भारतीय हॉकी संघानं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये चमकदार कामगिरी करत कांस्यपदक जिंकलं आहे. या ऑलिम्पिकमधील भारताचं हे चौथे पदक ठरलं. तर भारतीय हॉकी संघाचं एकूण ऑलिम्पिक इतिहासातील हे 13वं पदक आहे. कांस्यपदकाच्या लढतीत भारतानं स्पेनचा 2-1 असा पराभव केला. टीम इंडियाच्या या विजयाचा हिरो ठरला कॅप्टन हरमनप्रीत सिंग. त्यानं सामन्यात दोन गोल केले.
या संपूर्ण ऑलिम्पिकमध्ये हरमनप्रीतनं दमदार कामगिरी केली आहे. आज तो स्पेनच्या पराभवाचं कारण ठरला. सामन्याचा पहिला क्वार्टर खूपच रंजक होता. यामध्ये दोन्ही संघांनी कडवी टक्कर दिली. पण एकही गोल झाला नाही. दुसऱ्या क्वार्टरमध्ये स्पेननं 18व्या मिनिटाला गोल केला. मात्र, हरमनप्रीतनं स्पेनला फार काळ आनंद साजरा करू दिला नाही. त्यानं 30व्या मिनिटाला गोल करत भारताला बरोबरी मिळवून दिला.
अशाप्रकारे दुसऱ्या क्वार्टरअखेर दोन्ही संघ 1-1 ने बरोबरीत होते. तिसऱ्या क्वार्टरमध्ये भारतानं पुन्हा गोल केला. हरमनप्रीतनं 33व्या मिनिटाला पेनॉल्टी कॉर्नरचं गोलमध्ये रुपांतर केलं. चौथ्या क्वार्टरच्या अखेरपर्यंत भारताकडे आघाडी कायम होती. अशाप्रकारे भारताने हा सामना 2-1 ने जिंकला.
हरमनप्रीत सिंगनं संपूर्ण ऑलिम्पिकमध्ये तुफान फॉर्म दाखवला. त्यानं भारतासाठी 8 सामन्यांत 10 गोल मारले. विशेष म्हणजे, हरमननं ग्रेट ब्रिटन विरुद्धच्या उपांत्यपूर्व सामन्यात, जर्मनीविरुद्धच्या उपांत्य सामन्यात आणि स्पेनविरुद्धच्या कांस्यपदकाच्या सामन्यातही गोल केला.
टीम इंडियाचा हा विजय ऐतिहासिक आहे. भारतानं 52 वर्षांनंतर सलग दुसऱ्यांदा ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकलंय. टीम इंडियानं 2020 मध्ये कांस्यपदक जिंकलं होतं. आता भारतानं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये याची पुनरावृत्ती केली. ऑलिम्पिकमध्ये भारतानं आतापर्यंत एकूण 13 पदकं जिंकली आहेत.
ऑलिम्पिकच्या इतिहासात भारतीय हॉकी संघानं जिंकलेली पदकं
1928 ऑलिम्पिक – सुवर्णपदक
1932 ऑलिम्पिक – सुवर्णपदक
1936 ऑलिम्पिक – सुवर्णपदक
1948 ऑलिम्पिक – सुवर्णपदक
1952 ऑलिम्पिक – सुवर्णपदक
1956 ऑलिम्पिक – सुवर्णपदक
1960 ऑलिम्पिक – रौप्यपदक
1964 ऑलिम्पिक – सुवर्णपदक
1968 ऑलिम्पिक – कांस्यपदक
1972 ऑलिम्पिक – कांस्यपदक
1980 ऑलिम्पिक – सुवर्णपदक
2020 ऑलिम्पिक – कांस्यपदक
2024 ऑलिम्पिक – कांस्यपदक
हेही वाचा –
पीआर श्रीजेशला खेळाडूंचा कुर्निसात! ऐतिहासिक पदकानंतर मिळाला खास निरोप
भारताच्या पठ्ठ्यांनी करून दाखवलं! सलग दुसऱ्या ऑलिम्पिकमध्ये जिंकलं कांस्यपदक
टीम इंडियावर भारी पडलेल्या श्रीलंकेच्या ‘या’ 3 खेळाडूंवर आयपीएल 2025च्या मेगा लिलावात लागू शकते मोठी बोली