आयपीएल २०२२मध्ये दिग्गज अष्टपैलू हार्दिक पंड्याने धमाकेदार प्रदर्शन करून सर्वांचे लक्ष वेधले. हंगामात त्याचे वैयक्तिक प्रदर्शन तर चांगलेच होते, पण त्याचा संघ गुजरात टायटन्सने देखील अप्रतिम कामगिरी केली. हार्दिकने गुजरातला त्यांच्या पदार्पणच्या हंगामात विजेतेपद पटकावून दिले. अशात चाहते हार्दिकला पुन्हा पाहण्यासाठी उत्सुक आहेत, पण हार्दिकने मात्र चाहत्यांची प्रतीक्षा लांबवली आहे.
हार्दिक पंड्या (Hardik Pandya) आयपीएल २०२२मध्ये गुजरात टायटन्सचा कर्णधार होता आणि त्याने स्वतःच्या संघासाठी सर्वाधिक धावा केल्या. त्याने हंगामातील १५ सामन्यांमध्ये ४४.२७च्या सरासरीने आणि १३१.२६च्या स्ट्राईक रेटने ४८७ धावा केल्या. काही महिन्यांपूर्वी खराब प्रदर्शनाच्या कारणास्तव भारतीय संघातून बाहेर पडलेला हार्दिक आयपीएलनंतर पुन्हा संघात परतला आहे.
अशात चाहते चांगल्या फॉर्ममध्ये परतलेल्या हार्दिकला भारताच्या जर्सीमध्ये खेळताना पाहू इच्छितात, पण हार्दिक आहे की, चाहत्यांची ही इच्छा लांबवत आहे. सोमवारी (६ जून) भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी पहिले सराव सत्र आयोजित केले होते, पण हार्दिक या सराव सत्रासाठी उपस्थित नव्हता. हार्दिक अद्याप संघासोबत सहभागी न झाल्यामुळे चाहत्यांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
एनएआयने याविषयी माहिती दिली आहे. वृत्तानुसार आयपीएल विजेता कर्णधार हार्दिक अद्याप भारतीय संघासोबत सहभागी झाला नाहीये. वृत्तात बीसीसीआय अधिकाऱ्यांच्या हवाल्याने सांगितले गेले आहे की, हार्दिक अजून संघासोबत जोडला गेला नाहीये, पण तो मंगळवारी (७ जून) संघाशी जोडला जाऊ शकतो. हार्दिकच्या फिटनेसविषयीच्या सर्व प्रश्नांवर बीसीसीआय अधिकाऱ्याने पूर्णविराम लावला. अधिकाऱ्याने सांगितले की, तो पूर्णपणे फिट आहे आणि मालिकेतील पहिल्या सामन्यापासून उपलब्ध असणार आहे. आयपीएल हंगामाच्या शेवटच्या सामन्यापर्यंत खेळल्यामुळे त्याला अधिक विश्रांती दिली गेली आहे, असेही सांगितेल जात आहे.
दरम्यान, सोमवारी जेव्हा भारतीय संघाने सराव सुरू केला, तेव्हा प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार केएल राहुल खेळाडूंना काही महत्वाच्या सुचना करताना दिसले. रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह यांना या मालिकेदरम्यान विश्रांती घेतली आहे. संघाच्या पहिल्या सराव सत्रात हार्दिक व्यतिरिक्त वेगवान गोलंदाज हर्षल पटेल आणि फिरकीपटू युजवेंद्र चहल यांनाही सहभाग घेता आला नाही. आयपीएलमध्ये हर्षल दुसरा क्वालिफायर, तर चहल अंतिम सामन्यापर्यंत खेळला होता, ज्यामुळे त्याला एक दिवस अधिक विश्रांती दिली गेली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
धक्कादायक! माजी भारतीय खेळाडूच्या वडिलांना अटक, कोर्टाचा एक दिवसीय रिमांडचा आदेश, काय आहे प्रकरण?
वयाच्या ५५व्या वर्षी माजी श्रीलंकन कर्णधाराचा भाऊ जाणार खडी फोडायला, पाहा काय केलाय राडा