भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यात आज (०६ मार्च) तिसऱ्याच दिवशी भारताने एक डाव आणि २५ धावांनी विजय मिळवला आहे. या विजयासह भारताने इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका ३-१ अशा फरकाने जिंकली.
याबरोबरच भारताचे जूनमध्ये होणाऱ्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. अंतिम सामन्यात भारताचा सामना न्यूझीलंड विरुद्ध होईल. तसेच हा भारताचा मायदेशातील सलग १३ वा कसोटी मालिका विजय आहे.
चौथ्या सामन्यात भारताचा पहिला डाव ३६५ धावांवर संपुष्टात आल्याने भारताने १६० धावांची आघाडी घेतली होती. त्यानंतर दुसऱ्या डावात इंग्लंडला ५४.५ षटकात सर्वबाद १३५ धावाच करता आल्या. इंग्लंडकडून डॅनिएल लॉरेन्सने एकाकी झुंज दिली. त्याने सर्वाधिक ५० धावा केल्या. त्याच्या व्यतिरिक्त जो रुटने ३० धावांची खेळी केली. बाकी कोणाला फारसे काही करता आले नाही.
भारताकडून अक्षर पटेल आणि आर अश्विनने प्रत्येकी ५ विकेट घेतल्या.
लॉरेन्सची एकाकी झुंज
इंग्लंडच्या ६ विकेट्स नियमित अंतराने पडल्यानंतर डॅनिएल लॉरेन्सने बेन फोक्ससह डाव सांभाळला होता. त्यांनी ४४ धावांची भागीदारीही रचली. पण अखेर अक्षर पटेलने फोक्सला १३ धावांवर बाद केले. त्यापुढे अक्षरने डॉमनिक बेसला २ धावांवर बाद करत इंग्लंडला आठवा धक्का दिला.
त्यानंतर जॅक लीचने लॉरेन्सला साथ देण्याचा प्रयत्न केला. मात्र अश्विनने त्याला बाद केले. त्याने ३१ चेंडूत २ धावा केल्या. अखेर लॉरेन्सला बाद करत इंग्लंडचा डाव आर अश्विनने १३५ धावांवर संपवला. लॉरेन्सने ५० धावा केल्या.
इंग्लंडची मधली फळी अपयशी
आर अश्विनने लागोपाठ २ विकेट्स घेतल्यानंतर १० व्या षटकात सलामीवीर डॉमनिक सिब्ली दुर्दैवीरित्या झेलबाद झाला. त्याने अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर मारलेला स्वीपच्या फटक्यावर चेंडू शॉर्ट लेगला शुबमन गिलच्या पॅडला लागून वर उडाला आणि तो चेंडू रिषभ पंतने झेलला. त्यामुळे सिब्लीला ३ धावांवर बाद व्हावे लागले.
त्यानंतर अक्षरने १४ व्या षटकात बेन स्टोक्सचा अडथळाही दूर केला. स्टोक्स २ धावांवर बाद झाला. त्यांनंतर ऑली पोप आणि जो रुटने इंग्लंडचा डाव सांभाळला होता. मात्र, २५ व्या षटकात धाव घेण्यासाठी पळण्याच्या प्रयत्नात पोप १५ धावांवर धावबाद झाला आणि इंग्लंडला ५ वा धक्का बसला. त्यानंतर रुटही २६ व्या षटकात अश्विनच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. रुटने ३० धावा केल्या.
त्यामुळे सध्या इंग्लंडच्या २७ षटकात ६ बाद ७२ धावा झाल्या आहेत. सध्या बेन फोक्स ६ चेंडूत ० धावेवर आणि डॅनिएल लॉरेन्स ६ चेंडूत ६ धावांवर नाबाद खेळत आहे. तसेच अजून इंग्लंड संघ ८८ धावांनी पिछाडीवर आहे.
आर अश्विनचे लागोपाठ दोन मोठे धक्के
भारताचा पहिला डाव ३६५ धावांवर संपुष्टात आला. त्यानंतर इंग्लंडकडून दुसऱ्या डावात जॅक क्रॉली आणि डॉमनिक सिब्ली सलामीला फलंदाजीला उतरले होते. त्यांनी संयमी सुरुवात केली होती. मात्र ५ व्या षटकात आर अश्विनने क्रॉलीला चौथ्या चेंडूवर अजिंक्य रहाणे करवी झेलबाद केले. त्या पुढच्याच चेंडूवर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला जॉनी बेअरस्टोला देखील त्याने बाद केले. बेअरस्टोचा झेल रोहित शर्माने घेतला. त्यामुळे इंग्लंडला लागोपाठ २ धक्के बसले आहेत.
सध्या इंग्लंड संघाने दुसऱ्या डावात ७ षटकात २ बाद १५ धावा केल्या आहेत. सिब्ली १३ चेंडूत २ धावांवर आणि जो रुट १२ चेंडूत ४ धावांवर नाबाद आहे. तसेच अजून इंग्लंड संघ १४५ धावांनी पिछाडीवर आहे.
भारताचा पहिला डाव ३६५ धावांत संपुष्टात
भारताचा पहिला डाव ११४.४ षटकात ३६५ धावांवर संपुष्टात आला. भारताकडे आता १६० धावांची आघाडी आहे. भारताचा डाव संपुष्टात आल्याने वॉशिंग्टन सुंदरचे शतक थोडक्यात हुकले आहे.
या डावात भारताकडून सर्वाधिक रिषभ पंतने १०१ धावांची खेळी केली. त्याच्या पाठोपाठ सुंदरने नाबाद ९६ धावा केल्या. तसेच रोहित शर्माने ४९ आणि अक्षर पटेलने ४३ धावांचे महत्त्वाचे योगदान दिले. इंग्लंडकडून बेन स्टोक्सने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तसेच जेम्स अँडरसनने ३ आणि जॅक लीचने २ विकेट्स घेतल्या.
सुंदरचे शतक हुकले
दुसऱ्या दिवशी भारताने ७ बाद २९४ या धावसंख्येपासून पुढे खेळायला सुरुवात केली. सुरुवातीपासूनच वॉशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेलने धावांचा चांगला वेग ठेवत भारताला ३५० धावांचा टप्पाबी पार करुन दिला. मात्र डावाच्या ११४ व्या षटकात अक्षर पटेल ४३ धावांवर धावबाद झाला. त्यामुळे सुंदर आणि त्याच्यामधील १०६ धावांची भागीदारीही तुटली. तसेच त्या पुढच्याच चेंडूवर बेन स्टोक्सने इशांत शर्माला पायचीत केले.
त्यानंतर ११ व्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला मोहम्मद सिराज देखील फार काही करु शकला नाही. त्याला देखील स्टोक्सनेच त्रिफळाचीत करत भारताचा डाव ३६५ धावांवर संपवला. मात्र यामुळे सुंदरचे शतक थोडक्यात हुकले. तो १७४ चेंडूत १० चौकार आणि १ षटकारासह ९६ धावांवर नाबाद राहिला.