जपानच्या ऑलिम्पिक व्हिलेजमधून भारतासाठी मागील दोन दिवसात अतिशय सुखद धक्का देणाऱ्या बातम्या आल्या. यामागे होते भारताचे पुरुष आणि महिला हॉकी संघ. १ ऑगस्ट रोजी भारताच्या पुरुष हॉकी संघाने इंग्लंडचा पराभव करता टोकियो ऑलिम्पिकच्या सेमिफायनलमध्ये धडक मारली. तब्बल ४० वर्षांनंतर पुरुष हॉकी संघाने ऑलिम्पिक्सची सेमिफायनल गाठली. तर ‘हमारी छोरीया छोरो से कम नही’, हेच सिद्ध करत २ ऑगस्टला महिला हॉकी संघाने देखील सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. तीन वेळच्या ऑलिम्पिक सुवर्णपदकविजेत्या ऑस्ट्रेलियाचा पराभव करत त्यांनी जगाला आपली ताकद दाखवून दिली.
खरंतर हॉकी हा आपला राष्ट्रीय खेळ. स्वातंत्र्यपूर्व काळात देशाने हॉकीचा सुवर्णकाळ अनुभवला होता. स्वातंत्र्यानंतर देखील तब्बल ६ सुवर्णपदक भारतीय पुरुष हॉकी संघाने पटकावली होती. मात्र त्यांनतर भारतीय हॉकीला उतरती कळा लागली. एकेकाळी सहजपणे सुवर्णपदक खिशात टाकणाऱ्या संघाला बाद फेरी गाठणे देखील कठीण होऊ लागले होते. साहजिकच चाहत्यांनी देखील संघाच्या कामगिरीची दखल घेणे सोडून दिले.
यंदाच्या ऑलिम्पिक्समध्ये मात्र दोन्ही संघांनी परिस्थिती बदलण्याचा कडवा निर्धार केला होता. त्यालाच साजेसा खेळ दोन्ही संघांनी केला. पुरुष संघाने साखळी फेरीत केवळ ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्विकारला. तर अर्जेंटिनासारख्या गतविजेत्या संघालाही मात देत क्वार्टर फायनलमध्ये मजल मारली. या सामन्यात त्यांच्या समोर ग्रेट ब्रिटनचे आव्हान होते. सामना चुरशीचा होईल, असा अंदाज होता. मात्र भारतीय संघाने हा अंदाज खोटा ठरवत एकतर्फी सामना खिशात घातला. पहिल्या हाफ मध्ये तर भारताच्या अफलातून खेळावर इंग्लंडकडे कुठलेच उत्तर नव्हते. दुसऱ्या हाफमध्ये त्यांनी पुनरागमन करण्याचा प्रयत्न करताना जोरदार आक्रमण केले. मात्र त्यांच्यात आणि विजयात भिंत म्हणून उभा राहिला, तो भारताचा अनुभवी गोलकीपर पीआर श्रीजेश. इंग्लंडला आपल्या ८ पेनल्टी कॉर्नर पैकी केवळ एकाचे गोलमध्ये रुपांतर करण्यात यश आले. यातूनच श्रीजेशच्या कामगिरीचे महत्व अधोरेखित होते. त्याला इतर खेळाडूंनी सुरेख साथ दिल्याने ३-१ असा दिमाखादार विजयासह भारताने सेमिफायनल गाठली. सेमिफायनलमध्ये त्यांचा सामना बेल्जियमशी होईल.
महिला हॉकी संघाने देखील २ ऑगस्ट रोजी पुरुष संघाचाच कित्ता गिरवला. त्यांनी देखील क्वार्टर फायनलमध्ये बलाढ्य ऑस्ट्रेलियावर १-० अशा फरकाने मात केली. आणि यासह ऑलिम्पिक इतिहासात प्रथमच सेमिफायनल गाठली. खरंतर जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानावर असणाऱ्या महिला हॉकी संघाकडून इतक्या चमकदार कामगिरीची कोणालाच अपेक्षा नव्हती. साखळी फेरीचा अडथळा ओलांडून बाद फेरी गाठली, तरी ते मोठे यश मानल्या जाणार होते. मात्र राणी रामपालच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारताच्या या रणरागिणींनी अविश्वसनीय गोष्ट शक्य करून दाखवली.
दोन्ही संघांसाठी ऑलिम्पिक पदक आता केवळ एका विजयाच्या अंतरावर आहे. मात्र पदक जवळ दिसत असले तरी येत्या सामन्यात दोन्ही संघांना कामगिरीत सातत्य राखणे गरजेचे असेल. त्यामुळे त्यांच्या यशाने भारतीय चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असले तरी खेळाडू मात्र पुढील सामन्यांकडे लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करतील. करोडो भारतीयांचे डोळे आता त्यांच्याकडे पदकाच्या आशेने पाहत आहेत. या आशा पूर्ण करत दोन्ही संघांनी ऐतिहासिक पदक पटकवावे, याच त्यांना शुभेच्छा.