भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर गेला आहे. या दौऱ्यात एक कसोटी, तीन वनडे आणि तीन टी२० सामन्यांच्या मालिका खेळल्या जाणार आहेत. १ जुलैपासून सुरू होणारा हा एकमेव कसोटी सामना पूर्वनियोजित आहे. कोरोनाच्या उद्रेकामुळे मागील वर्षी भारतीय संघाला पाच सामन्यांची कसोटी मालिका अर्ध्यावरच सोडून यावे लागले होते. या मालिकेत भारत २-१ असा पुढे आहे. भारताला मालिका विजयासाठी हा सामना केवळ ड्रॉ करायचा आहे. पण ते सहज होणार नाही. कारण भारत आणि इंग्लंड संघ जेव्हा एकमेकांविरुद्ध खेळतात तेव्हा खेळ फक्त बॅट आणि चेंडूमध्ये नसतो, त्यामध्ये वादविवाद होणार हे नक्की. असेच काही भारत आणि इंग्लंड संघांच्या खेळाडूंदरम्यान झालेल्या वादांबद्दल जाणुन घेऊया.
१. कोहली आणि स्टोक्स
इंग्लंड संघ २०१६ साली जेव्हा भारताच्या दौऱ्यावर आला होता, तेव्हा मोहाली कसोटीत कोहली आणि स्टोक्स यांच्यात वाद निर्माण झाला होता. त्याचे झाले असे की, या सामन्यात इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकुन फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय बरोबर ठरला नाही. त्यांचे ८७ धावांवर ४ गडी झालेले असताना जॉनी बेअरस्टो आणि बेन स्टोक्स डाव सावरण्याचा प्रयत्न करत होते. काही वेळाने रवींद्र जडेजाला मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात स्टोक्सचा क्रीजच्या बाहेर निघाला मात्र चेंडू हुकला आणि यष्टीरक्षक पार्थिव पटेलने त्याला यष्टिचीत केले. त्यावेळी भारताचा कर्णधार कोहली आणि संघाचे इतर खेळाडू जल्लोष करायला लागले.
मात्र स्टोक्सला विराट कोहलीचा जल्लोष करण्याचा अंदाज आवडला नाही. त्यामुळे स्टोक्स मागे वळुन कोहलीला काही तरी म्हणाला आणि तिथेच थांबून एकटक कोहलीकडे पाहत राहिला. ते ऐकुन कोहली भडकला आणि त्याला प्रत्युत्तर दिले. मैदानावर अजून वातावरण तापेल त्याआधी पंचांनी दोघांमध्ये येऊन विषय तिथेच संपवला.
२. ऍंडरसन, जडेजा आणि धोनी
२०१४ साली भारत विरुद्ध इंग्लंडमध्ये झालेल्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात जेम्स ऍंडरसन, रविंद्र जडेजा आणि एमएस धोनी यांच्यात वाद निर्माण झाला होता. या मालिकेतील पहिल्या सामन्यात लंचला जाताना ऍंडरसनने जडेजाला धक्का दिला आणि शिवीगाळ ही केली. त्यामुळे भारतीय संघाने ऍंडरसनवर आचारसंहीतेचा लेवल १चा आरोप देखील लावला. तर इंग्लंडच्या संघाने जडेजावर खेळ भावना तोडल्याचा आरोप लावला. म्हणुन त्याच्यावर मॅच रेफरी डेविड बुनने ५०% सामना फिसचा दंडदेखील ठोठावला होता. त्यामुळे त्यावेळी कर्णधार असलेल्या धोनीला त्या गोष्टीवर खुप राग देखील आला होता आणि त्यावर त्याने परत अपील देखील केली होती. मात्र त्यानंतर जडेजावरील दंड काढण्यात आला.
मात्र प्रेस कॉंफरन्समध्ये याबद्दल बोलताना धोनी म्हणाला होता की, “जे काही झाले चुकीचे झाले. माहिती नाही मॅच रेफरीने काय पाहुन जडेजाला दोषी ठरवले होते. आम्ही बरोबर होतो. ऍंडरसनने लक्ष्मण रेखा पार केली होती. मी तेच केले, जे मी करायला पाहिजे होते. जर माझ्या संघाचा खेळाडू चुकीचा असता तर मी त्याला साथ नसती दिली. मात्र तेव्हा जडेजावर शिवीगाळ झाली होती, त्याचबरोबर त्याला धक्काही देण्यात आला होता.”
