भारत आणि श्रीलंका यांच्यातील बहुप्रतीक्षित वनडे मालिकेला १८ जुलैपासून कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियमवर सुरुवात होईल. नियोजित कार्यक्रमानुसार ही मालिका १३ जुलै रोजी सुरू होणार होती. मात्र, श्रीलंका संघातील काही सदस्य कोरोनाबाधित आढळल्याने मालिकेचा कार्यक्रम बदलण्यात आला होता. भारत आणि श्रीलंका यांच्यादरम्यान आत्तापर्यंत १५९ वनडे सामने खेळले गेले आहेत. यामध्ये अनेक ऐतिहासिक सामने होऊन गेले आहेत जे क्रिकेटप्रेमी विसरू शकत नाहीत. उभय संघातील अशाच एका रोमांचक सामन्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.
राजकोटचा रणसंग्राम
भारत आणि श्रीलंका यांच्यातील आजवरचा सर्वात संस्मरणीय वनडे सामना २००९ मध्ये राजकोटच्या मैदानावर खेळला गेला होता. या सामन्यात तब्बल ८० चौकार व २४ षटकार लगावले गेले होते. उभय संघांनी मिळून या सामन्यात ८२५ धावांची लयलूट केलेली. अत्यंत अटीतटीच्या झालेला हा सामना दोन्ही संघांच्या चाहत्यांसाठी अविस्मरणीय असा आहे.
वीरू के शोले आणि धोनीचा धमाका
श्रीलंकेचा कर्णधार कुमार संगकारा याने नाणेफेक जिंकत भारतीय संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. त्याचा हा निर्णय चांगलाच उलटला. भारताचे दोन्ही अनुभवी सलामीवीर सचिन तेंडुलकर व वीरेंद्र सेहवाग यांनी अवघ्या १९.३ षटकात १५३ धावांची तोफांची सलामी दिली. सचिन वैयक्तिक ६९ धावांवर माघारी परतल्यानंतर भारतीय कर्णधार एमएस धोनी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरला.
सेहवाग-धोनी जोडीने पुन्हा एकदा श्रीलंकन गोलंदाजांची धुलाई करताना ३५ व्या षटकात भारताला ३०० धावांची मजल मारून दिली. सेहवाग १०२ चेंडूत १७ चौकार व ६ उत्तुंग षटकार ठोकून १४६ धावा काढून बाद झाला. धोनीने ५३ चेंडूत ७२ धावांचे योगदान दिले. इतर फलंदाजांच्या थोड्याथोड्या योगदानामुळे भारतीय संघाने ७ बाद ४१४ अशी भलीमोठी धावसंख्या उभारली. श्रीलंकेसाठी अनुभवी सनथ जयसूर्याने सर्वाधिक पाच बळी मिळवले.
दिलशानचा पलटवार
भारतीय संघाने दिलेले हिमालयाएवढे आव्हान पार करताना श्रीलंका संघ जराही डगमगला नाही. श्रीलंकेचे सलामीवीर तिलकरत्ने दिलशान व उपुल थरंगा यांनी भारतीय जोडीच्या एक पाऊल पुढे जात २४ षटकात १८८ धावा चोपल्या. थरंगा ६७ धावा काढून बाद झाल्यानंतर उतरलेल्या कर्णधार कुमार संगकाराने दिलशानला तशीच साथ देत दुसऱ्या गड्यासाठी आणखी १२८ धावांची भर घातली. संगकाराने कदाचित कारकीर्दीतील सर्वात वेगवान खेळी करत ४३ चेंडूंमध्ये १० चौकार व ५ षटकारांच्या मदतीने ९० धावांची आकर्षक खेळी साकारली.
त्यानंतर मात्र भारतीय गोलंदाजांनी झटपट तीन गडी बाद करत सामन्यात रंगत आणली. भारतासाठी सेहवागने ज्याप्रकारे खेळी केली त्याच प्रकारची खेळी दिलशानने श्रीलंकेसाठी केली. त्याने १२४ चेंडूत १६० धावा ठोकल्या. थिलन किदंबी व अँजेलो मॅथ्यूज यांनी ५६ धावांची भागीदारी करत श्रीलंकेला ४०० चा टप्पा पार करून दिला. श्रीलंकेला अखेरच्या षटकात विजयासाठी ११ धावांची गरज असताना वेगवान गोलंदाज आशिष नेहराने केवळ सात धावा देत भारताला तीन धावांनी विजय मिळवून दिला.
https://twitter.com/ICC/status/1338809792828219393
मालिकेतील हा पहिला सामना जिंकल्यानंतर भारतीय संघाने पाच सामन्यांची ही मालिका ३-१ अशा फरकाने आपल्या नावे केली.
महत्त्वाच्या बातम्या –
भारत-श्रीलंका संघातील पहिल्या वनडेत येणार का पावासाचा व्यत्यय? पाहा काय आहे हवामानाचा अंदाज
तब्बल ११० किलो वजनाच्या आजम खानने केले आंतरराष्ट्रीय पदार्पण, पण पहिल्याच सामन्यात झाला प्रचंड ट्रोल






