भारताला टोकियो ऑलिंपिक्स २०२० मध्ये शनिवारी (३१ जुलै) झालेल्या बॅडमिंटनच्या उपांत्य सामन्यात मोठा धक्का बसला. भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूला एकेरी गटात जागतिक अव्वल मानांकित चीनी ताईपेच्या ताय झू यिंगकडून २१- १८, २१-१२ अशा सरळ सेटमध्ये पराभूत व्हावे लागले होते. या पराभवामुळे सिंधू सुवर्णपदकाच्या स्पर्धेतून बाहेर पडली. मात्र, तिच्यापुढे कांस्यपदक जिंकण्याची संधी आहे. असे असले, तरीही तिचे वडील पीव्ही रमन्ना यांनी सिंधूला पाठिंबा देत तिचे मनोबल वाढवले आहे.
सन १९८६ मध्ये एशियन गेम्सच्या कांस्य पदक विजेत्या भारताच्या व्हॉलीबॉल संघाचे सदस्य असलेले रमन्ना पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, “उद्या आपल्याला अधिक सतर्क राहावे लागेल. तसेच तिला देशाला कांस्य पदक जिंकून देण्यासाठी आपले सर्वोत्तम प्रदर्शन करावे लागेल.”
“तिला पराभव विसरावा लागेल. मात्र, कोणत्याही खेळाडूसाठी तिसऱ्या आणि चौथ्या स्थानासाठी खेळणे वेदनादायक असते. तिने रविवारचा सामना एका नवीन सामन्याच्या रूपात खेळला पाहिजे.”
याव्यतिरिक्त माजी क्रीडा मंत्री किरेन रिजूजू यांनीही तिला पाठिंबा दिला आहे. त्यांनी ट्वीट करत म्हटले की, “निराश होऊ नको सिंधू. भारताला तुझ्या यशाचा अभिमान आहे. तरीही तू भारतासाठी पदक घेऊन परत येऊ शकतेस. कांस्यपदकाच्या सामन्यात आम्ही तुझ्यासाठी चीअर करू.”
Don't be disheartened @Pvsindhu1
India is proud of your achievements. You can still come back with a medal for India 🇮🇳
We will cheer for you in the bronze medal match. #Cheer4India pic.twitter.com/KRzgYBrJXa— Kiren Rijiju (@KirenRijiju) July 31, 2021
सध्याची जागतिक चॅम्पियन सिंधूला कांस्य पदक जिंकण्याची संधी आहे. ती रविवारी (१ ऑगस्ट) महिला एकेरीच्या कांस्य पदक सामन्यात चीनच्या बिंग जियाओचा सामना करणार आहे.
सिंधूबद्दल बोलायचं झालं, तर तिने २०१६ च्या रिओ ऑलिंपिकमध्ये रौप्य पदकावर आपले नाव कोरले होते.
ऑलिंपिकशी संबंधित बातम्या-
-दोन वेळची पदक विजेती सीमा पुनियाने केला ६०.५७ मीटरचा डिस्कस थ्रो; मिळवला ‘हा’ क्रमांक