आयपीएलच्या 13 व्या हंगामातील 43 व्या सामन्यात किंग्स इलेव्हन पंजाबने 126 धावा करुनही सामना जिंकला. हा एक अतिशय रोमांचक सामना होता. लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या सनरायझर्स हैदराबादचे शेवटचे 5 फलंदाज अवघ्या 2 धावा काढून बाद झाले. हैदराबाद 114 धावांवर सर्वबाद झाला. पंजाबने 12 धावांनी हा सामना जिंकला. यापुर्वी असे काही सामने झाले आहेत, ज्यात धावा कमी करुनही संघांनी शानदार विजय मिळवले आहेत. या लेखात आपण त्या संघाबद्दल माहिती घेणार आहोत, ज्यांनी स्पर्धेच्या इतिहासातील पाच सर्वात लहान धावसंख्येचा यशस्वीपणे बचाव केला आहे.
मुंबई विरुद्ध पुणे (2012) 120 धावा
पाचव्या क्रमांकावर मुंबई इंडियन्स संघ असून 2012 मध्ये त्याने पुणे संघाविरुद्ध 120 धावांचा बचाव करून सामना जिंकला होता. वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा आणि फिरकीपटू हरभजन सिंगच्या शानदार गोलंदाजीमुळे मुंबईने 1 धावेने थरारक विजय मिळाला होता.
हैदराबाद विरुद्ध पुणे (2013) 119 धावा
2013 मध्ये हैदराबाद संघ 119 धावांवर बाद झाला होता तरीही पुणे संघाला विजय मिळवता आला नव्हता. या सामन्यात फिरकीपटू अमित मिश्राने घेतलेल्या हॅट्रिकमुळे हैदराबादने 11 धावांनी सामना जिंकला होता.
पंजाब विरुद्ध मुंबई (2009) 119 धावा
या यादीत तिसऱ्या क्रमांकावर पंजाब संघ आहे. पंजाबने 2018 मध्ये मुंबईविरुद्ध 119 धावसंख्येचा बचाव केला होता. दिग्गज फलंदाज युवराज सिंग, अष्टपैलू इरफान पठाण आणि फिरकीपटू युसुफ अब्दुल्ला यांच्या शानदार गोलंदाजीमुळे पंजाबने मुंबईला 3 धावांनी पराभूत केले होते.
हैदराबाद विरुद्ध मुंबई (2018) 118 धावा
हैदराबादविरुद्ध 2018 मध्ये 118 धावांचा पाठलाग करण्यात मुंबई संघ अपयशी ठरला होता. या सामन्यात मुंबईकडून अष्टपैलू क्रुणाल पंड्या आणि युवा फलंदाज सूर्यकुमार यादव केवळ हे दोन फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले होते.
चेन्नई विरुद्ध पंजाब ( 2009) 116 धावा
तीन वेळेचा चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्सने सर्वात कमी धावसंख्येचा यशस्वीपणे बचाव केला होता. 2009 मध्ये संघाने केवळ 116 धावा करून पंजाबविरुद्ध विजय मिळवला होता. या सामन्यात पंजाबने 8 गडी गमावून केवळ 92 धावा केल्या होत्या.
महत्त्वाच्या बातमी- वडिलांच्या अंत्यसंस्काराला दुबईत असलेला आयपीएल स्टार व्हिडिओ कॉलद्वारे सहभागी






