25 जून 1983. भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सगळ्यात अनपेक्षित पण तितकाच अद्भुत दिवस. याच दिवशी भारतीय कर्णधार कपिल देवने क्रिकेटची पंढरी असलेल्या लॉर्डसच्या गॅलरीत वर्ल्डकप उंचावला आणि भारतीय क्रिकेटच्या सोनेरी अध्यायाला सुरुवात झाली. समस्त भारतीयांसाठी प्रचंड अभिमानाचा आणि अलोट उत्साहाचा हा क्षण होता. याच घटनेला आज 40 वर्ष पूर्ण झालीत. मात्र अजूनही अनेकांच्या मनात या दैदीप्यमान विजयाच्या आठवणी ताज्या आहेत.
खरंतर भारतीय संघ या वर्ल्डकपसाठी इंग्लंडला निघाला तेव्हा खुद्द संघाला देखील बहुधा फारसा आत्मविश्वास नव्हता. मागील दोन वर्ल्डकप मधील सुमार कामगिरी याचे मुख्य कारण होती. पण कपिल देवच्या जिगरबाज शिलेदारांच्या मनात काही वेगळे असावे.
वर्ल्डकपची सुरुवातच भारतीय संघाने अनपेक्षित प्रदर्शनाने केली. 9 जून रोजी झालेल्या पहिल्याच सामन्यात बलाढ्य वेस्ट इंडिजचा त्यांनी 34 धावांनी पराभव करत विजयी सलामी नोंदवली. पाठोपाठ पुढच्या सामन्यात त्यांनी झिम्बाब्वेला पण 5 विकेट्सने सहज मात दिली. या सलग दोन विजयाने भारताच्या आव्हानाची सगळ्याच संघांना गांभीर्याने जाणीव झाली. मात्र भारतीय संघाने जणूकाही आपल्याच विजयाला दृष्ट लागू नये, अशा थाटात पुढील दोन सामन्यात खेळ केला. या दोन सामन्यात त्यांना ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज कडून दणदणीत पराभव पत्करावा लागला.
पण या पराभवामुळे गटातील रंगत अजूनच वाढली. भारतीय संघाला आव्हान जिवंत ठेवण्यासाठी पुढील दोन्ही सामने जिंकणे आवश्यक होते. त्यांचा पुढील सामना होता झिम्बाब्वे विरुद्ध. हा सामना लक्षात राहिला ते भारतीय कर्णधार कपिल देवच्या अजरामर खेळीसाठी. 5 बाद 17 अशा स्थितीत फलंदाजीला आलेल्या कपिलने नंतर न भूतो न भविष्यति अशी फलंदाजी केली. त्याच्या 175 धावांच्या विलक्षण खेळीने भारताला या सामन्यात केवळ विजयच मिळवून दिला नाही तर पुढील सामन्यांसाठी नवसंजीवनी दिली. यानंतर भारतीय संघाने मागे वळून पाहिले नाही.
शेवटच्या साखळी सामन्यात विजय अनिवार्य असतांना भारतीय संघाने कांगारूंचे गर्वहरण केले. भारत म्हणजे किस झाड की पत्ती असं मानणाऱ्या ऑस्ट्रेलियन्सना त्यांच्याच संघाचा पालापाचोळा झाल्याचे पाहावे लागले. या विजयाने सेमी फायनलमध्ये दिमाखात प्रवेश केलेल्या भारतीय संघाचा सामना होता इंग्लंडशी. मात्र इंग्लंडने देखील ऑस्ट्रेलियाच्या पराभवातून धडा घेतला नाही. भारतीय संघाला कमी लेखण्याची चूक त्यांनाही भोवली. या सामन्यात भारतीय संघाने 6 विकेट्सने विजय मिळवला आणि इंग्लंडला त्यांच्याच देशात पराभूत करत त्यांच्या नाकावर टिच्चून फायनलमध्ये प्रवेश केला.
फायनलमध्ये पोहोचल्यावर मात्र अचानकपणे सगळ्यांनाच भारतीय संघ इतिहास घडवण्याचा अगदी जवळ पोहोचला आहे, याची जाणीव झाली. मात्र फायनलमध्ये फॉर्मात परतलेला बलाढ्य वेस्ट इंडिज संघ भारताची डाळ शिजू देणार नाही, असाच अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.
फायनलच्या पहिल्या डावात झालेही काहीसे तसेच. भारताची फलंदाजी वेस्ट इंडिजच्या तोफखान्या समोर अवघ्या १८३ धावांत गुंडाळली गेली. यावेळी अनेक भारतीय चाहत्यांनी जिंकण्याची आशा सोडून दिली होती. पण कपिल देव आणि कंपनीच्या मनात काही वेगळेच होते. मध्यमगती गोलंदाज म्हणून हिणवल्या गेलेल्या गोलंदाजांनी वेस्ट इंडिजच्या अजिंक्य वाटणाऱ्या फलंदाजीचा 130 धावांत खुर्दा उडवला. मोहिंदर अमरनाथने शेवटचा विंडीज फलंदाज मायकेल होल्डिंग विरूद्ध एलबीडब्ल्यूचे अपील केल्यावर अंपायरने क्षणार्धात बोट वर केले आणि भारताच्या ऐतिहासिक वर्ल्डकप विजयावर शिक्कामोर्तब झाले.
त्यावेळी लॉर्डसच्या मैदानात उपस्थित असलेले प्रेक्षक तर बेभान झालेच होते मात्र मायदेशी भारतात देखील या विजयाचा अभूतपूर्व जल्लोष साजरा करण्यात आला. अनेक अर्थांनी हे विजेतेपद भारतासाठी खास होते. आज क्रिकेट विश्वात भारतीय संघ जे अधिराज्य गाजवत आहे, त्याचा पाया देखील याच विजयाने घातला. त्यामुळे या विजयाचे गोडवे आजच नाही तर पुढच्या कित्येक पिढ्या गातील, हे नक्की.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएलचा फॉर्म रणजी ट्रॉफीमध्ये कायम, मुंबईविरुद्ध एमपीसाठी पाटीदारचे धमाकेदार अर्धशतक
भारताविरुद्ध सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज या मालिकेतही खेळणार, वाचा संपूर्ण यादी
रणजी ट्रॉफीची फायनल पहिल्यांदा खेळणाऱ्या ‘या’ जोडीने काढला मुंबईचा घाम!