---Advertisement---

मुकेशचा विषयच निराळा! एकाच दौऱ्यावर राडा करत मोडला पाकिस्तानी क्रिकेटरचा भलामोठा रेकॉर्ड, वाचाच

Mukesh kumar
---Advertisement---

सध्या भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. या दौऱ्यासाठी वेगवान गोलंदाज मुकेश कुमार याची निवड झाली. 29 वर्षीय मुकेश याने केवळ 14 दिवसात भारतीय संघासाठी तिन्ही क्रिकेट प्रकारात  पदार्पण केले. त्याने 20 जुलै रोजी वेस्ट इंडिज विरुद्ध कसोटीत पदार्पण केले, त्यानंतर 27 जुलै रोजी त्याची वनडे सामन्यात निवड झाली. त्याबरोबरच 3 ऑगस्ट रोजी मुकेशने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले. एकाच आंतरराष्ट्रीय दौऱ्यावर तिन्ही क्रिकेट प्रकारामध्ये पदार्पण करणारा तो भारताचा दुसरा खेळाडू ठरला. त्याच्याआधी, टी नटराजन याने 2020 ते 2021च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर कसोटी, वनडे आणि टी20 हे तिन्ही क्रिकेट प्रकार खेळले होते. सोबतच मुकेशने एका पाकिस्तानी खेळडूलाही मागे टाकले आहे.

कोणत्याही खेळाडूने तिन्ही क्रिकेट प्रकारामध्ये सर्वात कमी वेळेत पदार्पण करण्याचा हा विक्रम मुकेश कुमार (Mukesh kumar) याने आपल्या नावावर केला. याआधी हा विक्रम पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज एजाज चीमा (Aizaz Cheema) याच्या नावावर होता. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात केवळ 15 दिवसात पदार्पण केले होते. एजाज चीमा याने 1 सप्टेंबर, 2011 रोजी झिम्बाब्वेविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्याच दौऱ्यावर त्याने 8 सप्टेंबर रोजी वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने 16 सप्टेंबर रोजी पहिला आंतरराष्ट्रीय टी20 सामना खेळला होता.

मुकेशने केले संधीचे सोने
भारतीय संघाचे वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांच्या अनुपस्थितीत मुकेशला भारतीय संघात जागा मिळाली. मुकेशने मिळालेल्या संधीचे सोने केले आहे. त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी मालिकेतील एक सामना खेळून 2 विकेट्स घेतल्या. त्यानंतर त्याने वनडे मालिकेतील तिसऱ्या सामन्यात 3 विकेट्स घेऊन भारतीय संघाला विजय मिळवून देण्यात उत्कृष्ट कामगिरी केली. गोलंदाजाने 7 षटके टाकून केवळ 27 धावा देत 3 विकेट्स घेतल्या.

मुकेश याने कसोटी आणि वनडे मालिकेत उत्कृष्ट कामगिरी केली. मात्र, वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी20 मालिकेतील पहिल्या सामन्यात त्याला एकही विकेट घेता आली नाही. तरीही गोलंदाजाने 18 आणि 20 षटकात चांगली गोलंदाजी केली. 18 आणि 20 या षटकादरम्यान वेस्ट इंडिज संघाचे घातक फलंदाज रोवमन पॉवेल आणि शिमरॉन हेटमायर हे खेळपट्टीवर होते. तरीही मुकेशने 18व्या षटकात केवळ 6 धावा दिल्या, तर 20व्या शेवटच्या षटकात 9 धावा दिल्या. या सामन्यात त्याला एकही विकेट घेता आली नसली, तरीही शेवटच्या षटकांमधील त्याच्या गोलंदाजीने भारतीय संघाच्या धावांचा भार कमी केला.

भारताचा पराभव
मात्र, विंडीजच्या 150 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाला निर्धारित 20 षटकात 9 विकेट्स गमावत 145 धावाच करता आल्या. त्यामुळे यजमान वेस्ट इंडिज संघाने हा सामना 4 धावांच्या नजीकच्या फरकाने जिंकला. यासोबतच त्यांनी 5 सामन्यांच्या टी20 मालिकेत 1-0ने आघाडी घेतली. (indian cricketer mukesh kumar breaks record of pakistan cricketer)

महत्वाच्या बातम्या-
दुखापतीमुळे क्रिकेटपासून लांब गेलेला भारताचा ‘हा’ हुकमी एक्का, आशिया चषकात करणार पुनरागमन?

विंडीजने मोडला भारताचा गर्व! 200व्या सामन्यात रोखला विजयरथ; काय होता 1, 50, 100 अन् 150व्या सामन्याचा निकाल?

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---