भारताकडून आत्तापर्यंत २३१ खेळाडू वनडेमध्ये किमान १ तरी सामना खेळले आहेत. त्यातील १७१ खेळाडूंनी किमान १ चेंडू तरी गोलंदाजी करताना टाकला आहे. आत्तापर्यंत या खेळाडूंंनी भारताकडून गोलंदाजी करताना अनेक विक्रम रचले आहेत. आपण नेहमीच या गोलंदाजांनी घेतलेल्या विकेट्सची चर्चा करतो.
पण अनेकदा मोठे विक्रम करणाऱ्या खेळाडूंचा एखादा दिवस इतका खराब असतो की फलंदाज त्यांच्या गोलंदाजीवर तुटुन पडतात. आत्तापर्यंत भारताकडून वनडेत गोलंदाजांनी २७ वेळा ८० किंवा त्यापेक्षा अधिक धावा दिल्या आहेत. त्यात चार फिरकपटूंचा समावेश आहे. या फिरकीपटूंचा घेतलेला हा आढावा –
वनडेमध्ये ८० किंवा त्यापेक्षा अधिक धावा देणारे भारतीय फिरकीपटू (Indian spinners conceded over 80 runs in an ODI)-
१. युजवेंद्र चहल –
मागील अनेक वर्षांपासून भारताच्या मर्यादीत षटकांच्या क्रिकेट संघाचा नियमित सदस्य असलेला युजवेंद्र चहलने आत्तापर्यंत अनेकदा चांगली कामगिरी केली आहे. पण त्याच्या नावावर एक नकोसा विक्रमही आहे. तो वनडेमध्ये एका सामन्यात सर्वाधिक धावा देणारा भारतीय फिरकीपटू आहे.
त्याने मागीलवर्षी विश्वचषकात बर्मिंगहॅम येथे इंग्लंडविरुद्ध १० षटके गोलंदाजी करताना ८८ धावा दिल्या होत्या. त्या सामन्यात त्याला विकेट घेता आली नव्हती. हा सामना भारत पराभूत झाला होता.
तसेच त्याआधी त्याने मागीलवर्षीच मार्चमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध मोहाली येथे १० षटके गोलंदाजी करताना ८० धावा दिल्या होत्या. त्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ४ विकेट्सने विजय मिळवला होता. त्यामुळे भारताकडून वनडेत २ वेळा ८० किंवा त्यापेक्षा अधिक धावा देणारा तो एकच फिरकीपटू आहे.
२. पियूष चावला –
२०१२ मध्ये भारताकडून शेवटचा आंतराष्ट्रीय सामना खेळलेला पियूष चावला वनडेत एका सामन्यात सर्वाधिक धावा देणाऱ्या भारतीय फिरकीपटूंमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. ३१ वर्षीय चावलाने जून २००८ ला पाकिस्तान विरुद्ध ढाका येथे खेळताना १० षटकांत ८५ धावा दिल्या होत्या. तो सामना पाकिस्तानने २५ धावांनी जिंकला होता.
सलमान बट आणि युनुस खानने त्यावेळी शतके केली होती. बटने १२९ धावा आणि युनुसने १०८ धावा केल्या होत्या. त्यांच्या शतकाच्या जोरावर पाकिस्तानने भारताला ३१६ धावांचे आव्हान दिले होते. पण भारताला २९० धावाच करता आल्या. भारताकडून एमएस धोनीने सर्वाधिक ६४ धावा केल्या होत्या. तसेच युवराज सिंगने ५६ धावांची अर्धशतकी खेळी केली होती.
३. कुलदीप यादव –
युजवेंद्र चहलचा भारताच्या मर्यादीत षटकांच्या क्रिकेट संघातील साथीदार चायनामन गोलंदाज कुलदीप यादवने वनडेत २ वेळा हॅट्रिक घेण्याचा कारनामा केला आहे. पण त्याचबरोबर त्याच्या नावावर एक नकोसा विक्रमही आहे. तो वनडेमध्ये एका सामन्यात सर्वाधिक धावा देणारा भारतीय फिरकीपटूंच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.
त्याने याचवर्षी फेब्रुवारीमध्ये हॅमिल्टन येथे न्यूझीलंडविरुद्ध खेळताना १० षटकात ८४ धावा दिल्या होत्या. पण त्याचबरोबर त्याने या सामन्यात २ विकेट्सही घेतल्या होत्या. या सामन्यात भारताने ४ विकेट्सने पराभव स्विकारला होता.
या सामन्यात भारताने श्रेयस अय्यरने केलेल्या १०३ धावांच्या शतकी खेळीच्या आणि केएल राहुलने केलेल्या आक्रमक ८८ धावांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर न्यूझीलंडला ३४८ धावांचे आव्हान दिले होते. पण न्यूझीलंडने हे आव्हान रॉस टेलरने केलेल्या १०९ धावांच्या शतकी खेळीच्या जोरावर सहज पूर्ण केले.
४. रविंद्र जडेजा –
भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू रविंद्र जडेजाने मागील काही महिन्यांत अनेकदा चांगली कामगिरी केली आहे. तो बऱ्याचदा क्रिकेटमध्ये कमी धावा देण्यासाठी ओळखला जातो. पण २०१४ मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध धरमशाला येथे झालेला वनडे सामना त्याच्यासाठी वाईट अनुभव देणारा ठरला होता. त्याने त्या सामन्यात ९ षटके गोलंदाजी टाकताना ८० धावा दिल्या होत्या. पण त्याचबरोबर त्याने २ विकेट्सही घेतल्या होत्या.
मात्र जडेजाची गोलंदाजी खराब झाली असली तरी भारताने तो सामना जिंकला होता. त्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना विराट कोहलीने केलेल्या १२७ धावांच्या शतकी खेळीच्या जोरावर वेस्ट इंडिजला ३३१ धावांचे आव्हान दिले होते. या धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजला सर्वबाद २७१ धावाच करता आल्या होत्या. त्यामुळे भारताने हा सामना ५९ धावांनी जिंकला होता.
ट्रेंडिंग घडामोडी –
सर जडेजाची टिंगल करणं इंग्लंडच्या खेळाडूला पडलं महाग, जडेजाने दिले खतरनाक उत्तर
क्रिकेटपटूंनो, मोबाईल पासून दूर रहा नाहीतर…
गोष्ट एका क्रिकेटपटूची भाग २०: सचिनचा चाहता ते सचिनचा संघसहकारी झालेला आरपी सिंग