भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील वनडे मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना बुधवारी (२ डिसेंबर) कॅनबेरा येथे होणार आहे. मनुका ओव्हल मैदानावरील या सामन्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पहिला विजय मिळविण्याचे आव्हान भारतीय संघापुढे असेल. भारतीय संघ या सामन्यांत परदेशी दौर्यावरील सलग दुसर्या वनडे मालिकेतील क्लीन स्वीप वाचविण्याचा देखील प्रयत्न करेल. यापूर्वी २०२० च्या सुरुवातीला न्यूझीलंड दौर्यावर भारतीय संघाला वनडे मालिकेत ३-० असा पराभव पत्करावा लागला होता.
भारतीय गोलंदाजांना कामगिरीत सुधारणा करण्याची गरज
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेतील पहिल्या दोन्ही सामन्यांत ऑस्ट्रेलियन फलंदाजांसमोर भारतीय गोलंदाज निष्प्रभ ठरले होते. सिडनी क्रिकेट मैदानावर खेळल्या गेलेल्या दोन सामन्यांत ऑस्ट्रेलियाने अनुक्रमे ३७४ आणि ३८९ धावांचा रतीब घातला होता. भारतीय गोलंदाज बळी घेण्यात तसेच धावा रोखण्यातही अपयशी ठरले. भारतीय संघाला तिसरा सामना जिंकायचा असल्यास गोलंदाजांनी कामगिरीत सुधारणा करण्याची नितांत आवश्यकता आहे.
ऑस्ट्रेलियन फलंदाजांचे वर्चस्व
या मालिकेत ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी निर्विवाद वर्चस्व गाजवले आहे. ऑस्ट्रेलियाच्या वरच्या फळीतील फलंदाजांनी ७० हून अधिक सरासरीने धावा काढल्या आहेत. स्टीव स्मिथने २ शतकांसह भारताविरुद्धचा दमदार फॉर्म कायम राखला, तर डेविड वॉर्नर आणि कर्णधार ऍरॉन फिंच यांनी देखील त्याला तोलामोलाची साथ दिली आहे. याव्यतिरिक्त मार्नस लॅब्यूशाने आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी मोक्याच्या वेळी फटकेबाजी करत संघाच्या धावसंख्येत हातभार लावला आहे.
दुसरीकडे भारतीय फलंदाजांतर्फे मालिकेत एकाही शतकाची नोंद झाली नाही. पहिल्या सामन्यांत शिखर धवन व हार्दिक पंड्याने अर्धशतक झळकावले, तर दुसर्या सामन्यात कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार केएल राहुलने अर्धशतक ठोकले. मात्र, अर्धशतकाचे मोठ्या खेळीत रूपांतर करण्यात त्यांना अपयश आले. तिसर्या वनडे सामन्यात विजयी होण्यासाठी किमान एका भारतीय फलंदाजांने जबाबदारी खांद्यावर घेत मोठी खेळी उभारण्याची गरज आहे.
वॉर्नर-कमिन्सच्या अनुपस्थितीचा फायदा
दुसर्या वनडे सामन्यांत क्षेत्ररक्षण करताना ऑस्ट्रेलियाचा सलामी फलंदाज वॉर्नर दुखापतग्रस्त झाला. त्यामुळे उर्वरित मर्यादित षटकांचे सामने तो खेळू शकणार नाही. तसेच वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सला कसोटी मालिकेच्या दृष्टीने विश्रांती देण्याचा निर्णय ऑस्ट्रेलियन संघ व्यवस्थापनाने घेतला आहे. या दोन खेळाडूंच्या अनुपस्थितीचा फायदा घेत तिसर्या सामन्यात वर्चस्व प्रस्थापित करण्याची संधी भारतीय संघाकडे आहे.
कोहलीला खास विक्रमाची संधी
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक शतके झळकविण्याच्या विक्रमापासून विराट कोहली केवळ एक शतक दूर आहे. कोहलीच्या नावावर कर्णधार म्हणून १८३ सामन्यांत ४१ शतके आहेत. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगच्या नावावर देखील ४१ शतके आहेत. या यादीत दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथ ३३ शतकांसह तिसर्या स्थानी आणि ऑस्ट्रेलियाचा स्टीव स्मिथ २० शतकांसह चौथ्या स्थानावर आहे.
मनुका ओव्हलवरील आकडेवारी भारतासाठी चिंताजनक
कॅनबेरा येथील मनुका ओव्हल मैदानावर ऑस्ट्रेलियाने आत्तापर्यंत खेळलेल्या चारही वनडे सामन्यांत विजय मिळविला आहे. भारतीय संघाने या मैदानावर आजवर दोन सामने खेळले आहेत. परंतु दोन्ही सामन्यांत त्यांना पराभव पत्करावा लागला होता. भारतीय संघ ही आकडेवारी बदलण्याचा प्रयत्न तिसर्या वनडे सामन्यात करेल.
हवामान व खेळपट्टी
कॅनबेरात बुधवारी (२ डिसेंबर) आकाश निरभ्र असण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. कमाल तापमान २६° सेल्सिअस तर किमान तापमान १२° सेल्सिअस असेल. मनुका ओव्हलची खेळपट्टी फलंदाजांना मदत करणारी असेल. या मैदानावरील मागच्या ९ सामन्यांत प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने ७७.७७% सामने जिंकले आहेत.
तिसऱ्या वनडे सामन्यासाठी दोन्हीही संघ-
भारत- विराट कोहली (कर्णधार), के एल राहुल (उपकर्णधार व यष्टीरक्षक), शिखर धवन, मयंक अगरवाल, श्रेयस अय्यर, शुबमन गिल, मनीष पांडे, संजू सॅमसन, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, शार्दुल ठाकूर, नवदीप सैनी, टी नटराजन
ऑस्ट्रेलिया- ऍरॉन फिंच (कर्णधार), स्टीव स्मिथ, मार्नस लॅब्यूशाने, डॉर्सी शॉर्ट, मोईसेस हेन्रीक्स, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉयनिस, अॅश्टन अगर, कॅमरुन ग्रीन, डॅनियल सॅम्स, अलेक्स कॅरे, मॅथ्यू वेड, पॅट कमिन्स, जोश हेजलवूड, मिचेल स्टार्क, सीन एबॉट, एंड्रयू टाय, ऍडम झाम्पा.
महत्त्वाच्या बातम्या-
‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया बीसीसीआयला घाबरते’, ऑस्ट्रेलियाच्या चॅनल ७ ची कोर्टात धाव
धक्कादायक! पाकिस्तानचा सातवा खेळाडू ‘कोरोना पॉझिटिव्ह’, दौरा रद्द होण्याचे संकट
ट्रेंडिंग लेख-
नादच खुळा! ऑस्ट्रेलिया दौर्यात एकाच टी२० मालिकेत सर्वात जास्त विकेट्स घेणारे ३ भारतीय शिलेदार
भारताविरुद्ध वनडेत सलग ३ शतके झळकविणारे फलंदाज, पाकिस्तानच्या २ खेळाडूंचाही समावेश
भारतीय गोलंदाजांना रडकुंडीला आणत सर्वाधिक शतके ठोकणारे ३ धडाकेबाज फलंदाज