भारत आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिकेचा शेवटचा सामना बेंगलोरच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात भारताने २३८ धावांनी विजय मिळवला आणि श्रीलंकेला क्लीन स्वीप (२-०) दिला. त्यापूर्वी पहिल्या कसोटीत भारताने एक डाव आणि २२२ धावा शिल्लक ठेऊन मोठा विजय मिळवला होता. दिवस-रात्र स्वरुपात खेळला गेलेला दुसरा सामना जिंकण्यासाठी श्रेयस अय्यर आणि जसप्रीत बुमराह यांचे योगदान मोलाचे ठरले. पण संघातील इतरही खेळाडूंना चांगेल प्रदर्शन करण्याचा पूर्ण प्रयत्न केला. चला तर जाणून घेऊया त्या खेळाडूंविषयी ज्यांनी दुसऱ्या कसोटीत भारताला जिंकवण्यासाठी मोलाचे योगदान दिले.
श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) –
बेंगलोरमध्ये खेळल्या गेलेल्या गुलाबी चेंडूच्या कसोटीत विजय मिळवण्यासाठी श्रेयस अय्यरने भारतीय संघाला सर्वात मोठे योगदान दिले. या सामन्यातील पहिल्या आणि दुसऱ्या डावात अय्यरने अर्धशतक ठोकले. पहिल्या डावात अवघ्या ८ धावा कमी पडल्यामुळे त्याचे शतक केले, ज्यामध्ये तो ९२ धावा करून बाद झाला. त्यानंतर दुसऱ्या डावात त्याने ६७ धावांची महत्वाची खेळी केली. पहिल्या डावात भारताच्या पहिल्या चार विकेट्स १०० धावांच्या आतमध्ये पडल्या होत्या, पण त्यानंतर श्रेयसने डाव सांभळला. या प्रदर्शनासाठी श्रेयसला सामनावीर निवडले गेले.
जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) –
भारताला सामना जिंकवण्यासाठी महत्वाचे योगदान देणारा बुमराह दुसरा खेळाडू ठरला. शेवटच्या सामन्याच्या पहिल्या डावात त्याने ५ विकेट्स घेतल्या, तर दुसऱ्या डावात तीन विकेट्स नावावर केल्या. पहिल्या डावात बुमराहने १० षटकांमध्ये अवघ्या २४ धावा खर्च केल्या आणि भारतात खेळताना पहिल्यांदाच एका डावात ५ विकेट्स घेण्याची कामगिरी केली. त्याच्या या प्रदर्शनामुळे पहिल्या डावात श्रीलंका संघ १४३ धावांनी पिछाडीवर राहिला. त्यानंतर दुसऱ्या डावातही त्याने घातक गोलंदाजी करत अर्धशतक पूर्ण केलेल्या दिमुथ करुणारत्ने आणि इतर दोन खेळाडूंच्या विकेट्स घेतल्या
रिषभ पंत (Rishabh Pant) –
बेंगलोर कसोटीत रिषभ पंतने सिद्ध केले की, खेळपट्टी कशीही असो, तो स्वतःच्या पद्धतीने फलंदाजी करतो. पहिल्या डावात श्रीलंकेच्या फिरकी गोलंदाजांपुढे भारतीय फलंदाज एकापाठोपाठ विकेट्स गमावत होते. एकवेळ असे वाटत होते की, भारतीय संघ २०० धावंचा टप्पाही पार करू शकणार नाही. परंतु पंतने २६ चेंडूत दमदार फलंदाजी करत ३९ धावा ठोकल्या. त्यानंतर दुसऱ्या डावात त्याने अधिकच आक्रमक भूमिका स्वीकारली आणि अवघ्या २८ चेंडूत अर्धशतक केले. भारतासाठी तो सर्वात वेगवान कसोटी अर्धशतक करणारा फलंदाज ठरला.
रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) –
भारताला मिळालेल्या दुसऱ्या कसोटीतील विजयात रविचंद्रन अश्विनची भूमिकाही महत्वाची ठरली. पहिल्या डावात त्याने १३ धावा केल्या आणि आणि गोलंदाजीत २ विकेट्स घेतल्या. त्यानंतर दुसऱ्या डावात त्याने उत्कृष्ट गोलंदाजी केली. कुसल मेंडिसने दुसऱ्या डावात श्रीलंकेसाठी अर्धशतकी खेळी केली होती आणि खेळपट्टीवर कायम होता. अश्विनने त्याची विकेट घेतली आणि इतर तीन महत्वाच्या विकेट्सही घेतल्या. दुसऱ्या कसोटीत सामन्यात अश्विनने एकूण ६ विकेट्स घेतल्या.
हनुमा विहारी (Hanuma Vihari) –
हनुमा विहारी बेंगलोर कसोटीच्या दोन्ही डावात अर्धशतकी खेळी करू शकला नाही. परंतु, गोलंदाजांसाठी अनुकूल अशा खेळपट्टीवर त्याने पहिल्या डावात ३१ आणि दुसऱ्या डावात ३५ धावा केल्या. दोन्ही डावांमध्ये विहारीची फलंदाजी संघाला बळकटी देणारी ठरली. पहिल्या डावात सलामीवीर रोहित शर्मा आणि मयंक अगरवाल स्वस्तात बाद झाले. अशात विहारीने विराट कोहलीसोबत ४७ धावांची भागीदारी केली. तसेच दुसऱ्या डावात रोहित शर्मासोबत ५६ धावांची भागीदारी त्याने पार पाडली. त्याची खेळी सामन्यात निर्णायक ठरली.