क्रिकेटच्या कोणत्याही प्रकारात शतक करणे महत्त्वाचे मानले जाते. त्यातही कसोटीमध्ये शतक करताना फलंदाजांच्या कौशल्याची आणि कणखर मानसिकतेची परिक्षा पाहिली जाते. पण असे असतानाही ६ भारतीय खेळाडू असे आहेत ज्यांनी कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात शतके केली आहेत. अशा फलंदाजांचा घेतलेला हा आढावा –
कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात शतके करणारे भारतीय फलंदाज (Indian batsmen with hundred in each innings of a Test match) –
१. विजय हजारे –
कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात शतके करण्याचा विक्रम सर्वप्रथम भारताकडून विजय हजारे यांनी केला. त्यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऍडलेड येथे २३ ते २८ जानेवारी १९४८ दरम्यान झालेल्या कसोटी सामन्यात केला होता.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ६७४ धावा केल्या होत्या. त्यानंतर भारताने पहिल्या डावात दत्तू फाडकर यांच्या १२३ धावांच्या आणि हजारे यांच्या ११६ धावांच्या शतकी खेळींच्या जोरावर ३८१ धावा केल्या होत्या. भारताला ऑस्ट्रेलियाकडून फॉलोऑन मिळला होता.
त्यावेळी दुसऱ्या डावात हजारे यांनी भारताकडून भक्कम खेळी उभारताना १७ चौकारांसह १४५ धावा केल्या. मात्र अन्य फलंदाज काही करु शकले नसल्याने भारताचा डाव २७७ धावांवर संपुष्टात आला. त्यामुळे भारताला १ डाव आणि १६ धावांनी पराभव स्विकारावा लागला होता.
२. सुनील गावस्कर –
भारताची माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी आत्तापर्यंत ३ वेळा कसोटी सामन्यात दोन्ही डावात शतके करण्याचा पराक्रम केला आहे. त्यांनी सर्वात आधी १९७१ ला वेस्ट इंडिज दौऱ्यात पोर्ट ऑफ स्पेनमध्ये खेळल्या गेल्या कसोटी सामन्यात असा पराक्रम केला होता.
१३ -१९ एप्रिल १९७१ ला झालेल्या या कसोटी सामन्यात गावस्करांनी केलेल्या १२४ धावांच्या खेळीमुळे भारताने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात ३६० धावसंख्या उभारली होती. वेस्ट इंडिजने पहिल्या डावाच ५२६ धावा करत मोठी आघाडी घेतली. पण नंतर पुन्हा गावस्करांनी शानदार द्विशतकी खेळी केली. त्यांनी २२ चौकारांसह २२० धावा केल्या.
त्या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजला २६२ धावांचे आव्हान दिले होते. पण वेस्ट इंडिजने ८ बाद १६५ धावा केल्यानंतर शेवटच्या दिवसाचा खेळ संपल्याने सामना अनिर्णित राहिला.
गावस्करांनी कसोटीत दोन्ही डावात शतक करण्याचा पराक्रम दुसऱ्यांदा १९७८ मध्ये पाकिस्तान विरुद्ध कराची येथे १४-१९ नोव्हेंबर दरम्यान झालेल्या कसोटी सामन्यात केला होता. भारताने त्यावेळी प्रथम फलंदाजी करताना सर्वबाद ३४४ धावा केल्या होत्या. त्या डावात गावस्करांनी १११ धावा केल्या होत्या.
यानंतर पाकिस्तानने पहिल्या डावात ९ बाद ४८१ धावा केल्या. पण पुन्हा एकदा गावस्कर भारताच्या मदतीला आले. त्यांनी दुसऱ्या डावात २० चौकारांसह १३७ धावा केल्या. पण अन्य फलंदाजांनी साथ न दिल्याने भारताचा दुसरा डाव ३०० धावांवर संपुष्टात आला. त्यानंतर १६४ धावांचे आव्हान पाकिस्तानने सहज पार केले.
कसोटीत दोन्ही डावात शतके करण्याचा पराक्रम गावस्करांनी तिसऱ्यांदा १९७८-७९ च्या मोसमात कोलकाता येथे वेस्ट इंडिज विरुद्ध झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात केला होता. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना गावस्करांच्या १०७ धावांच्या खेळीच्या जोरावर ३०० धावा केल्या होत्या.
त्याला प्रतिउत्तर म्हणून वेस्ट इंडिजने पहिल्या डावात ३२७ धावा केल्या. दुसऱ्या डावात गावस्करांनी शानदार शतकी खेळी करताना नाबाद १८२ धावा केल्या तर दिलीप वेंगसरकरांनी नाबाद १५७ धावा केल्या. त्यामुळे भारताने वेस्ट इंडिजसमोर ३३५ धावांचे आव्हान ठेवले. या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजने ९ बाद १९७ धावा केल्यावर सामना संपल्यावर हा सामना अनिर्णित राहिला.
३. राहुल द्रविड –
द वॉल या नावाने ओळखल्या जाणाऱ्या राहुल द्रविडने कसोटी सामन्यात दोन्ही डावात शतके करण्याचा कारनामा २ वेळा केला आहे. त्याने पहिल्यांदा २-६ जानेवारी १९९९ ला हॅमिल्टन येथे न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यात केले होते.
