इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात हेडिंग्ले स्टेडियम, लीड्स येथे तिसरा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्याच्या तिसऱ्या दिवसाखेर भारत २ बाद २१५ धावांवर आहे. अद्याप भारत इंग्लंडपेक्षा १३९ पिछाडीवर आहे. हा सामना संपण्यासाठी २ दिवस बाकी आहेत. दरम्यान इंग्लंडच्या ताफ्यातून धक्कादायक वृत्त पुढे येत आहे. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ब्रायडन कार्स याला कोविड-१९ ची लागण झाली आहे.
बेन स्टोक्स, स्टुअर्ट ब्रॉड, जोफ्रा आर्चर आणि मार्क वुड कसोटी मालिकेतून बाहेर झाल्यानंतर कार्सला राखीव खेळाडूच्या रुपात संघात जागा मिळाली होती. तिसऱ्या कसोटी सामन्यातून तो इंग्लंडच्या कसोटी संघात पदार्पण करू शकला असता. मात्र हा सामना सुरू होण्यापूर्वीच द हंड्रेड लीगदरम्यान त्याला कोरोनाची बाधा झाली होती. यामुळे त्याची कसोटी पदार्पणाची संधी हुकली आहे. डेली मेलने त्याला कोरोना संक्रमण झाल्याचे वृत्त दिले आहे.
कार्सने नुकतेच जुलै महिन्यात पाकिस्तानविरुद्ध आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. या संपूर्ण मालिकेत ३ सामने खेळताना त्याने एकूण ६ विकेट्स घेतल्या होत्या. ६१ धावा देत ५ विकेट्स ही त्याची या मालिकेतील सर्वोत्तम कामगिरी राहिली. या मालिकेनंतर तो नॉर्दन सुपरचार्जर्स संघाकडून द हंड्रेड लीगमध्ये सहभागी झाला होता. इथेच लीगच्या शेवटी तो कोविड-१९ च्या संपर्कात आला होता.
भलेही त्याला तिसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर राहावे लागले असले तरीही अजून मालिकेतील २ सामने शिल्लक आहेत. २९ ऑगस्ट रोजी इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील तिसरा कसोटी सामना संपणार आहे. त्यानंतर २ ते ६ सप्टेंबरदरम्यान केनिंग्टन ओव्हल येथे चौथा कसोटी सामना होणार आहे. तर अखेरचा पाचवा कसोटी सामना १० ते १४ सप्टेंबरदरम्यान मँचेस्टर येते खेळला जाईल. अशात कोरोनातून बरा झाल्यानंतर कार्सला इंग्लंडकडून कसोटी स्वरुपात खेळण्याची संधी मिळेल की नाही?, हे पाहावे लागणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
जड्डूचा मोठा विक्रम, कपिल देवनंतर ‘ही’ अतुलनीय कामगिरी करणारा बनला फक्त दुसरा अष्टपैलू
हेडिंग्ले कसोटीत भारताची दुर्गति होण्यास कोहलीचा ‘तो’ निर्णय जबाबदार; माजी क्रिकेटरने टोचले कान
भारतापुढे अजून मोठे लक्ष्य, मग चौथ्या दिवशी काय असेल फलंदाजांची योजना? रोहितने केला खुलासा