INDW vs AUSW 1st ODI: वानखेडे स्टेडिअम येथे भारतीय महिला विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला संघात 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी भारताने जेमिमा रॉड्रिग्ज हिच्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर 250 धावांचा टप्पा यशस्वीरीत्या पार केला. तसेच, ऑस्ट्रेलिया महिला संघाला विजयासाठी 283 धावांचे आव्हान दिले.
जेमिमाची दमदार खेळी
भारतीय महिला विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला (India Women vs Australia Women) संघातील सामन्यात हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) हिच्या नेतृत्वातील भारताने निर्धारित 50 षटकात 8 विकेट्स गमावत 282 धावा केल्या. तसेच, यावेळी प्रथम फलंदाजी करताना भारताची सुरुवात चांगली झाली नाही. अवघ्या 12 धावांवर शेफाली वर्मा बाद झाली. तिने यावेळी फक्त 1 धावेचे योगदान दिले. त्यानंतर रिचा घोष हिनेदेखील 21 धावांवर विकेट गमावली. कर्णधार हरमनप्रीत कौर हिला यावेळी मोठी खेळी करता आली नाही. ती फक्त 9 धावांवर तंबूत परतली. सलामी फलंदाज यास्तिका भाटिया (Yastika Bhatia) हिने 49 धावांची शानदार खेळी केली.
तिच्याव्यतिरिक्त दीप्ती शर्मा हीदेखील चांगल्या लयीत खेळत असताना 21 धावांवर बाद झाली. तसेच, अमनज्योत कौर हिलाही 20पेक्षा जास्त धावा करता आल्या नाहीत. त्यानंतर स्नेह राणाही शेफालीप्रमाणे फक्त 1 धावेवर तंबूत परतली. मात्र, पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरलेली जेमिमा रॉड्रिग्ज (Jemimah Rodrigues) चमकली. तिने सामन्यात सर्वाधिक खेळी केली. तिने 77 चेंडूत 7 चौकारांच्या मदतीने 82 धावा केल्या. जेमिमाह बाद झाल्यानंतर पूजा वस्त्राकर (Pooja Vastrakar) हिने फिनिशरची भूमिका निभावली. पूजाने नाबाद 62 धावांची खेळी करत संघाला समाधानकारक धावसंख्येपर्यंत पोहोचवले.
यावेळी ऑस्ट्रेलियाकडून ऍश्ले गार्डनर आणि जॉर्जिया वेरेहॅम यांनी प्रत्येकी 2 विकेट्स नावावर केल्या. तसेच, इतर चारही गोलंदाजांनी प्रत्येकी एक विकेट नावावर केली. ताहलिया मॅकग्राला विकेट मिळवण्यात अपयश आलं. (india women gave 283 runs target australia women in indw vs ausw 1st odi)
हेही वाचा-
‘टीम इंडियाला स्पष्टपणे त्याची उणीव भासतेय…’, गोलंदाजी प्रदर्शन पाहून दिग्गजाने काढली शमीची आठवण
AUS vs PAK: थेट कपाळावर दिला ॲाटोग्राफ! क्रिकेटर अन् चाहत्याचा भन्नाट फोटो Viral, पाहा कोण आहे तो