यातील १ मालिका भारताने, १ मालिका इंग्लंडने जिंकली आहे. तर १ मालिका बरोबरीत सुटली आहे.
दोन्ही संघात खेळाडूंचे पुनरागमन
कसोटी मालिनंतर टी२० मालिका खेळण्यासाठी सज्ज झालेले भारत आणि इंग्लंड संघात काही खेळाडूंचे पुनरागमन झाले आहे. या टी२० मालिकेसाठी भारतीय संघात सुर्यकुमार यादव, इशान किशन, राहुल तेवातिया या खेळाडूंना पहिल्यांदाच संधी मिळाली आहे. तर वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारचे १५ महिन्यांनंतर भारताच्या टी२० संघात पुनरागमन झाले आहे. याशिवाय रोहितचेही मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये या मालिकेतून पुनरागमन होईल.
तसेच कसोटी संघापेक्षा जवळपास पूर्णपणे वेगळा असलेल्या इंग्लंडच्या टी२० संघाचे नेतृत्व ओएन मॉर्गन सांभाळेल. त्याचबरोबर इंग्लंड संघात सॅम करन, मोईन अली, डेविड मलान, आदील राशिद, ख्रिस जॉर्डन अशा खेळाडूंचा सामावेश आहे.
अशी असू शकते खेळपट्टी
पहिल्या टी२० सामन्यासाठी फलंदाजीला पोषक खेळपट्टी असू शकते. तसेच फिरकी गोलंदाजांनाही मदत मिळू शकते. तसेच सामने संध्याकाळी होत असल्याने दव पडण्याचीही शक्यता आहे.
कधी, कुठे आणि केव्हा होणार भारत विरुद्ध इंग्लंड पहिला टी२० सामना घ्या जाणून –
१. भारत विरुद्ध इंग्लंड संघातील पहिला टी२० सामना केव्हा होणार?
– भारत विरुद्ध इंग्लंड संघातील पहिला टी२० सामना १२ मार्च रोजी खेळला जाणार आहे.
२. भारत विरुद्ध इंग्लंड संघातील पहिला टी२० सामना कुठे खेळवला जाणार ?
– भारत विरुद्ध इंग्लंड संघातील पहिला टी२० सामना नरेंद्र मोदी स्टेडियम, मोटेरा, अहमदाबाद येथे खेळवला जाईल.
३. भारत विरुद्ध इंग्लंड संघातील पहिला टी२० सामना किती वाजता सुरु होणार ?
– भारत विरुद्ध इंग्लंड संघातील पहिला टी२० सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७.०० वाजता सुरु होईल. त्याआधी संध्याकाळी ६.३० वाजता नाणेफेक होईल.
४. भारत विरुद्ध इंग्लंड संघातील पहिल्या टी२० सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतात कोणत्या चॅनेलवर पाहाता येईल ?
– भारत विरुद्ध इंग्लंड संघातील पहिल्या टी२० सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतात स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर पाहता येईल.
५. भारत विरुद्ध इंग्लंड संघातील पहिल्या टी२० सामन्याचे थेट प्रक्षेपण ऑनलाईन कसे पाहाता येईल ?
– भारत विरुद्ध इंग्लंड संघातील पहिल्या टी२० सामन्याचे थेट प्रक्षेपण ऑनलाईन हॉटस्टारवर पाहाता येईल.
यातून निवडला जाईल ११ जणांचा संघ –
भारतीय संघ – रोहित शर्मा, केएल राहुल (यष्टीरक्षक), विराट कोहली (कर्णधार), सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, शार्दुल ठाकूर, युजवेंद्र चहल, नवदीप सैनी, अक्षर पटेल, शिखर धवन, दीपक चाहर, श्रेयस अय्यर, राहुल तेवतिया, टी नटराजन, इशान किशन, राहुल चाहर
इंग्लंड संघ – जेसन रॉय, जोस बटलर (यष्टीरक्षक), डेव्हिड मालन, जॉनी बेअरस्टो, ओएन मॉर्गन (कर्णधार), बेन स्टोक्स, मोईन अली, सॅम करन, ख्रिस जॉर्डन, जोफ्रा आर्चर, आदिल राशिद, सॅम बिलिंग्ज, रीस टोपली, मार्क वूड, टॉम करन, लियाम लिव्हिंगस्टोन
महत्त्वाच्या बातम्या –
‘तर्क असलेले प्रश्न विचारा’, आर अश्विनला टी२० मध्ये खेळवण्याच्या प्रश्नावर भडकला विराट कोहली
शिखर धवनचा पत्ता होणार कट? पहिल्या टी२० साठी ‘या’ सलामीवीरांना मिळणार संधी, विराटचा खुलासा