भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा विश्वचषक 2023 स्पर्धेत तुफान फॉर्ममध्ये आहे. रोहित कर्णधार आणि खेळाडू अशा दोन्ही भूमिका लीलया पार पाडत आहे. त्याच्या नेतृत्वात भारतीय संघाला 6 पैकी 6 सामन्यात विजय मिळवण्यात यश आले आहे. अशात रोहितविषयी भारताचा माजी खेळाडू गौतम गंभीर याने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. गंभीरने रोहितवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. गंभीरनुसार, रोहित फक्त कर्णधार नाही, तर तो एक लीडर आहे. गंभीरनुसार, रोहित स्वत:पेक्षा जास्त संघाचा विचार करतो.
काय म्हणाला गंभीर?
गौतम गंभीर (Gautam Gambhir) याने रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या नेतृत्वाचे कौतुक केले. गंभीरने स्टार स्पोर्ट्सशी बोलताना रोहितविषयी भाष्य करत म्हटले, “भारतीय संघ चांगल्याप्रकारे खेळत आहे. यामागे कर्णधार रोहित शर्माचा मोठा हात आहे. त्याला कर्णधाराऐवजी लीडर म्हणणे जास्त योग्य ठरेल. तो स्वत:च्या आकडेवारी किंवा शतकासाठी खेळत नाही. तो संघाचा विचार करतो. जर त्याने शतक केले, तर 200 धावा करण्याचा विचार करतो.”
पुढे बोलताना तो म्हणाला, “इंग्लंडविरुद्ध तो 87 धावांवर बाद झाला, पण त्याला वाटलेच असते, तर त्याने सहजरीत्या आणखी 13 धावा करत शतक पूर्ण केले असते. मात्र, रोहितने आपल्या संघाची धावगती वाढवण्याचा विचार केला. जेणेकरून जास्त धावसंख्या बनवता येईल. तो इतरांना श्रेय देतो आणि कधीही स्वत: श्रेय घेत नाही. असा लीडर जेव्हा संघात असतो, तेव्हा लोक त्याच्यासाठी खेळतात. जेव्हा संघ त्याच्यासाठी खेळतो, तेव्हा एक संघ बनतो. माझ्या मते, आपल्याकडे एक असा लीडर आणि गोलंदाजी आक्रमण आहे, जे आपल्याला विश्वचषक जिंकण्याचा प्रबळ दावेदार बनवते.”
रोहितची कारकीर्द
रोहित शर्मा याच्या वनडे कारकीर्दीविषयी बोलायचं झालं, तर त्याने आतापर्यंत 257 सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 31 शतके निघाली आहेत. तसेच, त्याच्या नावावर 54 अर्धशतकांचाही समावेश आहे. तो वनडे क्रिकेट इतिहासात 3 द्विशतक ठोकणारा एकमेव खेळाडू आहे. त्याच्या नेतृत्वात भारतीय संघ विश्वचषक जिंकेल, याची कोट्यवधी क्रिकेटप्रेमींना आशा आहे. (indian cricketer rohit sharma is not a captain he is a leader says gautam gambhir)
हेही वाचा-
टॉस जिंकत बांगलादेश करणार Batting, शाकिब म्हणाला, ‘आमच्याकडे गमावण्यासाठी काहीच नाही’, पाकिस्तानमध्ये 3 बदल
इंग्लंडच्या पराभवानंतर चिडले रवी शास्त्री; म्हणाले, ‘तुम्ही स्वत:ला वर्ल्ड चॅम्पियन म्हणवता? आता…’