---Advertisement---

पहिल्या वनडेत टीम इंडियाचा रोमांचक विजय! ब्रेसवेलची एकाकी झुंज अपयशी, सिराजची चालली जादू

On: बुधवार, जानेवारी 18, 2023 10:02 PM
---Advertisement---

भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना बुधवारी (दि. 18 जानेवारी) हैदराबाद येथे खेळण्यात आला. अत्यंत रोमांचक झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने 12 धावांनी विजय मिळवला. शुबमन गिलने भारतीय संघासाठी द्विशतक केले. न्यूझीलंडसाठी मायकेल ब्रेसवेलने प्रयत्नांची शिकस्त केली. मात्र, त्याला संघाला विजय मिळवून देण्यात अपयश आले. या विजयासह भारतीय संघाने मालिकेत 1-0 असा आघाडीवर आला आहे.

 

हैदराबाद येथील राजीव गांधी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार रोहित शर्मा व शुबमन गिलने संघाला 60 धावांची सलामी दिली. रोहितने 34 धावांची खेळी केली. विराट कोहली व ईशान किशन या सामन्यात अपयशी ठरले. मात्र, गिलने एक बाजू लावून धरत आपल्या कारकिर्दीतील तिसरे शतक पूर्ण केले. त्याने यादरम्यान सूर्यकुमार यादव व हार्दिक पंड्या यांच्यासह अर्धशतकी भागीदारी केल्या. शुबमनने आपल्या खेळीने इतिहास रचत द्विशतक साजरे केले. त्याने 149 चेंडूवर 208 धावांची खेळी केली. यात 19 चौकार व 9 षटकारांचा समावेश होता. त्याच्याच योगदानाने भारतीय संघाने न्यूझीलंडसमोर 350 धावांचे आव्हान ठेवले.

भारतीय संघाने ठेवलेल्या या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडची फलंदाजी कोसळली. सिराज, शमी व कुलदीप यांच्या गोलंदाजीमुळे न्यूझीलंडने आपले पहिले सहा फलंदाज 131 धावांवर गमावले. मात्र, त्यानंतर मायकेल ब्रेसवेल व मिचेल सॅंटनरने भारतीय गोलंदाजांचा चांगला समाचार घेतला. दोघांनी 163 धावांची मोठी भागीदारी रचली. ब्रेसवेलने केवळ 57 चेंडूंमध्ये आपले दुसरे शतक पूर्ण केले. 46 व्या षटकात सिराजने अर्धशतक केलेल्या सॅंटनर आणि शिप्ली यांना बाद करत सामन्यात रंगत निर्माण केली. अखेरच्या षटकात विजयासाठी 20 धावांची गरज असताना ब्रेसवेल दुसऱ्या चेंडूवर बाद झाला. त्यामुळे भारतीय संघाने 12 धावांनी सामना आपल्या खिशात घातला. ब्रेसवेलने 78 चेंडूवर 12 चौकार व 10 षटकारांचा पाऊस पाडत 140 धावांची खेळी केली. द्विशतकी खेळी करणारा गिल सामनावीर ठरला.

(India Won 1st ODI Against Newzealand Gill Double Century And Bracewell Century Highlighted)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---