भारतीय संघ सध्या दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर (india tour of south africa) आहे. दक्षिण अफ्रिका आणि भारत यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. मालिकेतील दोन सामने खेळले गेले आहेत आणि तिसरा सामना ११ जानेवारीपासून केपटाऊनमध्ये खेळला जाणार आहे. कसोटी मालिका सध्या १-१ अशा बरोबरीत आहे. मागच्या सामन्यात दक्षिण अफ्रिका संघाने अप्रतिम प्रदर्शन करून सामना जिंकला होता, पंरतु, तरीही तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटीत अफ्रिकेच्या संघात काही महत्वाचे बदल पाहायला मिळू शकतात. दक्षिण अफ्रिकाच्या एका वेगवान गोलंदाजाला प्लेइंग इलेव्हनच्या बाहेर केले जाण्याची शक्यता आहे.
एका क्रिकेट संकेतस्थळाच्या माहितीनुसार, पुढच्या कसोटी सामन्यात दक्षिण अफ्रिका संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये काही महत्वाचे बदल होतील. माहितीनुसार दक्षिण अफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डुएन ऑलिव्हियऱ (duanne olivier) याला प्लेइंग इलेव्हनच्या बाहेर बसण्याची वेळ येऊ शकते. त्याच्या जागी संघात वियान मूल्डर (wiaan mulder) याला सामील करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तिसऱ्या सामन्यासाठी संघात स्थान मिळण्याची शक्यता असलेला मूल्डर यापूर्वी मालिकेतील पहिल्या सामन्यात खेळला आहे, जो सेंचुरियनमध्ये पार पडला होता. परंतु नंतर जोहान्सबर्गमधील दुसऱ्या कसोटी सामन्यातून त्याच्या जागी डुएन ऑलिव्हियरला संधी दिली गेली होती. ऑलिव्हियरने देखील मिळालेल्या संधीचा चांगला फायदा घेतल्याचे दिसले. त्याने दुसऱ्या सामन्यात चार विकेट्स घेतल्या. ऑलिव्हियरने या सामन्याच्या पहिल्या डावात अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजाराला लागोपाठ चेंडूवर तंबूत पाठवून भारतीय संघाला अडचणीत आणले होते. त्यानंतर दुसऱ्या डावात त्याने सलामीवीर मयंक अगरवालची महत्वाची विकेट घेतली होती.
दक्षिण आफ्रिकेतील परिस्थितीत वेगवान गोलंदाजांना अधिक फायदा होताना दिसत आहे. भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यामुळे दक्षिण अफ्रिका संघाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. अशात कर्णधार डीन एल्गर स्वतःच्या संघाची फलंदाजी भक्कम करण्यच्या प्रयत्नात आहे. मूल्डर संघाच्या खालच्या फळीत चांगल्या फलंदाजाची भूमिका पार पाडू शकतो. केपटाऊमधील खेळपट्टी गोलंदाजांसाठी फायदेशीर असणार आहे, अशात मूल्डर गोलंदाजीतही महत्वाचे योगदान देईल, अशी अपेक्षा आहे.
केपटाऊन कसोटीसाठी दक्षिण अफ्रिकेची संभावित प्लेइंग इलेव्हन-
डीन एल्गर (कर्णधार), एडेन मार्करम, कीगन पीटरसन, रासी वॅन डर डुसेन, टेंबा बवुमा, काइल वीरेने, मार्को यानसेन, केशव महाराज, कगिसो रबाडा, वियान मूल्डर, लुंगी एन्गिडी.
महत्वाच्या बातम्या –
पंतवर टीकेचा भडिमार सुरूच! गावसकर, मदललाल यांच्यानंतर ‘हा’ दिग्गज संतापला
पुणेरी पलटण विजयी मार्गावर! युवा अस्लम इनामदारची धडाकेबाज कामगिरी
हर्षवर्धन खराडे, आदिती परशेट्टी यांना आशियाई पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत रौप्य
व्हिडिओ पाहा –