इंडियन प्रीमीयर लीग २०२२ (IPL) स्पर्धेसाठी येत्या १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी खेळाडूंचा मेगा लिलाव पार पडणार आहे. या लिलावासाठी १० संघांनी ५९० खेळाडूंची अंतिम निवड केली आहे. दरम्यान, या ५९० खेळाडूंमध्ये तीन असे खेळाडू आहेत, ज्यांच्या नावावर एक अनोखा विक्रम होऊ शकतो.
आयपीएलमध्ये सर्वाधिक संघांकडून खेळणाऱ्या भारतीय खेळाडूचा विक्रम करण्याची संधी यंदा रॉबिन उथप्पा, दिनेश कार्तिक आणि इशांत शर्मा जवळ असणार आहे. या तिघांनीही आत्तापर्यंत आयपीएलमध्ये प्रत्येकी ६ संघांचे प्रतिनिधित्त्व केले आहे. त्यामुळे जर यंदाच्या लिलावात त्यांना कोणत्या नव्या संघाने आपल्या संघात सामील करून घेतल्यास त्यांचा तो आयपीएलमधील ७ वा संघ ठरेल. याबरोबर ते आयपीएलमध्ये सर्वाधिक संघांचे प्रतिनिधित्त्व करणारे भारतीय खेळाडू ठरतील. (Indian player played for most ipl teams)
या तिघांनी कोणकोणत्या संघांचे प्रतिनिधित्त्व आत्तापर्यंत केलंय, याबद्दल जाणून घेऊ.
१. रॉबिन उथप्पा (Robin Uthappa)
उथप्पाबाबत बोलायचे झाल्यास, यंदाच्या लिलावासाठी त्याची २ कोटी मुळ किंमत आहे. तो गेल्यावर्षी चांगल्या फॉर्ममध्ये होता. त्याने ४ सामन्यात ११५ धावा केल्या होत्या. त्याने आत्तापर्यंत मुंबई इंडियन्स, पुणे वॉरियर्स इंडिया, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, कोलकाता नाइट राइडर्स, राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स या ६ संघांचे प्रतिनिधित्त्व करताना एकूण १९३ सामने खेळले आहेत.
२. इशांत शर्मा (Ishant Sharma)
त्याचबरोबर वेगवान गोलंदाज इशांत शर्माने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये ९३ सामने खेळताना कोलकाता नाइट राइडर्स, डेक्कन चार्जर्स, सनराइजर्स हैदराबाद, राइजिंग पुणे सुपरजायंट्स, किंग्स इलेव्हन पंजाब दिल्ली कॅपिटल्स या ६ संघांचे प्रतिनिधित्त्व केले आहे. त्याची आयपीएल २०२२ साठी १.५० कोटी मुळ किंमत आहे.
३. दिनेश कार्तिक (Dinesh Karthik)
यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने देखील आयपीएलमध्ये आत्तापर्यंत ६ संघांचे प्रतिनिधित्त्व केले आहे. दिल्ली फ्रँचायझीकडून आयपीएल कारकिर्द सुरू केलेल्या कार्तिकने नंतर किंग्स इलेव्हन पंजाब(पंजाब किंग्स), मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, गुजरात लायन्स आणि कोलकाता नाइट राइडर्स या संघांचे प्रतिनिधित्त्व केले. त्याने आत्तापर्यंत २१३ सामने खेळले असून तो आयपीएलमधील एक यशस्वी यष्टीरक्षक आहे. त्याची आयपीएल २०२२ साठी २ कोटी मुळ किंमत आहे.
फिंच खेळलाय तब्बल ८ संघांकडून
सध्या आयपीएलमध्ये सर्वाधिक संघांकडून खेळण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या ऍरॉन फिंचच्या नावावर आहे. त्याने आत्तापर्यंत एक दोन नव्हे तर तब्बल ८ संघांचे प्रतिनिधित्त्व केले आहे. यावेळीही तो आयपीएल लिलावात असणार आहे. त्यामुळे या ८ संघांव्यतिरिक्त नव्या संघाने त्याला खरेदी केल्यास तो त्याचा ९ वा संघ ठरेल. यंदाच्या लिलावासाठी त्याची १.५ कोटी मुळ किंमत असणार आहे.
फिंच २०१०मध्ये राजस्थान रॉयल्स, २०११-१२मध्ये दिल्ली डेअरडेविल्स, २०१३मध्ये पुणे वॉरियर्स, २०१४मध्ये सनरायझर्स हैद्राबाद, २०१५मध्ये मुंबई इंडियन्स, २०१६-१७मध्ये गुजरात लायन्स, २०१८मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब व २०२०मध्ये रॉयल चॅलेंजर बेंलगोर अशा ८ संघांकडून खेळला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएल लिलावापूर्वीच ‘स्विंग किंग’ रवीकुमारला ‘या’ संघात मिळाले स्थान
कशी आहे रोहितच्या नेतृत्त्वाची शैली? भारताच्या ३१ वर्षीय गोलंदाजाने केला उलगडा