भारतीय संघाला इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात धक्कादायक पराभवाचा सामना करावा लागला. कागदावर मजबूत दिसत असलेला भारतीय संघ मैदानावर मात्र कच खाताना दिसला. तुलनेत नवख्या असलेल्या इंग्लंडच्या संघाने मात्र दमदार कामगिरी करत विजय संपादित केला.
परंतु, मालिकेतील पहिलाच सामना झाला असून अजूनही तीन सामने शिल्लक आहेत. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी भारताला उर्वरित तीन सामन्यांपैकी किमान दोन सामन्यात विजय मिळवणे, क्रमप्राप्त आहे. मात्र त्यासाठी भारतीय संघ आपल्या रणनीतीत काहीसा बदल करण्याची शक्यता आहे.
रणनितीचा सगळ्यात महत्वाचा भाग असतो तो म्हणजे संघनिवड. भारतीय संघाची पहिल्या कसोटीतील संघनिवड सपशेल चुकली, असे मत अनेकांनी व्यक्त केले. याच पार्श्वभूमीवर दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ अंतिम अकराच्या संघात काही महत्वाचे बदल करेल.
१) रोहित शर्माच्या जागी मयंक अगरवालला संधी
भारताचा स्टार फलंदाज रोहित शर्मा दुखापतीतून सावरल्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या दोन कसोटी सामन्यात खेळला. मात्र यात त्याला काही खास कामगिरी करता आली नाही. मागील तीन कसोटी सामन्यात त्याने केवळ १४७ धावा केल्या आहेत. अशावेळी त्याच्या जागी युवा सलामीवीर मयंक अगरवालला संघात स्थान दिले जाऊ शकते. मयंक अगरवालचा भारतीय खेळपट्ट्यांवरील रेकॉर्ड देखील शानदार आहे. त्यामुळे संघ व्यवस्थापन या बदलाचा विचार करू शकते.
२) अजिंक्य रहाणेला वगळून केएल राहुलला संधी
अजिंक्य रहाणेने विराट कोहलीच्या अनुपस्थितीत नेतृत्व सांभाळत भारतीय संघाला ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक विजय मिळवून दिला. तसेच मेलबर्न कसोटीत शानदार शतक देखील झळकावले. मात्र त्यानंतर त्याला फलंदाजीत चाप पाडता आली नाही. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत तर पहिल्या डावात १ आणि दुसऱ्या डावात केवळ ० धावा करून तो तंबूत परतला. त्यामुळे त्याच्या जागी केएल राहुलला संधी देण्याची मागणी केली जात आहे. केएल राहुल गेले काही महिने उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. त्याच्या संघातील समावेशाने मधल्या फळीला स्थैर्य येईल.
३) शाहबाज नदीमच्या जागी कुलदीप यादवचा समावेश
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात कुलदीप यादवला संधी मिळेल, असाच अनेकांचा होरा होता. मात्र अनपेक्षितपणे शाहबाज नदीमला संधी मिळाली. परंतु, नदीम या संधीचा फायदा घेऊ शकला नाही. त्याने अनेक नोबॉल टाकले, तसेच त्याच्या गोलंदाजीवर भरपूर धावा देखील निघाल्या. त्यामुळे इतर गोलंदाजांवर देखील दबाव वाढला. अशा परीस्थितीत दुसऱ्या कसोटी सामन्यातून नदीमला वगळले जाणेच योग्य ठरेल. त्याच्या जागी चायनामन फिरकी गोलंदाज असलेल्या कुलदीप यादवला संधी दिल्या जाऊ शकते. कुलदीप आपल्या वैविध्यांनी फलंदाजांना जाळ्यात अडकवण्यात माहीर आहे.
महत्वाच्या बातम्या:
टी नटराजन या महत्त्वाच्या मालिकेतून बाहेर, बीसीसीआयने घेतला महत्त्वाचा निर्णय