वेस्ट इंडीज आणि भारत यांच्यातील पाच टी२० सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना नुकताच पार पडला. पाहुण्या भारतीय संघाने जबरदस्त खेळ दाखवत हा सामना ७ गड्यांनी आपल्या नावे केला. यासह भारतीय संघ मालिकेत २-१ अशा फरकाने आघाडीवर पोहोचला आहे.
https://twitter.com/BCCI/status/1554553585224261632?t=Uhfdq2jVwE16uFxD9amwjw&s=19
असा रंगला सामना
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीची संधी मिळालेल्या वेस्ट इंडिज संघाला कायले मायर्स व ब्रेंडन किंग यांनी अर्धशतकी सलामी दिली. किंग २० धावा करून बाद झाला. त्यानंतर निकोलस पूरन, रोवमन पॉवेल व शिमरन हेटमायर यांनीही उपयुक्त योगदान दिले. मायर्सने वेस्ट इंडिजसाठी ५० चेंडूवर ८ चौकार व ४ षटकारांच्या मदतीने ७३ धावा केल्या. त्यामुळे वेस्ट इंडीज संघ निर्धारित २० षटकात १६४ धावा करण्यात यशस्वी ठरला. भारतासाठी भुवनेश्वर कुमारने दोन तर हार्दिक पंड्या व अर्शदीप सिंग यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला.
१६५ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात झकास झाली. कर्णधार रोहित शर्माने एक चौकार व एक षटकार ठोकत आजचा दिवस आपला असल्याचे सांगितले. मात्र, दुसऱ्या षटकातील चौथ्या चेंडू नंतर त्याने अचानक बाहेर जाण्याचा निर्णय घेतला. पाठीत कळा येत असल्याच्या कारणाने तो ११ धावांवर रिटायर हर्ट झाला. तिथून पुढे सूर्यकुमार यादव व श्रेयस अय्यर ही दुसरी मुंबईकर जोडी मैदानात जमली. दोघांनी वेस्ट इंडीजच्या गोलंदाजांना हैराण करत. ८६ धावांची बहुमूल्य भागीदारी केली. श्रेयस २४ धावांवर माघारी परतला. मात्र, सूर्यकुमारने आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने ४४ चेंडूंवर ७६ धावा काढल्या. तो बाद झाल्यानंतर पंतने अखेर पर्यंत नाबाद राहत दीपक हुडासह भारताच्या विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. सूर्यकुमार यादव याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.
उभय संघातील पुढील सामना ६ ऑगस्ट रोजी अमेरिकेतील फ्लोरिडा येथे खेळला जाईल. याच ठिकाणी मालिकेतील अखेरचा सामना ७ ऑगस्ट रोजी होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
तब्बल ८७ हजार प्रेक्षकांपुढे महिला फुलबॉलरने काढला टी-शर्ट, ‘स्पोर्ट्स ब्रा’वरचे सेलिब्रेशन व्हायरल
भारीच! तीन महिन्यात दोन वेळा भारत-पाकिस्तान आमने-सामने, चाहत्यांसाठी क्रिकेटची मोठी पर्वणी
भारताचा ‘हा’ खेळाडू म्हणजे ‘टू इन वन’ मटेरियल! ऑस्ट्रेलियन दिग्गजाने केले कौतुक






