आजपासून (12 मार्च) भारत आणि दक्षिण आफ्रिका संघातील 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना सुरु होणार होता. मात्र, हा सामना सुरु होण्याआधीपासून धरमशाला येथे आज पाऊस सुरु होता. त्यामुळे नाणेफेकीत विलंब झाल्यामुळे अजूनही सामना सुरु झालेला नाही.
न्यूझीलंड संघाविरुद्ध वनडे आणि कसोटीत पराभूत झाल्यामुळे, भारत पुन्हा त्यांची लय मिळवण्याच्या प्रयत्नात असेल. तर, मायदेशात पार पडलेल्या 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत दक्षिण आफ्रिकेने 3-0ने ऑस्ट्रेलियाला पराभूत केले. त्यामुळे ते आत्मविश्वासाने खेळताना दिसतील.
भारताने आतापर्यंत धरमशाला येथील स्टेडियमवर 4 वनडे सामने खेळले आहेत. यातील 2 सामन्यात विजय मिळवण्यात भारताला यश आले आहे, तर 2 सामने गमवावे लागले आहेत. 10 डिसेंबर 2017ला श्रीलंकाविरुद्ध भारताने याच स्टेडियमवर आपला अखेरचा वनडे सामना खेळला होता. यावेळी श्रीलंकाने 7 गडी राखून हा सामना जिंकला होता.
यापुर्वी 27 जानेवारी 2013ला भारताने इंग्लंडविरुद्ध धरमशाला स्टेडियमवर वनडे सामना खेळला होता. यावेळीही इंग्लंडने 7 विकेट्सने भारताला पराभूत केले होते. शिवाय विंडिंजविरुद्ध 17 ऑक्टोबर 2014 आणि न्यूझीलंडविरुद्ध 16 ऑक्टोबर 2016च्या वनडे सामन्यात भारताने विजय मिळवला होता.
या वनडे मालिकेतील दुसरा सामना 15 मार्च रोजी लखनऊ येथे तर, अखेरचा सामना 18 मार्च रोजी कोलकाता येथे पार पडणार आहे.