३. इयान बेल- प्रवीण कुमार
२०११ साली भारत विरुद्ध इंग्लंडमध्ये झालेल्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात इयान बेलच्या धावबादचे प्रकरण तर खुप गाजले होते. नॉटींघम कसोटीच्या तिसऱ्या दिवशी चहापानापूर्वी अखेरच्या चेंडूवर बेलने एक शानदार फटका मारला, मात्र चेंडू सीमारेषेच्या एकदम जवळ येऊन थांबला आणि सीमारेषेला लागला नाही. पण बेलला वाटले की तो चौकार गेला आहे, म्हणून तो धाव घेता घेता मध्येच थांबला. तेवढ्यात प्रवीण कुमारने तो चेंडू उचलून यष्टीरक्षक अभिनव मुकुंदकडे फेकला आणि मुकुंदने चेंडू पकडत त्रिफळा उडवला.
या पूर्ण घटनेचा आढावा घेत आयसीसीच्या नियमांप्रमाणे थर्ड अंपायरने त्याला बाद असल्याचे सांगत चहापान घोषित केले. चहापानाच्या वेळात बेल आणि इंग्लंडचा त्या वेळचा कर्णधार ऍंड्र्यु स्ट्रॉस कर्णधाराला जाऊन भेटले आणि त्याविषयावर चर्चा केली. या चर्चेनंतर धोनीने आपला निर्णय बदलत बेलला परत फलंदाजीला बोलावले. मात्र त्यानंतर बेल केवळ २२ धावाच जोडू शकला आणि युवराज सिंगच्या गोलंदाजीवर बाद झाला आणि १५९ धावांवर तंबुत परतला. मात्र धोनीच्या या खेळ भावनेच्या निर्णयामुळे त्याने जगभरातुन वाहवाही लुटली आणि त्याचबरोबर ९ वर्षांनंतर त्याला दशकातील सर्वोत्कृष्ट खिलाडूवृत्तीचा पुरस्कार मिळाला.
४. झहीर खान आणि इयान बेल
२००७ साली नॉटींघम येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीत भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज झहीर खान आणि इंग्लंडचा खेळाडू केविन पीटरसन यांच्यात मोठा वाद झाला. इंग्लंडचा डाव १९८ धावांवर संपुष्टात आल्यानंतर भारताने त्यांच्यावर २६६ धावांची आघाडी घेतली होती. लक्ष्मणच्या बाद झाल्यानंतर आलेला झहीर खान फलंदाजी करत होता. तेव्हाच त्याने क्रीजवर काही जेली बीन्स पडलेल्या पाहिल्या ज्यांना त्याने लगेचच हटवले. पण, पुढचाच चेंडू खेळल्यानंतर त्याला परत काही जेली बीन्स दिसल्या आणि त्यामुळे त्याला राग आला आणि स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करत असलेल्या पीटरसनला असे नको करु म्हणुन बजावले. पण पीटरसन आपली चुकी मान्य करण्याऐवजी त्याच्यासोबत भांडायला लागला. त्यामुळे चिडलेल्या झहीरने त्याच्या दिशेकडे बॅट दाखवली. मैदानावर अजुन वातावरण तापेल त्याआधी पंचांनी दोघांमध्ये येऊन विषय तिथेच संपवला. आणि इंग्लंडचा कर्णधार मायकल वॉने सामन्याअखेर माफी मागितली.
५. सचिन आणि नासिर हुसेन
२००१ साली इंग्लंडता संघ जेव्हा भारताच्या दौऱ्यावर होता, तेव्हा बॅंगलोर येथे होणार असलेल्या मालिकेच्या तिसऱ्या म्हणजेच शेवटच्या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार नासिर हुसेन भारताला हरवण्याच्या आणि सचिन तेंडूलकरला बाद करण्यासाठी हातकंडे लावत होता. त्याला वाटत होते की, भारताला हरवायचे असेल तर सचिनला लवकर बाद करणे गरजेचे आहे. नासिरने आखलेल्या योजनेप्रमाणे डाव्या हाताचा फिरकीपटू ऍश्ले जाइल्सला गोलंदाजील बोलावले आणि फक्त लेग स्टंपच्या बाहेर गोलंदाजी करण्यास सांगितले. यामुळे सचिन निराश झाला. कारण तो धावा बनवूच शकत नव्हता आणि म्हणुन इनसाइड आउट शॉट खेळण्याच्या प्रयत्नात यष्टीचीत बाद झाला. मात्र इंग्लंडच्या अशा गोलंदाजीच्या योजनेमुळे त्यांची क्रिकेटविश्वात खुप आलोचना झाली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
नया है यह! लाईव्ह सामन्यात अंपायरिंग सोडून पंच करू लागले क्षेत्ररक्षण, झेल घेतानाचा फोटो व्हायरल
मयंक अगरवाल ते निखत झरीन, फोटोंमध्ये पाहा कोणी कसा साजरा केला जागतिक योगा दिन
टी२०चा दांडगा अनुभव अन् दमदार फॉर्म असूनही ‘या’ खेळाडूला टी२० विश्वचषकात नाही मिळणार जागा