इंडियन सुपर लीग अर्थात आयएसएलच्या २०२०-२०२१ मधील हंगामाला २० नोव्हेंबरपासून गोव्यात सुरूवात होईल, अशी घोषणा आयएसएलच्या आयोजकांनी केली. मार्चमध्ये कोविड-१९ या वैश्विक महामारीमुळे लागू केलेल्या लॉकडाऊननंतर, भारतातला प्रथमच इतकी मोठी क्रीडा स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. २०१४ पासून सुरू झालेल्या, आयएसएलचा हा सातवा हंगाम असेल.
कोविड -१९ च्या प्रभावामुळे, खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण स्पर्धा गोव्यामध्ये जैवप्रतिबंधक वातावरणात खेळवली जाईल. फातोर्डामधील जवाहरलाल नेहरू स्टेडियम, वास्कोमधील टिळक मैदान आणि बांबोलीम मधील जीएमसी अॅथलेटिक स्टेडियम या तीन मैदानांवर स्पर्धेतील सर्व सामने आयोजीत करण्यात आले आहेत.
संपूर्ण स्पर्धा जरी बंद दाराआड खेळली जाणार असली तरी, स्पर्धेत नव्याने सहभागी झालेल्या, मोहन बागान एफसी व ईस्ट बंगाल एफसी या नव्या संघांमुळे स्पर्धेतील रंगत वाढणार आहे. दोन्ही संघांमधील पारंपरिक द्वंद आयएसएलसारख्या मोठ्या व्यासपीठावर पाहण्यास फुटबॉलप्रेमी उत्सुक आहेत.
आयएसएलमध्ये सहभागी होण्यापूर्वी, मोहन बागानने ऍटलेटिको डी कोलकातासोबत करार करत, दोन्ही संघांचे एकत्रिकरण करत ‘एटीके मोहन बागान’ हा नवा संघ स्थापित केला. दुसरीकडे, ईस्ट बंगाल एफसीने श्री सिमेंट या कंपनीला आपल्या संघातील समभाग विकत आयएसएल खेळण्यासाठी पात्रता मिळवली. ईस्ट बंगाल आता ‘एससी ईस्ट बंगाल’ या नावाने आयएसएलमध्ये सहभागी होईल.
आयएसएलमध्ये सहभागी होणारे सर्व ११ संघ गोव्यात दाखल झाले आहेत आणि जैवप्रतिबंधित वातावरणात स्पर्धेची तयारी करीत आहेत. स्पर्धेच्या पूर्ण वेळापत्रकाची घोषणा होणे, अद्याप बाकी आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
शंभर वर्ष जुन्या क्लबने बदलले नाव आणि लोगो; ‘या’ नावाने सहभागी होणार आयएसएलमध्ये
भारतीय संघाचा ‘स्टार स्ट्रायकर’ मुंबई सिटी एफसीकडे ; प्रशिक्षक लोबेरो यांनी केली घोषणा
शेफील्ड युनायटेडच्या मालकाने खरेदी केला भारतीय फुटबॉल क्लब; ‘हे’ आहे क्लबचे नवीन नाव