या सामन्यात न्यूझीलंडने पहिल्या डावात ३६६ धावा केल्या होत्या. त्याच्या प्रतिउत्तरादाखल भारताकडून पहिल्या डावात द्रविडने १९० धावांची खेळी केली. तसेच जवागल श्रीनाथने ७६ धावा केल्या. त्यामुळे भारताने या डावात ४१६ धावा केल्या.
त्यानंतरही न्यूझीलंडने चांगली लढत देताना दुसऱ्या डावात ४६४ धावसंख्या उभारत भारताला ४१५ धावांचे आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना द्रविडने नाबाद १०३ धावा केल्या. तसेच सौरव गांगुलीनेही नाबाद १०१ धावा केल्या. पण हा सामना अनिर्णित राहिला.
द्रविडने कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात शतके करण्याचा कारनामा दुसऱ्यांदा २००५ ला पाकिस्तान विरुद्ध कोलकाता येथे खेळताना केला. मार्चमध्ये झालेल्या या कसोटीत द्रविडने पहिल्या डावात ११० धावांची खेळी केली. भारताने पहिल्या डावात ४०७ धावा केल्या होत्या. तर पाकिस्तानने पहिल्या डावात ३९३ धावा केल्या.
केवळ १४ धावांची आघाडी मिळाल्यानंतर भारताकडून द्रविडने दुसऱ्या डावात १३५ धावा केल्या. तसेच दिनेश कार्तिकने ९३ धावा केल्या. त्यामुळे भारताने दुसरा डाव ९ बाद ४०७ धावांवर घोषित केला आणि पाकिस्तानला ४२२ धावांचे आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानला सर्वाबाद २२६ धावाच करता आल्याने भारताने हा सामना १९५ धावांनी जिंकला.
४. विराट कोहली –
भारताचा सध्याचा कर्णधार विराट कोहलीने २०१४ ला ऑस्ट्रेलिया विरुद्ध ऍडलेड येथे झालेल्या पहिल्या कसोटीत दोन्ही डावात शतके केली होती. त्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात डेव्हिड वॉर्नर, मायकल क्लार्क आणि स्टिव्ह स्मिथच्या शतकाच्या जोरावर ५१५ धावा केल्या होत्या.
त्याच्या प्रतिउत्तरादाखल पहिल्या डावात भारताकडून विराटने ११५ धावांची खेळी केली. तसेच भारताकडून या डावात मुरली विजय, चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेने अर्धशतके केली होती. त्यामुळे पहिल्या डावात भारताने ४४४ धावा केल्या. पण ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात वॉर्नरच्या शतकी खेळीच्या जोरावर ५ बाद २९० धावांवर डाव घोषित करत भारताला ३६४ धावांचे आव्हान दिले.
या आव्हानाचा पाठलाग करताना विराटने १४१ धावांची खेळी केली होती. त्याला मुरली विजयने ९९ धावांची खेळी करुन चांगली साथ दिली होती. मात्र अन्य कोणत्याच भारतीय फलंदाजाने खास काही कामगिरी न केल्याने भारताला हा सामना ४८ धावांनी गमवावा लागला होता.
५. अजिंक्य रहाणे –
२०१५ ला दिल्ली येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या चौथ्या कसोटीत अजिंक्य रहाणेने दोन्ही डावात शतके केली होती. प्रथम फलंदाजी करताना रहाणेने भारताकडून १२७ धावांची खेळी केली. त्याच्या या शतकाच्या जोरावर भारताने पहिल्या डावात सर्वबाद ३३४ धावा केल्या. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेला पहिल्या डावात १२१ धावाच करता आल्या.
रहाणेने पुन्हा भारताकडून दुसऱ्या डावात नाबाद १०० धावा केल्या. तसेच विराटने ८८ धावांची खेळी केली. त्यामुळे भारताने ५ बाद २६७ धावांवर दुसरा डाव घोषित करत दक्षिण आफ्रिकेला ४८१ धावांचे आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेला १४३ धावाच करता आल्या.
६. रोहित शर्मा –
कसोटी सामन्यात दोन्ही डावात शतकी खेळी करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत अजिंक्य रहाणेनंतर दुसरा मुंबईकर फलंदाज रोहित शर्मा येतो. रोहितने मागीलवर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विशाखापट्टणम येथे खेळताना हा कारनामा केला.
त्याने या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाकडून पहिल्या डावात १७६ धावांची खेळी केली होती. तसेच मयंक अगरवालने याच डावात २१५ धावांची खेळी केली होती. त्यामुळे भारताने हा डाव ७ बाद ५०२ धावांवर घोषित केला.
त्याचे प्रतिउत्तर देताना दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात सर्वबाद ४३१ धावा करत चांगली लढत दिली. भारताकडून दुसऱ्या डावात रोहितने १२७ धावांची खेळी केली. त्याला ८१ धावा करणाऱ्या चेतेश्वर पुजाराची चांगली साथ मिळाली. त्यामुळे भारताने हा डाव ४ बाद ३२३ धावांवर घोषित केला आणि दक्षिण आफ्रिकेला ३९५ धावांचे आव्हान दिले.
या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेला १९१ धावाच करता आल्या. त्यामुळे भारताने या सामन्यात २०३ धावांनी विजय मिळवला.
ट्रेंडिंग घडामोडी –
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सर्वाधिक धावा करणारे ५ कसोटीपटू
निवृत्तीनंतर सर्वाधिक ट्विट करणारे ५ भारतीय दिग्गज क्रिकेटपटू
एकाच स्टेडियमवर कसोटीत २ हजारपेक्षा जास्त धावा करणारे ५ खेळाडू